घरमहाराष्ट्र...तर जनतेचा निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास उडेल - पवार

…तर जनतेचा निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास उडेल – पवार

Subscribe

शरद पवारांचे खळबळजनक वक्तव्य

जर बारामतीची जागा भाजपने जिंकली तर लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास उडेल, असे खळबळजनक वक्तव्य राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केले. शरद पवार यांच्या या विधानानंतर आता पवारांना बारामतीचा गड गमावण्याची धास्ती वाटते का, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

काही जणांनी ईव्हीएममधील चीपमध्ये छेडछाड होऊ शकते, अशी माहिती आपल्याला दिली. गुजरात, मध्य प्रदेशात अशा प्रकारच्या घटना घडल्याचे वाचनात आले. मात्र आपल्याकडे याबाबत खात्रीलायक माहिती नाही, असे पवार म्हणाले. ज्यांनी कधी निवडणूक लढवली नाही, तेही बारामतीची जागा जिंकण्याचे धाडसाने सांगतात, त्यामुळे तंत्रज्ञानाच्या मदतीने काही नियोजन केले आहे का, अशी शंका अनेकांच्या मनात असल्याचे पवार म्हणाले.

- Advertisement -

दुर्दैवाने निवडणूक आयोगाबद्दल सध्या येणार्‍या बातम्या चांगल्या नाहीत. त्यामुळे असे काही घडले तर लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास उडेल, अशी भीती व्यक्त करतानाच पवारांनी निवडणूक यंत्रणेवर लोकांचा विश्वास कायम राहायला हवा, असे मत व्यक्त केले. बारामतीमधून शरद पवार यांची कन्या आणि राष्ट्रवादीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे पुन्हा एकदा रिंगणात आहेत. सुप्रिया सुळे सलग दुसर्‍यांदा खासदारपदी आहेत. त्यांच्याविरोधात भाजपने रासप आमदार राहुल कुल यांची पत्नी कांचन कुल यांना तिकीट दिले आहे. कांचन कुल पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात आहेत.

पवार राजकारणातील वार्‍याचा वेग लवकर ओळखतात अशी त्यांची खासियत आहे. त्यामुळेच ते ईव्हीएकडे बोट दाखवत आहेत. पवारांना पराभवाची चाहूल लागली आहे.
– गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री

- Advertisement -

शरद पवारांनी अशी विधान करण्यापेक्षा अगोदर त्यांनी आपल्या पराभवाची कारणे लिहायला घेतली पाहिजे. याही परिस्तिथीत राष्ट्रवादी पक्षाचे खासदार निवडून आल्यास ईव्हीएम घोटाळा नाही पण आमचे खासदार निवडून आल्यास ईव्हीएम घोटाळा याला काय म्हणायचे? ईव्हीएम आणले कुणी, तर काँग्रेसने. हा देश कायद्याने चालतो, निवडणूक आयुक्त स्वायत्त आहे. त्याला केवळ कोर्टच सांगू शकते. कोर्टाने त्यांना ईव्हीएम बंद करण्यास सांगावे आणि लोकांनी हात वरती करून मतदान करावे आमचे काही एक म्हणणे नाही.
– चंद्रकांत पाटील, महसूल मंत्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -