‘कॅन्सरमुक्त महाराष्ट्र’ उपक्रम राबवणार, महाराष्ट्रातील ४० वैद्यकीय महाविद्यालयांत…

Maharashtra Assembly Budget 2023 | कॅन्सरमुक्त महाराष्ट्र हा उपक्रम राबवणार असून त्यासाठी चाचण्या आरोग्य विभागातर्फे करण्यात येतील, अशी मोठी घोषणा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आज केली.

tanaji sawant
आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत

Maharashtra Assembly Budget 2023 | मुंबई – देशभरात कर्करोगाचे प्रमाण सातत्याने वाढत आहेत. ब्रेस्ट कर्करोग, मुखाचा कर्करोग आणि सर्वायकल कॅन्सरसारख्या कर्करोगांचं प्रमाण वाढलं आहे. यामुळे मृत्यूंचं प्रमाणही वाढलं आहे. हे प्रमाण घटवण्याकरता प्रयत्न करण्यात यावेत अशी सामायिक सूचना आज विधानसभेत लक्षवेधीत मांडण्यात आली. यावेळी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. कॅन्सरमुक्त महाराष्ट्र हा उपक्रम राबवणार असून त्यासाठी चाचण्या आरोग्य विभागातर्फे करण्यात येतील, अशी मोठी घोषणा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आज केली. तसंच, राज्यातील ४० वैद्यकीय महाविद्यालयात एक वार ठरवून त्या दिवशी कर्करोग तपासणी आणि उपचार शिबिर ठेवले जाणार आहे. त्यामुळे मुंबईतील टाटा रुग्णालयातील भार कमी होऊ शकेल, असंही तानाजी सावंत म्हणाले.

हेही वाचा शीतल म्हात्रे व्हिडीओप्रकरणी सभागृहात महिला आमदार आक्रमक, अध्यक्षांनी दिले निर्देश

“वैद्यकीय शिक्षण विभागाच्या महाविद्यालयात कॅन्सरसाठी एक दिवस ठरवला जाईल. त्या दिवशी कॅन्सरच्याच तपासण्या केल्या जातील. कॅन्सरमुक्त महाराष्ट्र अभियान राबवू. त्याच्या चाचण्या आरोग्य विभागामार्फत राबवल्या जातील,” अशी माहिती तानाजी सावंत यांनी दिली.

कर्करोगाचे लवकर निदान झाल्यावर त्यावर मात करता येते. त्यामुळे कर्करोगाच्या पहिल्याच किंवा त्याआधीच्या टप्प्यात त्याचे निदान झाल्यास रुग्णांना फायदा मिळू शकेल. याकरता कोणते लसीकरण सुरू करणार का असा प्रश्न माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना तानाजी सावंत म्हणाले की, महाराष्ट्रात वयोगट ९ ते १४ वर्षातील मुलींना HPV लस देण्यात येणार आहे. यामुळे सर्वायकल कॅन्सरवर आळा घालता येईल. हा उपक्रम राबवण्याकरता तज्ज्ञ समिती स्थापन होणार असून त्यांचा अहवाल आल्यानंतर कार्यवाही करण्यात येईल, असंही आश्वासन यावेळी देण्यात आले.