राज्यसभेसाठी भाजपकडून उमेदवार जाहीर, पियूष गोयल आणि अनिल बोंडेंना संधी

राज्यसभेसाठी भाजपकडून केंद्रीय मंत्री पियूष गोयल (Piyush Goyal) आणि माजी मंत्री अनिल बोंडे (Anil Bonde) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. परंतु भाजपकडून तिसऱ्या उमेदवाराबाबत सस्पेन्स अद्यापही कायम आहे. भाजप राज्यसभेसाठी तिसरा उमेदवार देणार असल्याची चर्चा असताना देखील त्यांनी तिसरा उमेदवार दिलेला नाहीये. महाराष्ट्रातून फक्त पियुष गोयल आणि अनिल बोंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना राज्यसभेसाठी पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. तर माजी मंत्री अनिल बोंडे हे याआधी माजी कृषी मंत्री होते. विदर्भातील एक मोठं नाव भाजपसाठी होतं आणि अपेक्षेप्रमाणे अनिल बोंडेंना भाजपने संधी दिली आहे. खरं तर राज्यसभेच्या निवडणुकीसाठी तिसरा उमेदवार भाजप देणार असल्याची चर्चा होती. त्याबाबतचे संकेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वेळोवेळी केले होते. मात्र, सध्यातरी भाजपने तिसरा उमेदवार दिलेला नाहीये. त्यामुळे राज्यसभेच्या दहा जागांसाठी जी निवडणूक होत आहे, ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मध्य प्रदेशातून कविता पाटीदार यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. निर्मला सीतारामन आणि जगेश यांना कर्नाटकमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर राजस्थानमधून घनश्याम तिवारी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात पक्षाने सुरेंद्र सिंह नागर, बाबुराम निषाद, दर्शना सिंह आणि संगीता यादव यांना उमेदवारी दिली आहे. उत्तराखंडमधून डॉ. कल्पना सैनी यांनी उमेदवारीची संधी देण्यात आली आहे. तर बिहारमधून सतीश दुबे आणि शंभू पटेल यांनी उमेदवारी देण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीराजेंची नाराजी 

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवरुन राज्यात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी संभाजीराजे यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश न करण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही, अशी नाराजी संभाजीराजे यांनी व्यक्त केली आहे.

शिवसेनेकडून दोन उमेदवारांना संधी

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून दोन उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना संधी देण्यात आली आहे.


हेही वाचा : आमचे आमदार फुटले नाही, तुमचं नशीब फुटलंय ते बघा, राऊतांचा भाजपवर घणाघात