दसरा मेळाव्याकरता उच्च न्यायालयात सर्व कागदपत्र सादर केली, अनिल परबांची माहिती

ED conducting raids at Shiv Sena Minister Anil Parabs house and various places

मुंबई- शिवाजी पार्कवर दसरा मेळावा व्हावा याकरता शिवसेनेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार होती. मात्र, आता ती याचिका उद्यावर ढकलण्यात आली आहे. तसंच, या प्रकरणातील सर्व कागदपत्र शिवसेनेने मुंबई उच्च न्यायालयात सादर केले आहेत, अशी माहिती माजी मंत्री अनिल परब यांनी दिली. आज त्यांनी माध्यमांशी चर्चा केली.

हेही वाचा – शिवतीर्थसाठी शिंदे गट आग्रही, मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली मध्यस्थ याचिका

कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असं म्हणत मुंबई महापालिकेच्या जी-उत्तर विभागाने शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांना दसरा मेळाव्यासाठी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे हे प्रकरण आता उच्च न्यायालयात गेलं आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वानुसार, शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर परवानगी मिळावी अशी याचिका शिवसेनेने मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. तर, आम्हीच खरी शिवसेना अशी मध्यस्थी याचिका शिंदे गटाकडून आज करण्यात आली आहे. शिवसेनेच्या याचिकेवर आज सुनावणी होणार होती, मात्र ती सुनावणी आता उद्यावर ढकलली आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या याचिकेवर शिवसैनिकांसह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे.

खरी शिवसेना कोण हे काल कळलं

कालच्या मेळाव्यामुळे सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. कोण काय बोलतंय याकडे आमचं लक्ष नाही. आमचं लक्ष कामाकडे, मुंबईकरांकडे आहे, असं अनिल परब म्हणाले. तसंच, आम्हीच खरी शिवसेना असा दावा करणाऱ्या शिंदे गटालाही त्यांनी लक्ष्य केलं. ते म्हणाले की, खरी शिवसेना कोण हे कालच्या गर्दीमुळे कळलंच असेल, असं अनिल परब म्हणाले.

हेही वाचा – मोठी बातमी! दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर मुंबई पालिकेने दोन्ही गटांना परवानगी नाकारली

रिसॉर्टशी माझा संबंध नाही

दापोलीतील रिसॉर्टशी माझा संबंध नाही. स्थानिक प्राधिकारण, न्यायालयीन चौकशी झाली. स्थानिक प्राधिकरण, कोर्ट जे आदेश देतील त्याला आम्ही बंधनकारक आहोत. किरीट सोमय्यांना आम्ही बंधनकारक नाही. ज्या यंत्रणांना आधिकार आहेत, ते जे आदेश देतील त्या आदेशाचं पालन करू. रिसॉर्टवर सदानंद कदम यांनी मालकी क्लेम केला आहे. सर्व खर्च त्यांनी दाखवला आहे. तरीदेखील माझी बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं अनिल परब म्हणाले.