राज्यसभेच्या निवडणुकीसाठी शेवटच्या ५ मिनिटांत मतदान करू, बच्चू कडूंचा मुख्यमंत्र्यांना इशारा

राज्यसभेच्या सहा जागांसाठी (Rajya Sabha elections) राज्यात निवडणूक होत आहे. ही निवडणूक भाजप (BJP) आणि शिवसेनेसह (Shivsena) महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची आहे. सहाव्या जागेसाठी कोल्हापूरातून शिवसेनेने कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी दिली आहे. त्यासाठी त्यांच्या मतांची जुळवाजुळव करताना शिवसेनेची मोठ्या प्रमाणात कोंडी होऊ लागली आहे,अशातच राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी राज्यसभेच्या निवडणुकीबाबत वक्तव्य करत मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे.

सरकार बनविताना महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या या आमदारांकडे अडीच वर्ष दुर्लक्ष करण्यात आले आहे. राज्यात केवळ महाविकास आघाडीचं सरकार असून अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात आले नाही, अशी नाराजी काही पक्षांतून उमटत आहे. धान आणि हरभऱ्याच्या अनुदानाची व्यवस्था केंद्र आणि राज्य सरकारनं करावी, अन्यथा त्याचे परिणाम राज्यसभेच्या मतदानावर दिसतील, असे बच्चू कडू म्हणाले.

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी शेवटच्या ५ मिनिटांत मतदान करू

धान उत्पादक शेतकरी देखील चार ते पाच लाख असून, केंद्र सरकार धान खरेदी बंद करत आहे. केंद्रानं खरेदी सुरू करावी, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली पाहिजे. खरेदी होत नसेल तर, किमान चार हजार रुपये प्रती एकर मदत हरभरा आणि धान उत्पादक शेतकऱ्यांना दिली पाहिजे. तसे झाले नाही तर, आम्ही राज्यसभेसाठी शेवटच्या पाच मिनिटांत मतदान करू, असा इशारा बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

आमदार रवी राणा यांना टोला

दरम्यान, बच्चू कडू यांनी आमदार रवी राणा यांना टोला लगावला आहे. रवी राणा यांच्या संपर्कात कोण आहे, हे शोधण्यासाठी संशोधन करावं याकरिता आयुक्तांना पत्र देणार आहे, असं बच्चू कडू म्हणाले. राज्यसभेची निवडणूक होत असून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजप आणि शिवसेनेसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे.


हेही वाचा : सुप्रिया सुळेंचा आरोप म्हणजे वेड घेऊन पेडगावला जाणं, अतुल भातखळकरांचा टोला