घरमहाराष्ट्रअतिकचे हत्याकांड घडवून मलिक यांचा स्फोट दडपण्याचा प्रयत्न, संजय राऊत यांची टीका

अतिकचे हत्याकांड घडवून मलिक यांचा स्फोट दडपण्याचा प्रयत्न, संजय राऊत यांची टीका

Subscribe

मुंबई : सरकारच्या चुकीमुळे पुलवामा हल्ला (Pulwama attack) घडला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला त्यावेळी गप्प राहण्याचे निर्देश दिले होते, असा गौप्यस्फोट जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satya Pal Malik) यांनी केला आहे. मात्र, उत्तर प्रदेशात गँगस्टर अतिक अहमदचे हत्याकांड (Atiq Ashraf Murder) त्याच वेळी घडवून मलिक यांनी 40 जवानांच्या हत्याकांडावर केलेला स्फोट दडपण्याचा प्रयत्न झाला, असा थेट आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांना केला आहे.

खासदार संजय राऊत यांनी दैनिका ‘सामना’तील आपल्या ‘रोखठोक’ सदरात सत्यपाल मलिक यांनी पुलावामा हल्ल्याबाबत केलेल्या गौप्यस्फोटाचा हवाला देत केंद्रातील मोदी सरकार व प्रसारमाध्यमांवर निशाणा साधला आहे. सत्यपाल मलिक यांची एक सनसनाटी मुलाखत प्रसिद्ध झाल्यापासून वृत्तवाहिन्या व वृत्तपत्रांना घाम फुटला आहे. राष्ट्रीय सुरक्षेबाबत मलिक यांनी केलेल्या विधानांना ठळक प्रसिद्धी देण्यापेक्षा त्यांची बातमी दाबता कशी येईल, यावरच त्यांची कसरत सुरू आहे. गुलाम नबी आझादांपासून ज्योतिरादित्य शिंदे, महाराष्ट्रात शिंदे-अजित पवारांचे राजकीय बंड अशा बातम्यांवर दिवसभर चर्चासत्रे घडवणाऱ्या माध्यमांनी मलिक यांनी पुलवामा हत्याकांडाबाबत केलेल्या खुलाशावर ‘बंदी’च घातल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.

- Advertisement -

सरकार प्रायोजित शांतता
पुलवामा हल्ल्याचे खापर पाकिस्तानवर फोडून लोकसभा निवडणुकांना सामोरे जायचा ‘प्लान’ त्यांच्या मनात असावा असे मलिक यांना तेव्हा वाटले आणि तेच घडले. “40 जवानांच्या हत्येचा बदला घेऊ, पाकिस्तानला धडा शिकवू” असा प्रचार भाजपकडून सुरू झाला. मतदारांना भावनिक आवाहन करण्यात आले. सत्यपाल मलिक हे तेव्हा जम्मू-कश्मीरचे राज्यपाल होते व त्यांची नियुक्ती मोदी व डोवाल या दोघांनी केली होती. त्यामुळे मलिक यांच्या आताच्या गौप्यस्फोटाने ‘माध्यमां’त खळबळ माजायला हवी होती, पण माध्यमांत एक प्रकारे सन्नाटा पसरला. सरकार प्रायोजितच ही शांतता असावी हे नक्की होते, असा दावाही राऊत यांनी केला आहे.

गृह मंत्रालयाने तपास का केला नाही?
स्फोटकांचा वापर करून जवानांच्या वाहनांवर हल्ला केला जाईल ही माहिती गुप्तचरांनी किमान बारा वेळा केंद्रीय गृहखात्याकडे पाठवली. ‘फ्रंटलाइन’ने पुराव्यासह प्रसिद्ध केलेल्या या स्फोटक माहितीच्या खोलात जाऊन केंद्रीय गृह मंत्रालयाने तपास करायला हवा होता. तसे का झाले नाही? असा सवालही त्यांनी केला आहे.

- Advertisement -

मलिक यांच्या खुलाशाबाबत सर्वांचे मौन
सत्यपाल मलिक यांनी आता केलेल्या स्फोटाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. देशाचे संरक्षणमंत्री, गृहमंत्री, पंतप्रधान व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यावर चूप आहेत. एरवी लांबलचक ‘फेकू’ भाषणे ठोकणारे भाजपवाले गप्प आहेत. अतिक अहमदच्या हत्येचे श्रेय घेणारे, माफिया राज संपवले, साफ धुळीस मिळवले असे सांगणारे भाजपवाले व त्यांचे सरकार सत्यपाल मलिक यांच्या खुलाशावर एक शब्द बोलत नाहीत. कदाचित मलिक यांना ठार वेडे, भ्रष्टाचारी किंवा देशद्रोही ठरवून तुरुंगात टाकण्याचे कारस्थान रचण्यात हे सगळे दंग असावेत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -