आंदोलनाला जाताय मग आत राहायची पण तयारी ठेवा.., अनिल परबांचा राज ठाकरेंना टोला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रातून इशारा दिला आहे. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत-जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही, असा इशारा राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना दिला. दरम्यान, आंदोलनाला जाताय मग आत राहायची पण तयारी ठेवा, असा टोला राज्याचे पर्यावरण मंत्री अनिल परब यांनी लगावला आहे.

अनिल परबांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, सत्तेचा गैरउपयोग कुणी करत नाही. कायदा जर कुणी मोडला असेल तर त्यांच्यावर कारवाई होते. आम्ही विरोधीपक्षात होतो तेव्हा अशी कारवाई होत होती. पोलीस कारवाई करून त्यांना पकडून नेतात. ज्याला आंदोलन करायचे असते त्यांच्यावर कारवाई केली जाते. हा सत्तेचा गैरवापर नाही. बाळासाहेब आम्हाला नेहमी सांगायचे आंदोलनाला जाताय मग आत राहायची पण तयारी ठेवा, असं अनिल परब म्हणाले.

बाळासाहेब आम्हाला नेहमी सांगायचे आंदोलनाला जातात ना मग दोन दिवस आतमध्ये राहायची तयारी ठेवा. आम्ही नेहमी म्हणतो की, सत्ता ही कधीच कायम नसते. सत्तेचा ताम्रपट कुणीच घेऊन आलेला नसतो. तो जनतेचा अधिकार असून जनता ठरवत असते, अशा शब्दांत परबांनी राज ठाकरे यांना डिवचले आहे. प्रत्येकाला अयोध्येला जाण्याचा अधिकार आहे. राज ठाकरेंना जर वाटतं असेल तर त्यांनी जावे, असे मत अनिल परबांनी व्यक्त केले आहे.


हेही वाचा : महाबळेश्वरला साकारणार मधाचे गाव, सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार उद्घाटन