घरताज्या घडामोडीनांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात १७ हजार परदेशी पाहुण्यांचे आगमन

नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात १७ हजार परदेशी पाहुण्यांचे आगमन

Subscribe

सात दिवसांत सात हजार पर्यटकांची हजेरी

हिवाळ्याची चाहूल लागताच नाशिक जिल्ह्यातील भरतपूर म्हणून ओळखल्या जाणार्‍या नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात यूरोप, सायबेरिया, उत्तर अमेरिका आणि आशियाई देशांतून आलेल्या तब्बल १७ हजार परदेशी पाहुण्यांचे आगमन झाले आहे. या पाहुण्यांना बघण्यासह कॅमेर्‍यात कैद करण्यासाठी हजारो पर्यटक व पक्षीप्रेमी नांदूरमध्यमेश्वर अभारण्यात गर्दी करत आहेत. विशेष म्हणजे, सात दिवसात तब्बल देशभरातील सात हजार पर्यटकांनी हजेरी लावली असल्याने वनविभाग मालामाल झाला आहे.

गुलाबी थंडीत नांदूरमध्यमेश्वर अभयारण्य क्षेत्रात देशभरातील पर्यटकांना पर्यटनाची अनोखी अनुभूती घेता येणार आहे. त्यामुळे पक्षी अभ्यासकांसह पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. नांदूरमध्यमेश्वर येथील धरणाच्या पाणथळ भागात परदेशी व स्थानिक पक्षांसाठी पोषक वातावरण आणि खाद्य मोठ्या प्रमाणात आहे. या ठिकाणी काही पक्षी आकाशात मुक्त विहार करतात, काही पक्षी खाद्यासाठी अचूक सूर मारतात. अभयारण्यात विविध पक्षी आणि निसर्गरम्य वातावरण असल्याने पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. येत्या काही दिवसांत आणखी परदेशी पक्षी येणार असून, त्यांचा मुक्काम काही महिने राहणार असल्याने पक्षीप्रेमींसह पर्यटकांसाठी ही पर्वणी ठरणार आहे.

- Advertisement -

अभयारण्यात वन अधिकारी, कर्मचारी, स्थानिक गाईड, पक्षीमित्र, वन्यजीव अभ्यासक, स्वयंसेवक यांच्यामार्फत पक्षी प्रगणना करण्यात आली आहे. चापडगाव, मांजरगाव, खानगावथडी, गोदावरी नदीपात्र, कोठुर, कुरुडगाव, काथरगाव या सात ठिकाणी पक्षी निरीक्षणात २७१ जातींचे सुमारे १७ हजार पक्षी आढळून आले आहेत. यामध्ये विदेशी व्हिजन, गडवाल, रुडी शेल डक, मार्श हॅरियर, मॉन्टेग्यू हॅरियर, ब्लू थ्रोट, ब्लू चिक बी ईटर, गोल्डन फ्लॉवर यांसह स्थानिक स्थलांतरीत पक्षी, उघड्या चोचीचा बगळा, जांभळा बगळा, राखी बगळा, स्पॉट बिल डक, स्पूनबिल, रिव्हीर टर्न, कमळपक्षी, शेकाटया, नदीसुरय आदी पक्षी आढळून आले आहेत. थंडीच्या आगमनाबरोबर स्थलांतरीत पक्ष्यांचे आगमन झाले आहे. त्यामुळे पक्षी निरीक्षकांसह पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

असे आहे अभारण्यातील शुल्क

नांदूरमध्यमेश्वर अभारण्यात जाण्यासाठी एका व्यक्ती ३० रुपये शुल्क आहे. तर ६ ते १२ वयोगटातील मुलामुलींसाठी १५ आणि ० ते ६ वयोगटातील मुलामुलींसाठी शुल्क आकारले जात नाही. विशेष म्हणजे, वनविभागातर्फे पर्यटकांना दुर्बिणसुद्धा दिली जाते. त्यासाठी ५० रुपये आणि गाईडसाठी ३०० रुपये शुल्क आकारले जात आहे. तसेच, चारचाकी वाहनांसाठी ५० रुपये आणि दुचाकीसाठी २० रुपये शुल्क आकारले जाते.

- Advertisement -

वनविभागाने अभारण्यात येणार्‍या पर्यटकांसाठी दुर्बीण, गाईड, कॅन्टीन, गार्डन, स्वच्छतागृह, वाहन पार्किंगसह आदी सोयीसुविधा उपलब्ध केल्या आहेत. शिवाय, कोरोना त्रिसुत्रींचे पालन करावे. पर्यटकांनी प्लॅस्टिक पिशवीचा वापर करु नये. पक्ष्यांच्या सुरक्षेसाठी अभारण्यात प्लॅस्टिकचा कचरा करु नये.
अनिल अंजनकर, वनसंरक्षक, वन्यजीव विभाग, नाशिक

वनविभागातर्फे ५ ते १२ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात पक्षी सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहांतर्गत परिसरातील ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना पक्षीनिरीक्षण व पक्षीसंवर्धनाचे धडे देण्यात आले आहेत. पक्षी सप्ताहाची सांगता शुक्रवारी चापडगाव येथे झाली. पक्षीमित्र, इको-इको संस्थेतर्फे अभारण्य परिक्षेत्रात स्वच्छता करण्यात आली आहे.
अनंत सरोदे, वन अधिकारी, नांदूर-मध्यमेश्वर

Sushant Kirve
Sushant Kirvehttps://www.mymahanagar.com/author/ksushant/
गेल्या १२ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. क्राईम, आरोग्य, साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर लिखाण. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी आणि जीवघेण्या अपघातांमध्ये घट होण्यासाठी सातत्याने लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -