घरमहाराष्ट्रउमेदवारीला अनुमोदन देण्यास १० आमदारांचे संख्याबळही नाही!

उमेदवारीला अनुमोदन देण्यास १० आमदारांचे संख्याबळही नाही!

Subscribe

उमेदवारीला अनुमोदन देण्यासाठी म्हणून १० आमदारही मागे नसल्याने छत्रपती संभाजीराजे हे राज्यसभा निवडणुकीतून माघार घेणार असल्याची चर्चा आहे. राज्यसभेसाठी शिवसेनेकडून गुरुवारी संजय राऊत आणि संजय पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले, पण छत्रपती संभाजीराजेंनी उमेदवारी अर्ज अद्याप भरलेला नाही.

उमेदवारीला अनुमोदन देण्यासाठी म्हणून १० आमदारही मागे नसल्याने छत्रपती संभाजीराजे हे राज्यसभा निवडणुकीतून माघार घेणार असल्याची चर्चा आहे. राज्यसभेसाठी शिवसेनेकडून गुरुवारी संजय राऊत आणि संजय पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले, पण छत्रपती संभाजीराजेंनी उमेदवारी अर्ज अद्याप भरलेला नाही. उमेदवारीला अनुमोदन देण्यास १० आमदारांचे संख्याबळही पाठिशी नसल्यानेच त्यांनी उमेदवारी अर्जदेखील भरला नसल्याचे बोलले जाते. खरे तर संभाजीराजेंना अद्याप कोणत्याच पक्षाने पाठिंबा दिलेला नाही. त्यामुळे ही परिस्थिती कायम राहिल्यास संभाजीराजे यांना राज्यसभा निवडणुकीतून माघार घ्यावी लागणार आहे, कारण उमेदवारी अर्जच दाखल करण्यासाठी १० आमदार सूचक म्हणून लागतात, पण कुठल्या पक्षाचा पाठिंबा नसल्याने संभाजीराजे हे १० आमदार कुठून आणणार हा प्रश्नच आहे. सध्या महाविकास आघाडीच्या जवळ ८, तर विरोधात भाजपकडे ५ अपक्ष आमदार आहेत, पण संभाजीराजेंना अद्यापही कुठल्या आमदाराने पाठिंबा दिलेला नाही. त्यामुळे एक तर शिवसेनेचा पर्याय स्वीकारणे किंवा राज्यसभा निवडणुकीतून माघार घेणे, सध्या हे दोनच पर्याय त्यांच्यापुढे आहेत. यंदा विधानसभेत ८ अपक्ष आमदारांचे संख्याबळ आहे.

आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या ‘बहुजन विकास आघाडी’कडे ३ आमदार आहेत. प्रहार जनशक्ती, एमआयएम, समाजवादी पक्ष यांच्याकडे प्रत्येकी २ आमदारांचे संख्याबळ आहे. मनसेकडे १ आमदार आहे. माकप, जनसुराज्य शक्ती, क्रांतिकारी शेतकरी पक्ष, शेकाप, रासप, स्वाभिमानी या सर्व पक्षांकडे एक-एक आमदार आहेत. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे शिवसेनेचे संख्याबळही १ आमदाराने कमी झाले आहे. सध्याच्या विधानसभेच्या संख्याबळानुसार भाजपकडे १०६, शिवसेना ५५, राष्ट्रवादी ५४, काँग्रेस ४४, बहुजन विकास आघाडी ०३, प्रहार जनशक्ती ०२, एमआयएम ०२, समाजवादी पक्ष ०२, मनसे ०१, माकप ०१, जनसुराज्य शक्ती ०१, क्रांतिकारी शेतकरी पक्ष ०१, शेकाप ०१, रासप ०१, स्वाभिमानी ०१, अपक्ष १३ आमदार आहेत, परंतु अपक्ष १३ सोडाच इतर बहुजन विकास आघाडीसारखे इतर छोटे पक्षही संभाजीराजेंच्या बाजूने नाहीत. त्यामुळे संभाजीराजेंच्या उमेदवारीला अनुमोदन देण्यासाठी त्यांच्याकडे १० आमदारही नाहीत. त्यामुळेच संभाजीराजे उमेदवारी मागे घेणार असल्याची चर्चा आहे.

- Advertisement -

राज्यसभेसाठी ३१ मेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. विधानसभेतील आमदारांच्या संख्येनुसार भाजपला २, शिवसेनेला १, काँग्रेसला १, राष्ट्रवादीला १ अशा जागा मिळू शकतात. राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी ४१ आमदारांच्या मतांची गरज असते. विशेष म्हणजे महाविकास आघाडीकडे २७ मते अतिरिक्त असली तरी भाजपकडे २२ मते शिल्लक आहेत. त्यामुळे सर्वपक्षीय आमदारांच्या उरलेल्या संख्येनुसार जर संभाजीराजेंना पाठिंबा दिला तरी संभाजीराजे निवडून येणे मुश्कील आहे. राज्यसभेसाठी शिवसेनेकडून संजय पवार यांनी उमेदवारी अर्ज गुरुवारी दाखल केला असला तरी त्याला दबावाचा एक भाग समजले जाते. म्हणून अजूनही संभाजीराजे आपले उमेदवार होतील, ही शिवसेनेला आशा आहे. संभाजीराजे यांना शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून संधी दिली जावी, यासाठी हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे शिवसेना त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिल्यास राज्यसभेची उमेदवारी मागे घेऊन महाराष्ट्रात स्वराज्य संघटनेची पाळेमुळे रुजवण्याचे ते प्रयत्न करू शकतात, पण त्यांची भूमिका अद्यापही गुलदस्त्यात आहे.

पवार तोडगा काढणार?
विशेष म्हणजे राजकारणातले चाणक्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे यातून काही तोडगा काढतील अशी चर्चा आहे, परंतु शरद पवारही एका मर्यादेपलीकडे प्रयत्न करू शकत नाहीत, कारण राज्यसभेची ही जागा राष्ट्रवादीची नव्हे, तर शिवसेनेची आहे. मागील दोन वर्षांपूर्वी शरद पवार आणि फौजिया खान यांच्या राज्यसभेच्या निवडणुकीवेळी शिवसेनेने पवार यांचा शब्द मानून आपली वाढीव मते त्यांच्या पारड्यात टाकली होती. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसला वेगळी काही भूमिका घेणे शक्य नाही. दुसरीकडे भाजपही सध्या त्यांना राज्यसभेवर निवडून आणू शकत नाही. तसेच इतर कोणाची खासदारकी काढून त्यांनाही खासदार म्हणून करणार नाहीत. त्यामुळे संभाजीराजे कोणता मार्ग स्वीकारतात, हे त्यांच्या राजकीय वाटचालीचीही दिशा ठरवणारे आहे.

- Advertisement -

संभाजीराजे आज भूमिका स्पष्ट करणार
दरम्यान संभाजीराजे छत्रपती यांना पाठिंबा न देता शिवसेनेने राज्यसभा निवडणुकीत आपला उमेदवार उतरवल्याने त्यांची कोंडी झाली आहे. त्यातच अपक्ष लढण्यासाठी त्यांना १० आमदारांच्या स्वाक्षर्‍या आवश्यक आहेत, मात्र महेश बालदी आणि मनसेचे आमदार राजू पाटील या दोघांच्या सह्या त्यांना मिळाल्या आहेत. त्यातच भाजपकडूनही त्यांना पाठिंबा मिळण्याची शक्यता दिसत नसल्याने त्यांची राज्यसभेवर जाण्याची वाट बिकट बनली आहे. यासंदर्भात संभाजीराजे आज, शुक्रवारी सकाळी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर करणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -