घर उत्तर महाराष्ट्र भाऊबीजेला एसटीचालक भाऊ ऑनड्यूटी; बहिणीने थेट एसटी आडवत केले औक्षण

भाऊबीजेला एसटीचालक भाऊ ऑनड्यूटी; बहिणीने थेट एसटी आडवत केले औक्षण

Subscribe

नाशिक : भाऊबीज हा भावाबहिणीच्या पवित्र नात्यांचा सण, देशभरात हा सण उत्साहात साजरा करण्यात आला. परंतु, काही भाऊबहीण असेही असतात ज्यांना आपल्या कर्तव्यापुढे उत्सवाच्या आनंदावर विरजण घालावे लागते. नाशिकच्या पंचवटी डेपो येथे एसटीचालक असलेल्या विनेश सुरेश जाधव हे सुद्धा अश्याच प्रकारे भाऊबीजेच्या दिवशी आपल्या कर्तव्यावर रुजू होते. जव्हार ते औरंगाबाद या एसटीवर ते आपली सेवा देत होते. जेव्हा त्यांची बस जव्हारकडून औरंगाबादकडे मार्गक्रमण करत होती. त्यावेळी नाशकात बस पोहचल्यावर त्यांना एक आनंदाचा धक्का बसला. त्यांच्या बहिणीने थेट त्यांची बस आडवत त्यांचे औक्षण केले.

एसटी ही अत्यावश्यक सेवेत मोडते, त्यातही सणासुदीच्या काळात एसटीच्या प्रवाश्यांमध्ये मोठी वाढ होत असते. त्यामुळे एसटी महामंडळात कार्यरत असलेल्या चालक-वाहकांना आपली कर्तव्य सेवा बजावणे अनिवार्यच असते. नाशिक तालुक्यातील देवळाली कॅम्प परिसरातील शिंगवे बहुला येथील अंबादास काळे यांचा भाचा असलेले एसटीचालक विनेश जाधव भाऊबीजेच्या दिवशी आपल्या कर्तव्यावर होते. जव्हार कडून औरंगाबादच्या दिशेने जाणारी विनेश यांची एसटी जेव्हा दुपारी २ वाजेच्या सुमारास नाशकात दाखल झाली त्यावेळी मामा अंबादास काळे यांची मुलगी ऋचा हिने थेट आपल्या वडिलांसोबत आपल्या आत्येभावाची एसटी ज्या मार्गाने जाणार आहे. म्हणजेच औरंगाबाद नाका चौफुली गाठली आणि भावाची एसटी त्या चौफुलीवर येताच त्याची बस अडवून आपल्या भावाचे औक्षण केले. या अनोख्या भाऊबीजेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -