घरमहाराष्ट्रयाकूब मेमनच्या कबरीचे सुशोभीकरण : भाजपाची मविआवर टीका, शिवसेना व काँग्रेसकडून पलटवार

याकूब मेमनच्या कबरीचे सुशोभीकरण : भाजपाची मविआवर टीका, शिवसेना व काँग्रेसकडून पलटवार

Subscribe

मुंबई : मुंबईत 1993साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी फाशी देण्यात आलेल्या याकूब मेमन याच्या कबरीचे सुशोभीकरण करण्यात आल्याचे वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिले. मात्र यावरून भाजपा आक्रमक झाली असून भाजपा नेत्यांनी महाविकास आघाडीला लक्ष्य केले आहे. तर दुसरीकडे, मुंबई पोलिसांनी लगेच हालचाल करत या कबरीवरील एलईडी लाइट्स हटविले.

- Advertisement -

बाबरी मशीद पाडल्यानंतर 1992मध्ये देशभरात दंगली उसळल्या होत्या. त्यातूनच टायगर मेमनने 1993मध्ये मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवले. यात 257 जणांनी आपला जीव गमावला होता. बॉम्बस्फोट प्रकरणात आर्थिक सहभाग आढळल्यानंतर याकुब मेमनला न्यायालयाने दोषी ठरवले होते. सर्वोच्च न्यायालयाने क्षमायाचनेच्या याचिका फेटाळल्यानंतर याकूबला 30 जुलै 2015 रोजी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात फाशीची शिक्षा देण्यात आली होती. मृतदेह दक्षिण मुंबईच्या मरिन लाईन्स परिसरातील बडा कब्रस्तानमध्ये दफन करण्यात आला होता. त्याच्या कबरीवर लायटिंग आणि संगमरवर बसविण्यात आल्याचे समोर आले. ही जागा ‘बेरियल वक्फ बोर्डा’च्या अख्यत्यारीत आहे.

आता त्यावरून राजकारण रंगले असून भाजपा आमदार राम कदम यांनी याचे फोटो ट्वीट करत, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादाने हे घडले की मुंबई प्रेमातून? हीच त्यांची देशभक्ती आहे का? असे सवाल त्यांनी ट्विटरद्वारे विचारला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना या कबरीचे ‘मजार’मध्ये रुपांतर झाले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी याबद्दल जनतेची माफी मागावी, अशी मागणी कदम यांनी केली आहे.

- Advertisement -

शिवसेनेचे प्रत्युत्तर
भाजपाच्या या प्रश्नांना शिवसेनेने प्रत्युत्तर दिले. मुंबई आणि मुंबईकरांना धुळीस मिळवण्याचे मनसुबे रचणाऱ्या याकूब मेमनच्या कबरीचे उदात्तीकरण करण्याचे काम सुरू असल्याचे वृत्त पाहिले. हे काम त्वरित थांबवून या कामाची चौकशी सरकारने करावी, हे धाडस कोणाकडून झाले हे पण समोर यायला हवे, असे ट्वीट विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले आहे.

काँग्रेसचे भाजपाकडे बोट
सर्वात मोठी चूक ही भाजपची असून त्यांनी ती जाणीवपूर्वक केली, असा थेट आरोप काँग्रेसने केला आहे. भाजपाला देशात शांततेचे वातावरण नको आहे. अफजल गुरु आणि अजमल कसाब या दोन कुख्यात दहशतवाद्यांना फाशी दिल्यावर त्यांचे दफन करण्यात आले होते. पण भाजपाने याकूब मेमनचा मृतदेह मात्र त्याच्या कुटुंबीयांना का दिला? त्याच्यावरील अंत्यसंस्काराचा गाजावाजा का होऊ दिला? असे सवाल काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केले आहेत.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -