पैठणमध्ये दहा लाख भाविक नाथांच्या चरणी लिन

पैठण : तुकाराम बीजेच्या मुहूर्तावर सुरू झालेल्या नाथ षष्ठी मुख्य सोहळ्याला सोमवार दिनांक १३ मार्च पासून सुरूवात झाली आहे. तीन दिवस चालणारी ही महाराष्ट्रातील दुसर्‍या क्रमांकाची भव्य यात्रा पहिल्या दिंडीनंतर मात्र ओसरताना दिसू लागली आहे. दि. १२ ते दि. १४ या तीन दिवसांत तब्बल दहा लाख भाविकांनी नाथ चरणी माथा ठेवत दर्शन घेतल्याची माहिती नाथ मंदिर विश्वस्त दादा बारे यांनी दिली आहे.

कोरोना काळाच्या दोन वर्षानंतर यंदाची नाथ षष्ठी प्रचंड मोठी भरणार असल्याचा अंदाज प्रशासन व पैठणकरांमधून व्यक्त केला जात होता. परंतु हवामान खात्याने दिलेल्या पावसाच्या इशार्‍यानंतर अनेक वारकरी भाविक भक्तांनी उभ्यानेच दर्शन घेऊन आल्या पावली घरी परतल्याने गर्दी ओसरू लागली आहे.वाळवंटातील व पैठण शहरातील अनेक मुक्कामी दिंड्यांनी बुधवार दिनांक १५ मार्च रोजी होणार्‍या दही हंडी काल्याची वाट न बघता दुसर्‍याच दिवशी माघारी फिरल्याने मंदिर परिसर रिकामा झाल्याचे चित्र पहावयास मिळाले.

आज पुन्हा दोन दहीहंड्या फुटणार

शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांच्या नाथ षष्ठी सोहळ्याची आज दहीहंडी काल्याने सांगता होणार आहे. नाथ समाधी मंदिरात नाथ वंशज रावसाहेब महाराज गोसावी यांच्या हस्ते दहीहंडी फोडली जाणार असून पैठणचे आमदार तथा पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी सुरू केलेली वारकर्‍यांची दहीहंडी सुद्धा मंदिरासमोरील डोम मध्ये फोडली जाणार आहे. नामदार संदिपान भुमरे यांनी नव्याने सुरू केलेल्या दहीहंडी काल्याच्या विरोधात नातवंशजाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु सदरील दहीहंडी फोडण्याबाबत उच्च न्यायालयाने याचिका राखीव ठेवल्याने मंत्री संदिपान भुमरे यांची देखील दहीहंडी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. आज सायंकाळी सूर्यास्ता वेळी नाथ मंदिरातील दहीहंडी प्रथमता फुटेल त्यानंतर पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी सुरू केलेली दहीहंडी वारकर्‍यांच्या हस्ते फोडली जाईल अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.