घरताज्या घडामोडीराज ठाकरेंना टीका आणि नकलांशिवाय काही काही जमत नाही, अजित पवारांचा पलटवार

राज ठाकरेंना टीका आणि नकलांशिवाय काही काही जमत नाही, अजित पवारांचा पलटवार

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सरड्यासारखे रंग बदलत आहेत अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली आहे. राज ठाकरे वेळोवेळी भूमिका बदलत असल्यामुळे अजित पवारांनी निशाणा साधला आहे. राज ठाकरेंना टीका आणि नकलांशिवाय दुसरे काही येत नाही असे अजित पवार म्हणाले आहेत. स्वतःच्या पक्षातील आमदार का सोडून गेले याबाबत राज ठाकरेंनी आत्मपरिक्षण केले पाहिजे असा सल्ला अजित पवारांनी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केल्यावरुन अजित पवारांनी राज ठाकरेंवर पलटवार केला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भाषणावर पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे. या वेळी अजित पवारांनी राज ठाकरेंवर कठोर शब्दामध्ये प्रहार केला आहे. राज ठाकरेंच्या टीकेविषयी अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला. यावर अजित पवार म्हणाले की, त्या व्यक्तिला टीकेशिवाय आणि नकलांशिवाय दुसरे काही जमत नाही. त्यांनी एकदा आत्मपरिक्षण करावे की, एकेकाळी आपल्याकडे १४ आमदार निवडून आले होते मग ते आपल्याला सोडून का गेले? त्याच्यातले कितीतरी आमदार सोडून गेले आहेत. नुसती भाषणं करुन जनतेचे प्रश्न सुटत नाहीत किंवा रोजीरोटीचा प्रश्नसुद्धा सुटत नाही. ते इतके पलटी मारतात म्हणजे मागे लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी पूर्णपणे विद्यमान केंद्र सरकारविरोधात भूमिका मांडली हे आपण सगळ्यांनी पाहिली. यानंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरेंनी वेगळी भूमिका मांडली हे सगळ्यांनी पाहिले असल्याचे अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांवरील टीकेवरुनही राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. शरद पवार यांनी सर्व धर्मातील लोकांना नेतृत्व करण्याची संधी दिली आहे. हा पठ्ठ्या म्हणतो जातीपातीचे राजकारण शरद पवारांमुळे सुरु झाले. यावर आता काय बोलणार, पवारांचे पहिल्यापासूनचे निर्णय काढून पाहा आणि दाखवा शरद पवारांनी जातीपातीचे राजकारण केलं असे अजित पवार म्हणाले आहेत.

शरद पवारांनी जातीपातीचे राजकारण केलं – राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवारांनी जातीपातीचे राजकारण केलं असल्याची टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर राज्यात जातीयवादी राजकारण सुरु झाले. शरद पवारांना हे राजकारण अपेक्षित होते. १९९९ नंतर जेम्स लेन जन्माला आला. हा कोण जेम्स लेन? लोकांना तो आधी आणि नंतरही माहीत नव्हता. तो बनार्ड शॉ होता का? त्याने भिकारडे लिहिले आणि आपण तेच उगाळत बसलो आणि त्यावर जाणीवपूर्वक राजकारण तापवले गेले, अशी टीका त्यांनी केली. जाती-जातील फूट पाडून मराठा आरक्षणाचा मुद्दा पुढे आणून बाबासाहेब पुरंदरे यांना लक्ष्य करून जाती जातीत भांडण लावले. लोकांनी मराठा, ब्राम्हण, माळी, आगरी म्हणून पुढे यावे हेच शरद पवार यांना हवे आहे, असा आरोप राज ठाकरे यांनी केला.

- Advertisement -

रंग बदलणारा सरडा तरी बरा – मनीषा कायंदे

शिवसेना नेत्या डॉ. मनीषा कायंदे यांनीसुद्धा राज ठाकरे यांच्यावर घणाघात केला आहे. रंग बदलणारा सरडा अशी एक जाहिरात टीव्हीवर येते. तो सरडा तरी बरा जो रंग बदलण्यासाठी ओळखला जातो. हे राज ठाकरे, भाजपच्या शिदोरीवर जगणारा, मनोरंजन करणारा नकलाकार. लोकांच्या मनोरंजनासाठीच पुरेसा आहे. यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही असे कायंदे यांनी म्हटलं आहे. तसेच राज ठाकरे यांनी २००० सालच्या झोपड्या अधिकृत करण्यास पाठिंबा दिला होता. तसेच २००७ मध्ये मनसेकडून पक्षाच्या जाहीरनाम्यात आश्वासन दिले होते. परंतु झोपडपट्टीवरच राज ठाकरेंनी वक्तव्य केल्यामुळे मनीषा कायंदे यांनी वाह रे भाजपचा पोपट म्हणत निशाणा साधला आहे.


हेही वाचा : ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणणारे नोटीशीमुळे बदलले याच आश्चर्य, सुप्रीया सुळेंची राज ठाकरेंवर टीका

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -