घरमहाराष्ट्रजिल्ह्यांच्या सीमा बंदच राहणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संकेत

जिल्ह्यांच्या सीमा बंदच राहणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संकेत

Subscribe

शरद पवारांच्या उपस्थितीत लॉकडाऊनचा आढावा

येत्या १८ मे पासून सुरू होणार्‍या लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात जिल्ह्यांच्या सीमा बंदच राहणार असल्याचे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दिले. जिल्ह्यांच्या सीमा न उघडता मर्यादित स्वरूपात आणि पुरेशी काळजी घेऊनच पुढील चौथ्या टप्प्याचे नियोजन करावे लागेल,असे ठाकरे यांनी सांगितले.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी करोनाचा प्रादुर्भाव, लॉकडाऊन, त्याचे पुढच्या टप्प्यातील नियोजन, आर्थिक व्यवहार सुरू करणे आदी प्रमुख मुद्यांवर बैठक घेऊन चर्चा केली. १८ मे पासून कोणत्या भागात शिथिलता आणायची, रेड झोन, प्रतिबंधित क्षेत्रात बंधने कशा रीतीने पाळायची यावरही विचार झाला.

रविवार, १७ मे रोजी लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपत आहे. गेले ५५ दिवस लॉकडाऊन सुरू आहे. केंद्र सरकार कशा स्वरूपात लॉकडाऊनचा चौथा टप्पा ठरवणार ते पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल, असेही ठाकरे यांनी सांगितले. राज्याला ज्या महत्त्वपूर्ण सूचना करायच्या आहेत त्याचाही आढावा बैठकीत घेण्यात आला. मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून राज्य सरकारने कशी वेगाने पाऊले उचलली तसेच त्याचे सकारात्मक परिणाम काय दिसले, याची माहिती ठाकरे यांनी यावेळी दिली. संकट अजून टळलेले नाही. डॉक्टर्सच्या टास्क फोर्सची मदत आपण घेतो आहोत, असेही ठाकरे म्हणाले.दादर येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकात पार पडलेल्या बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजोय मेहता उपस्थित होते.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -