महाराष्ट्रात मागणीपेक्षा अधिक मास्क, पीपीई किट्स ऑक्सिजनचा पुरवठा – चंद्रकांत पाटील

महाराष्ट्राला सर्वाधिक व्हेंटिलेटर्स

Chandrakant Patil

देशात कोरोनाची दुसरी लाट धुमाकूळ घालत आहे. यामध्ये आज तौत्के चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्राला बसला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने रुग्णांची अधिक नोंद होत आहे. वाढत्या कोरोनाबाधितांना उपचारासाठी मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन, पीपीई किट, मास्कचा तुटवडा पडत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी राज्य सरकारांना केंद्र सरकार मदत करत आहे. महाराष्ट्राने केलेल्या ऑक्सिजन पुरवठ्याच्या मागणीपेक्षा अधिक ऑक्सिजन पुरवठा केंद्र सरकारने केला असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

राज्याला १७५० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज असल्यामुळे महाराष्ट्राला अधिकचा ऑक्सिजन पुरवण्यात यावा अशी मागणी राज्य सरकारने केंद्र सरकारला केली होती. यामध्ये महाराष्ट्रात १२५० मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादित केला जातो. उर्वरित ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची मागणी राज्य सरकारने केली होती. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत म्हटले आहे की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी राज्य सरकारांना केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करत आहे. महाराष्ट्रात राज्य सरकारने ऑक्सिजनच्या केलेल्या मागणीपेक्षा अधिक पुरवठा करण्यात आला आहे.

कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत भारताला जगभरातून व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन काँसंट्रेटर, ऑक्सिजन सिलेंडर, ऑक्सिजन निर्मिती प्लांट आणि रेमडेसिवीर आणि टोसिलीझुमॅब सारखी औषधे पुरवली आहेत. वसुधैव कुटुंबकम ही भावना वृद्धिंगत करतच कोरोना विरुद्ध चाललेली ही लढाई आपण जिंकू शकतो.

कोविड योद्धांसाठी मास्क आणि पीपीई किट्स

आपल्या फ्रंटलाईन कोविड योद्धांसाठी मास्क आणि पीपीई किट्स हे सगळ्यात मूलभूत संरक्षणात्मक उपकरणे आहेत. केंद्र सरकारने संपूर्ण सहकार्य करत देशातील इतर राज्यांपेक्षा जास्त मास्क आणि पीपीई किटस महाराष्ट्राला दिल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक मदत पीएम केअर फंडच्या माध्यमातून करण्यात आली. भविष्यातही केंद्र सरकार सदैव मदतीचा हात सर्वात आधी पुढे महाराष्ट्रासाठी करेल, असे आश्वासन मी पूर्ण विश्वासासह संपूर्ण महाराष्ट्राला देत आहे.

महाराष्ट्राला सर्वाधिक व्हेंटिलेटर्स

पीएम केअर्स फंडच्या माध्यमातून महाराष्ट्राला ५५०० हून अधिक व्हेंटिलेटर्स देण्यात आले आहेत. देशातील विविध राज्यांपैकी महाराष्ट्राला सर्वाधिक व्हेंटिलेटर्स पाठविण्यात आले आहेत. जी व्हेंटिलेटर्स पाठविण्यात आले होते, त्याच्या नमुन्याचे ऑडिट करण्यात आले. विरोधकांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी…. ही व्हेंटिलेटर्स भाजपाची नसून ती एक राष्ट्रीय संपत्ती आहे. त्यामुळे याचा योग्य प्रकारे उपयोग करुन त्याचा फायदा सामान्य जनतेला मिळाला पाहिजे हे पाहण्याची जबाबदारी ही राज्य सरकराची आहे. संबंधित मेडिकल टीमला योग्य प्रशिक्षण देऊन प्रत्येक व्हेंटिलेटरचा उपयोग योग्य पध्दतीने होईल, अशी मी आशा व्यक्त करतो.