घरमहाराष्ट्रगृहखाते चालवतेय कोण, अनिल देशमुख की अनिल परब?

गृहखाते चालवतेय कोण, अनिल देशमुख की अनिल परब?

Subscribe

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा सवाल

गृहखाते नेमके कोण चालवते? गृहमंत्री अनिल देशमुख की, शिवसेना नेते अनिल परब, असा सवाल उपस्थित करताना राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लेटर बॉम्ब प्रकरणात चौकशी व्हायला हवी; पण चौकशी कोणाची करणार? अनिल देशमुख की परमबीर सिंह यांची, असे म्हटले आहे. सचिन वाझे यांची नियुक्ती परमबीर सिंह यांनीच केली, असे शरद पवार यांनी सांगितले. जे त्यांनी सांगितले ते खरे आहे. मात्र, पवारांनी अर्धेच सत्य सांगितले आहे. सिंह यांच्या समितीनेच वाझे यांना पदावर घेतले हे खरे आहे. मात्र मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या आदेशानंतरच सिंह यांनी वाझे यांना पदावर घेतले होते हे पूर्ण सत्य असून पवारांनी हे सत्य सांगितले पाहिजे, असे फडणवीस म्हणाले.

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्ब प्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित केले. तसेच त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या भूमिकेवरही बोट ठेवले आहे. अशातच गृहखाते कोण चालवते? गृहमंत्री अनिल देशमुख की, शिवसेना नेते अनिल परब? असा परखड सवालही फडणवीसांनी उपस्थित केला आहे. अशातच देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना जी माहिती दिली, ती म्हणजे सत्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न आहे, असा थेट आरोपही केला आहे.

- Advertisement -

अँटिलिया प्रकरणात सचिन वाझेंच्या अटकेनंतर विविध खुलासे झाले आहेत. माजी पोलीस आयुक्त व राज्याचे पोलीस महासंचालक परमबीर सिंह यांनी पत्राच्या माध्यमातून केलेला खुलासा धक्कादायक आहे. या दलालीचा खुलासा करणारे परमबीर सिंह हे पहिले व्यक्ती नाही आहेत. महाराष्ट्राचे डीजी सुबोध जयस्वाल यांनी राज्य सरकारला एक अहवाल सादर केला होता. पोलीस दलातील बदल्यांमधील रॅकेट, पैशांची दलाली या संदर्भातले संपूर्ण एक रिपोर्ट पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी सादर केला होता. हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे गेला नंतर गृहमंत्र्यांकडे गेला; पण त्या अहवालावर कोणतीही कारवाई झाली नाही. या अहवालावर कारवाई न झाल्यामुळे सुबोध जयस्वाल महाराष्ट्रातील पोलीस महासंचालक पद सोडून केंद्रीय सेवेत दाखल झाले आहेत. हे कारण अत्यंत धक्कादायक आहे.

यानंतर या प्रकरणात महाराष्ट्राच्या गुप्तचर खात्याकडून एक अहवाल सादर करण्यात आला. याबाबत वारंवार गृहमंत्र्यांना ऑफिसर कमिश्नर इंटेलिजन्स रश्मी शुक्ला यांनी सांगितले. शुक्ला यांनी काही परवानग्या घेऊन काही फोन टॅप केले. या फोनचा रिपोर्ट करण्यात आला, यामध्ये धक्कादायक खुलासा झाला. याचा रिपोर्ट रश्मी शुक्ला यांनी गृहमंत्र्यांना दिला, परंतु या अहवालावर कारवाई न होता ऑफीसर रश्मी शुक्ला यांच्यावर कारवाई झाली होती. त्यांना पदावरून बाजूला करण्यात आले. ज्यांचे रिपोर्टमध्ये नाव आले त्यांना पदस्थापना मिळाली. त्यामुळे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेला आरोप हा पहिला आरोप नाही, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

शरद पवारांचे वक्तव्य अर्धसत्य – फडणवीस

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली त्यांचे म्हणणे मी ऐकले आहे. परमबीर सिंह यांची बदली होत असल्यामुळे आरोप केल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. परंतु सुबोध जयस्वाल यांची बदली झाली नव्हती, पहिलीच कारवाई झाली असती तर आता ही वेळ आली नसती, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. शरद पवारांचे ऐकल्यानंतर आश्चर्य वाटले. शरद पवार हे सरकारचे निर्माते आहेत. त्यामुळे मंत्री कसेही वागले तर त्यांना पाठराखण करण्याची भूमिका घ्यावी लागते. सचिन वाझे यांना पुन्हा पोलीस दलात घेऊन महत्त्वाची जागा देण्यात आली तेव्हा सरकार झोपेत होते का? एखाद्या निलंबित अधिकार्‍याला परत घेतल्यावर मोठी पद कशी देऊ शकतात. सरकारच्या आशिर्वादाने सगळे झाले आहे. परमबीर सिंह यांच्या कमिटीने वाझेंना पुन्हा घेतले. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या आशिर्वादाने सचिन वाझेंना परत घेण्यात आले हे शरद पवार सांगायला विसरले असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

रिटायर्ड डीजी गृहमंत्र्यांची चौकशी कशी करू शकतात

शरद पवार यांनी म्हटले आहे की, या घटनेची चौकशी ज्युलिओ फ्रान्सिस रिबेरो यांनी करावी. परंतु चौकशी कोणाची करायची गृहमंत्र्यांची की परमबीर सिंह यांची, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. तसेच पदावर असलेल्या गृहमंत्र्यांची चौकशी सेवानिवृत्त झालेले डीजी करू शकतात का? सरकारला यामधून वाचवण्यासाठीच शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत सत्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न झाला. परंतु आमचे मत स्पष्ट आहे. परमबीर सिंह यांच्या पत्रात लिहिले आहे, की त्यांनी हे प्रकरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगितले आहे. याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री का बोलत नाहीत, असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. परमबीर सिंह यांनी दिलेल्या पुराव्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे पापावर पांघरुण घालण्यासारखे आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

गृहखाते कोण चालवतेय

या प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांची चौकशी झाली पाहिजे. तसेच हे गृहखाते कोण चालवते आहे? शिवसेना, की परिवहन मंत्री अनिल परब चालवतात की राष्ट्रवादी चालवत आहे, असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला आहे. कारण अनिल परब विधिमंडळात गृहखात्याच्या सर्व प्रश्नांना उत्तर देत होते. तसेच पोलीस दलात होणार्‍या नियुक्त्यांमध्ये भूमिका कोणाची हे स्पष्ट झाले पाहिजे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -