घरमहाराष्ट्रनाशिकरामरथ सोहळ्यात लोटला भक्तिसागर; "जय सीता, राम सीता" जयघोषात दुमदुमली नगरी

रामरथ सोहळ्यात लोटला भक्तिसागर; “जय सीता, राम सीता” जयघोषात दुमदुमली नगरी

Subscribe

नाशिक : सियावर रामचंद्र की जय.., जय सीता, राम सीता.. अशा जयघोषात नाशिकचा ग्रामउत्सव अर्थात श्रीराम व गरुड रथोत्सवाची सुरुवात झाली. रविवारी (दि.२) सायंकाळी मोठ्या भक्तिभावा व उत्साहात श्रीराम रथोत्सवाला प्रारंभ झाला.

रामनामाच्या जयघोषाने संपूर्ण पंचवटी परिसर दणाणून गेला होता. यावेळी शहरातील अनेक राजकीय नेत्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. चैत्र कामदा एकादशीला श्रीराम व गरुड रथोत्सव होतो. यंदाचे उत्सवाचे मानकरी असलेल्या समीर बुवांना पांढरा फेटा बांधण्यात आला. नारळ फोडून व आरती केल्यानंतर दास हनुमान मूर्ती बाहेर काढण्यात आली. श्रीराम मूर्ती, चांदीच्या पादुका हातात घेऊन समीरबुवांनी मंदिराला प्रदक्षिणा घालत मूर्ती चांदीच्या पालखीत ठेवली. त्यानंतर आरती करून संध्याकाळी सहा वाजता काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजाबाहेर उभे दोन्ही रथ ओढून रथोत्सवाला सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रभू रामचंद्रांच्या जयघोषाने अवघी पंचवटी रामनामात न्हावून निघाली होती.

- Advertisement -

उत्सवाचे मुख्य मानकरी देवाला पाठ दाखवत नाहीत म्हणून संपूर्ण रथयात्रेमध्ये देवतांसंमुख असतात व रथयात्रा मार्गावर उलटे चालतात. रथोत्सवासाठी आमदार राहुल ढिकले, उपनेते सुनील बागूल, विनायक पांडे, दशरथ पाटील, वसंत गीते, रुची कुंभारकर, रामसिंग बावरी, बाळासाहेब सानप, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त गंगाधर सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, माजी नगरसेवक, राजकीय पदाधिकार्‍यांसह नाशिककरांनी दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी केली होती.

रथावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रथासमोर भगवे ध्वज, पताका, सनई चौघडा, झांज, ढोल-ताशे वाजत असल्याने अवघे वातावरण भक्तीमय झाले होते. ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करून रथांचे स्वागत करण्यात येत होते. संपूर्ण रथ मार्गावर रांगोळ्या, ठिकठिकाणी भव्य कमानी उभारून परिसर मंगलमय करण्यात आला होता. रथमार्गावरील अनेक मंडळांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते. संपूर्ण पंचवटी परिसर रामभक्तीने ओसंडून वाहत होता. अनेक नागरिक हे आपल्या मोबाईल मध्ये सेल्फी घेत होते.

- Advertisement -

रथाच्या मार्गावर अनेक मंडळानी स्वागत करण्यासाठी स्टेज उभारले होते. श्रीराम रथ जसजसा पुढे सरकत होता तसतशी गर्दीदेखील वाढत होती. रथाचे ठिकठिकाणी पूजन आणि आरती करण्यात येत होती. तसेच, फुलांची उधळण केली जात होती. गरुड रथाचे रोकडोबा तालीम येथे आगमन झाल्यावर आरती करण्यात आली. त्यानंतर गरुड रथ शहराच्या दिशेने मार्गस्थ झाला. तर, श्रीराम रथ नदी पार करत नसल्याने तो गौरी पटांगणात उभा राहिला. शहराची प्रदक्षिणा करून गरुड रथाचे गौरी पटांगणात आगमन झाले. त्यानंतर या ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

दोन्ही रथ रामकुंडावर झाल्यावर उत्सवमूर्तींची अमृत पूजा, पंचामृत अभ्यंगस्नान, अवभृत स्नान व महापूजा करण्यात आली. रथोत्सवाच्या दिवशी भाविकांनादेखील या उत्सवमूर्तीना स्नान घालण्यासाठी परवानगी दिली जाते. रथोत्सवानिमित्त परिसरात अनेकांनी लहान मुलांसाठी पाळणे, खेळणी फुगे इ.ची दुकाने थाटल्याने गोदाघाटाला यात्रेचे स्वरूप आले होते. गर्दीच्या नियोजनासाठी पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक पोलिस आयुक्त गंगाधर सोनवणे व पंचवटीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. रथोत्सवासाठी तीन पोलीस अधिकारी आणि १४७ पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -