राज्य सरकारला जागे करण्यासाठी भाजपाचे ‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलन

devendra fadnavis
देवेंद्र फडणवीस

‘राज्यातील, विशेषतः मुंबईतील कोरोनाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून, राज्य सरकार निष्क्रीय झाले आहे. राज्यातील महाविकास आघाडीला जागे करून कोरोना रोखण्यासाठी काम करण्यास भाग पाडण्याच्या हेतूने भारतीय जनता पार्टी मंगळवारपासून राज्यभर ‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलन करणार आहे’, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला. महाविकास आघाडी सरकारला जागे करण्यासाठी मंगळवारी भाजपाचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी मुख्यमंत्री तसेच राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना निवेदन देणार आहेत. तर शुक्रवार, २२ मे रोजी लाखो कार्यकर्ते आपापल्या घराबाहेर हातात फलक घेऊन उभे राहतील आणि राज्य सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध करतील. इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्यानेही हातावर पोट असलेल्यांसाठी स्वतंत्रपणे पॅकेज जाहीर करावे ही पक्षाची प्रमुख मागणी असल्याचे फडणवीस म्हणालेत.

महाराष्ट्र आणि मुंबईत कोरोनाची समस्या हाताबाहेर गेली अशी स्थिती आहे. जबाबदारी घेऊन कोण निर्णय घेत आहे? असा प्रश्न पडतो. राज्यात सर्व काही भगवानभरोसे असल्यासारखी स्थिती आहे. ज्यांना कोरोनाची लागण झाली त्यांना रुग्णालयात प्रवेश मिळून उपचार मिळणे अवघड झाले आहे. गावोगावी अनेक अडचणी आहेत. गरीबांचे, मजुरांचे, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. कोणत्याही प्रश्नावर राज्य सरकार ठाम भूमिका घेत नाही. केंद्र सरकारने चिंता करायची आणि राज्याने काहीच करायचे नाही, अशी स्थिती आहे. सत्ताधारी आघाडीकडून केवळ राजकारण करणे, प्रसिद्धी मिळवणे आणि सोशल मिडायावरून आभासी स्थिती निर्माण करणे चालू आहे. वास्तविक स्थिती ध्यानात घेऊन जनतेचे दुःख मांडावे अशी लोकांची अपेक्षा आहे. राजकारण होऊ नये याचा अर्थ जनतेची दुःखे मांडायची नाहीत असे होत नाही. राज्य सरकारच्या नाकर्तेपणावर आसूड ओढून सामान्यांची दुःखे मांडण्याची आणि त्यांना न्याय मिळवून देण्याची ही वेळ असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

कोरोनाच्या फैलावाची स्थिती गंभीर होत गेली आहे. या अभूतपूर्व संकटात राज्य सरकारला सर्वतोपरी साथ देण्यासाठी भाजपाने सरकारवर टीका टाळली होती. पण दोन महिन्यांच्या लॉकडाऊननंतरही मुंबई, पुणे, मालेगाव, औरंगाबाद, सोलापूर इत्यादी ठिकाणची परिस्थिती अधिकच गंभीर झाल्याने विरोधी पक्ष म्हणून राज्य सरकारला जागे करण्यासाठी आंदोलनाचा निर्णय पक्षाने घेतल्याचे यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणालेत. अशा गंभीर प्रसंगी राज्य सरकारला जाब विचारून काम करण्यास भाग पाडले नाही तर भाजपाने विरोधी पक्ष म्हणून आपले कर्तव्य पार पाडले नाही, असे होईल.

देशभरातील कोरोना रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत आणि राज्यातील संख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबईतील रुग्णसंख्या कोणत्याही अन्य राज्यांपेक्षा जास्त आहे. कोरोनामुळे राज्याच्या राजधानीसह सर्वत्र जनजीवन ठप्प झाले आहे. समाजातील सर्व घटकांना त्याची झळ बसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेजारच्या कर्नाटक आणि अन्य राज्यांनी स्वतः पुढाकार घेऊन सर्वसामान्यांसाठी राज्याच्या तिजोरीतून पॅकेज जाहीर केले. पण महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारने अजूनही काही पॅकेज जाहीर केलेले नाही. कोरोनाचा सामना करण्यासाठी सरकारी यंत्रणेच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याच्या ऐवजी त्यांचे मनोधैर्य खच्ची होईल असा गाफीलपणा सरकारकडून चालू आहे. पोलिसांवरील हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या वाढत आहे, त्यांच्या कुटुंबियांनाही धोका निर्माण झाला आहे, हा चिंतेचा विषय असल्याचेही त्यांनी सांगितले.

आघाडी सरकारच्या निष्क्रियतेमुळे राज्यातील जनतेचा जीव टांगणीला लागला आहे. हातावरचे पोट असणाऱ्यांना रोजगार कधी सुरू होईल याची चिंता आहे. शेतकऱ्यांचा कापूस आणि इतर तयार माल खरेदीविना पडून आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी योजना अपूर्ण राहिल्याने त्यांची चिंता वाढली आहे. नोकरदारांना आपले काम कधी सुरू होईल याची काळजी आहे. उद्योग थंडावले आहेत. व्यापार ठप्प आहे आणि सर्वांनाच भवितव्याची फिकीर आहे. अशा स्थितीत कोरोनाचे राज्यातील संकट वाढतच चालले आहे. मुंबईत महापालिकेकडे ५६ हजार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत आणि शहरात जगातील सर्वोत्तम वैद्यकीय तज्ञ आहेत. तरीही मुंबईत कोरोना रोखण्यात सरकारला अपयश आले आहे. मुंबईला बसलेला कोरोनाचा विळखा कसा सुटणार या काळजीने मुंबईकर धास्तावले आहेत. अशा गंभीर संकटात विरोधी पक्ष म्हणून भाजपा गप्प बसू शकत नाही, त्यामुळेच आंदोलनाचा निर्णय घेण्यात आल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे.