घरमहाराष्ट्रयुती-आघाडीच्या प्रचाराचा नारळ फुटला

युती-आघाडीच्या प्रचाराचा नारळ फुटला

Subscribe

शरद पवार यांना भाजपमध्ये घेऊ नका? उद्धव ठाकरेंची उपरोधिक टीका

शरद पवार यांनी महाराष्ट्राला खड्ड्यात घातले. त्यांना भाजपत घेऊ नका, अशी उपरोधिक टीका करताना शिवसेना-भाजपची ही सभा इव्हेंट आहे का? येऊन पाहा, तुमच्याकडेही गर्दी नसेल इतकी गर्दी येथे आहे. पश्चिम महाराष्ट्रातून रांगच्या रांग खासदार लोकसभेत जाणार, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. रविवारी कोल्हापुरातील महायुतीच्या सभेने लोकसभा निवडणुकीसाठी युतीच्या प्रचाराचा नारळ फुटला. सभेला मोठी गर्दी झाली होती. या सभेला उद्धव ठाकरे यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि युतीच्या घटक पक्षांचे नेते उपस्थित होते. या सभेत माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना सातारातून उमेदवारी देण्यात आली आहे

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, सेना-भाजपने युती का केली, याचे उत्तर देण्याची गरज नाही. आम्हाला भाषणही देण्याची गरज नव्हती. मुख्यमंत्र्यांना बोललो की लोकांना केवळ आपल्याला एकत्र पाहायचेय. मोदी नको तर ठेवा बाजुला, पण त्यांच्या 56 जणांना निवडून देणार का, असा सवालही त्यांनी केला. त्यांच्याकडे पंतप्रधान पदाचा उमेदवारही नाही. त्यांचे दोन दावेदार होते. शरद पवार आणि मायावती, दोघांनीही निवडणुकीतून माघार घेतली. शरद पवार यांना दुसरे काही मिऴाले नाही तेव्हा त्यांनी बीसीसीआयची खुर्ची बळकावली. त्यांना खुर्ची लागते, असा आरोप ठाकरे यांनी केला. राष्ट्रवादीला मत द्यायचे असेल, तर अजित पवार काय करणार होते ते आठवा, असे आवाहन ठाकरे यांनी केले. दुष्काळातही सरकारने कामे केली. मुख्यमंत्री फडणवीसांचा मला अभिमान वाटतो. सदाभाऊ खोत यांची तोफ मला हातकणंगलेमध्ये हवी आहे, अशी स्तुतीही ठाकरे यांनी केली.

- Advertisement -

ही युती विचारांची -मुख्यमंत्री

भाजपा आणि शिवसेनेची युती सत्तेसाठी नाही, विचारांची युती आहे. हिंदुत्ववादी पक्षांची युती असल्याचा अभिमान आहे. आघाडीत 56 पक्ष असल्याचे आठवले यांनी सांगितले. पण हे पक्ष रजिस्टर तरी आहेत का, कोणत्याही रस्त्यावरील संघटनेला उचलले आणि व्यासपीठावर बसविल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. शरद पवारांनी कॅप्टनशीप मागे घेतली. नावात राष्ट्रवादी असून कामाचे नाही, मनात राष्ट्रवाद असावा लागतो. त्यांना उमेदवार सापडत नाहीत. या निवडणुकीतही एनडीएची सत्ता येणार. गरिबाची गरीबी कधी हटली नाही, काँग्रेसच्या सग्यासोयर्‍यांची गरीबी हटल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. जनधन खाती, शौचालये उभारली. महिलांना विचारा त्यांना किती वाईट वाटत होते, जेव्हा त्यांना बाहेर जावे लागत होते. शेतकर्‍यांच्या खात्यात थेट पैसे गेले. आम्हाला साखर सम्राटांचे भले करायेचे नव्हते. चार वर्षाच्या काळात कोणालाही एफआरपीसाठी आंदोलन करावे लागले नाही. मोदींना पॅकेज दिले. 31 रुपयांचा कमीतकमी दर दिला. मोदी सुर्यासारखे आहेत. सुर्याकडे पाहून थुंकल्यास आपल्याच चेहर्‍यावर पडते. यामुळे सावध असा. आम्ही इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी तर तुम्ही भ्रष्टाचार मॅनेजमेंट कंपनी आहे. काही लोक राष्ट्रवादाचा कंपू सोडून चोरांच्या कंपूत सामिल झाले आहेत, असे राजू शेट्टी यांचे नाव न घेता फडणवीस यांनी टीका केली.

राफेलच्या चौकशीला का घाबरता?-शरद पवार

राफेल प्रकरणाच्या चौकशीला का घाबरता, असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तोफ डागली. तुझी छाती जर ५६ इंचाची असेल तर कुलभूषण जाधवला सोडून का आणत नाही, असे आव्हान पवार यांनी मोदींना दिले. कराड येथे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ५६ मित्रपक्षांच्या आघाडीच्या प्रचाराचा नारळ जाहीरसभेद्वारे फोडण्यात आला. त्यावेळी पवार बोलत होते. यावेळी पवार यांच्यासोबत व्यासपीठावर काँग्रेस आणि मित्र पक्षांचे नेते उपस्थित होते. शरद पवार यांनी आपल्या भाषणात केंद्रातील मोदी आणि राज्यातील फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, आमच्या काळात ही यवतमाळ जिल्ह्यातील शेतकर्‍याने आत्महत्या केली. त्यावेळी मी त्यावेळचे पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांना जाऊन भेटलो आणि आम्ही यवतमाळला जायचं ठरवलं. दुसर्या दिवशी आम्ही त्या शेतकर्‍याच्या घरी पोहोचलो. त्यावेळी कर्जबाजारीपणामुळे होणार्‍या बदनामीमुळे त्यांनी आत्महत्या केल्याचं समजलं. त्यानंतर आम्ही कर्जमाफीचा निर्णय घेतला. या सरकारच्या काळात पन्नास टक्के शेतकर्‍यांना देखील कर्जमाफी मिळाली नाही.

- Advertisement -

राफेल प्रकरणात चौकशीला का घाबरता. या देशाच्या संरक्षण दलांबाबत आपल्या सगळ्यांना अभिमान आहे. यशवंतराव चव्हाण यांनी देश मजबूत केला. विमानाचे कारखाने काढले, इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले. आज देखील सैन्य सर्व त्याग करायला तयार. पण आताचे सरकार सैनिकांच्या पराक्रमाचा राजकीय फायद्यासाठी वापर करत आहे. हवाई दलाचा आम्हाला अभिमान. अभिनंदनला अटक केल्यानंतर जगातील देशांनी पाकिस्तानवर दबाव टाकला आणि अभिनंदनची सुटका झाली. त्याचवेळी आपलं एक हेलिकॉप्टर पाकिस्तानने पाडलं, त्यामध्ये आपल्या नाशिकचे जवान मांडवगणे शहिद झाले, त्यांच्या पत्नीने सांगितले की शहिदांच्या पराक्रमाचं राजकारण करु नका. पाकिस्तानला गुपचूप शुभेच्छा का देता. सैनिकांच्या पराक्रमाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करणार्‍यांना जनता त्यांची जागा दाखवेल, असे पवार म्हणाले.

ये फेव्हीकोल जोड है

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीच्या पहिल्या प्रचारसभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीवर जोरदार टीका केली. देश चालवण्यासाठी 56 पक्ष नाही तर 56 इंचाची छाती लागते असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, मी त्यांना विचारतो हे 56 पक्ष रजिस्टर देखील आहेत का? आम्ही पाच पांडव आहोत ये फेविकोल का मजबूत जोड है इसे कोही तोड नाही सकता.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. अलीकडच्या काळात पोपट बोलू लागला आहे. हा बारामतीचा पोपट बोलू लागला असून, या पोपटाने आमचे कपडे उतरवण्याची भाषा करू नये कारण तुमचे कपडे आधी विधानसभा, त्यानंतर नगरपलिकेत उतरवले आहेत. मुंबईमध्ये पालिका निवडणुकीत तर उद्धव ठाकरे यांनी तुमचा लंगोट देखील ठेवला नाही असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

तसेच कुणाची तरी सुपारी घेण्यापेक्षा दुपारी नीट घरी बसा असा खोचक टोला देखील त्यांनी राज ठाकरे यांना लगावला. मुख्यमंत्र्यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसवर देखील जोरदार टीका केली. यांच्या केवळ नावामध्ये राष्ट्रवादी आहे. राष्ट्रवाद येत नाही तो मनात असावा लागतो असा टोला देखील त्यांनी लगावला. ऐवढेच नाही तर यांना आता उमेदवार नसल्याचे सांगत आता कॅप्टनने देखील माढ्यातून माघार घेतल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.

माझ्याकडे कुठे आहे लोकसभेची गाडी – रामदास आठवले

आपल्या कवितांसाठी प्रसिद्ध असलेल्या रामदास आठवले यांनी मसभेत आपल्या कवितांनी एकच हशा पिकवला. मात्र त्यांनी आपल्या कवितेतून शिवसेना -भाजपाला टोला देखील लगावला. देवेंद्र फडणवीसांची जमली आहे जोडी पण माझ्याकडे कुठे आहे लोकसभेची गाडी अशी कविता रामदास आठवले यांनी म्हणत लोकसभेचे तिकीट न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तेव्हा उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. तसेच या दोघांनी एकत्र आले पाहिजे हे मी सारखे सांगत होतो. अखेर त्यांनी ते ऐकलं. आणि या महाराष्ट्राच्या हितासाठी हे दोघे एकत्र आले असे देखील आठवले यावेळी म्हणालेत. तसेच तुम्ही दोघांनी तुमचे वाद मिटवले म्हणून मी तुमच्या सोबत आलो, असेही आठवले म्हणाले. तसेच मोदींच्या मंत्रिमंडळात शिवसेनेचे मंत्री असणार आणि हा पट्ट्या देखील त्या मंत्रीमंडळात असेल असा विश्वास देखील त्यांनी बोलून दाखवला. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्यावर देखील जोरदार टीका केली. काँग्रेस का सपना सपनाने तोड दिया है और हम राहुल गांधी का सपना तोडेंगे असे देखील त्यांनी सांगितले.

ज्यांचे हात रक्ताने माखले आहेत त्यांच्यासोबत का गेलात – सदाभाऊ खोत

ज्यांचे हात रक्ताने माखले त्यांच्यासोबत जाऊन परिवर्तनाची भाषा कशी करता असा संतप्त सवाल रयत क्रांतीचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी स्वभामिनी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना विचारला. सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच कोल्हापूरच्या दोन्ही जगांवर महायुती परिवर्तन करणार असा विश्वास देखील सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला. सदाभाऊंच्या संपूर्ण भाषणाचा रोख हा राजू शेट्टी यांच्यावर होता. यावेळी बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले की, जी मंडळी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला नाव ठेवत होती ते आता हातात हात घालून काँग्रेससोबत गेल्याचे सांगत यांना आता जनताच जागा दाखवेल असे देखील खोत यावेळी म्हणालेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -