बहुजनांसाठी फडणवीसांनी केलेले काम कुणी झाकू शकत नाही; पडळकरांकडून कौतुकाचा वर्षाव

bjp mlc gopichand padalkar praised deputy cm devendra fadanvis for bahujan samaj

मागील काही वर्षांपासून मराठा समाजाच्या आरक्षणाप्रमाणे धनगरांच्या एसटी आरक्षणांचा मुद्दाही प्रलंबित आहे. मात्र भाजप सरकारच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे जे आदिवासींना ते ते धनगर समाजाला मिळेल या धोरणातंर्गत धनगर समाजासाठी 22 योजन लागू केल्या. त्यासाठी तेव्हा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी अर्थसंकल्पात 1 हजार कोटींची आर्थिक तरतूदही केली. मात्र त्यानंतर राज्यात सत्ता बदल होत महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले.

यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारने धनगरांसाठीच्या योजना बंद केल्याचे आरोप सातत्याने केले. मात्र आता पुन्हा एकदा भाजपचं सरकार सत्तेत आले, त्यामुळे धनगरांच्या बंद केलेल्या योजना पुन्हा सुरु करण्यासाठी पडळकरांनी पाठपुरावा केला, त्याबाबत गोपीचंद पडळकर यांनी ट्विट करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे. पडळकरांनी ट्विट करत म्हटले की, ‘जे जे आदिवासींना ते ते धनगर समाजाला’या धोरणांतर्गत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजासाठी लागू केलेल्या २२ योजना प्रस्थापितांनी बंद केल्या होत्या.त्याआता परत लागू करण्याचे साहेबांनी आदेश दिले आहेत.तुम्ही बहुजन समाजासाठी केलेलं काम कुणी झाकू शकत नाही. जय मल्हार… अशा शब्दात पडळकरांनी फडणवीसांचे कौतुक केले आहे.

दरम्यान शिंदे- फडणवीस सरकारने याबाबत एक परिपत्रक काढून मागास बहुजन कल्याण संचालनालयाला माहिती दिली आहे. यात धनगर समाजासाठी लागू केलेल्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. यात मंत्रिमंडळाच्या 30 जुलै रोजीच्या बैठकीतील निर्णयांच्या अनुषंगाने आदिवासी विकास विभागातर्फे अनुसूचित जमातीसाठी सुरु असलेल्या योजनांप्रमाणे धनगर समाजासाठीही योजना लागू कराव्यात अश्याही सुचना दिल्या आहेत.


लहान मुलांचा दहीहंडीच्या थरासाठी वापर करू नका; महिला व बालविकास मंत्र्यांची मागणी