घरमहाराष्ट्ररोहेकर विरुद्ध रोहेकर

रोहेकर विरुद्ध रोहेकर

Subscribe

सिटिझन फोरमला राष्ट्रवादीचा विरोध

येथील कुंडलिका नदी संवर्धन व अन्य कामात नगर परिषद मुख्याधिकार्‍यांच्या कथित बेकायदेशीर मनमानीला विरोध म्हणून रोहे-अष्टमी सिटिझन फोरम मंगळवारी, 28 ऑगस्ट रोजी थेट नगरविकास खात्याची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढणार आहे. स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षांचे कार्यकर्ते मात्र याला कडाडून विरोध करतील, असा स्पष्ट इशारा खा. सुनील तटकरे यांनी दिला आहे. त्यामुळे रोहेकर विरुद्ध रोहेकर अशी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. यात कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण शहरासह तालुक्याचे लक्ष लागले आहे.

मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांचे बदली प्रकरण व ते चुकीची व नियमबाह्य कामे करीत असल्याचा आरोप फोरमने केला आहे. हे आंदोलन कोणताही पक्ष अथवा व्यक्तीविरोधात नसल्याने चव्हाण यांचा निषेध म्हणून नगरविकास खात्याची अंत्ययात्रा काढण्यात येणार असल्याचे फोरमकडून स्पष्ट करण्यात आले. मात्र नगरविकास खात्यालाच थेट तिरडीवर घेण्याला खा. तटकरे यांनी आक्षेप घेतला आहे. मुख्यमंत्री हे नगरविकास खात्याचे प्रमुख असल्याने आपण नेमके काय करतोय, याचे भान फोरमने ठेवावे, असे त्यांनी येथे पत्रकार परिषद घेऊन बजावले.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षांना ही कृती अमान्य असल्याचे सांगून, खा. तटकरे यांनी या अंत्ययात्रेला परवानगी द्यावी की नाही हा प्रशासनाचा प्रश्न आहे. आम्ही मात्र रस्त्यावर उतरून याला समोरासमोर विरोध करू, असा इशारा दिला. मुख्याधिकार्‍यांच्या नियुक्तीचे पत्र मुख्यमंत्र्यांच्या सहीने आल्याचे तरी या फोरमवाल्यांना माहीत आहे का, असा टोला त्यांनी लगावला. यावेळी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, उपनगराध्यक्ष महेंद्र दिवेकर, गटनेते महेंद्र गुजर, सभापती महेश कोलटकर व समीर सकपाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मधुकर पाटील व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

रोहे-अष्टमी सिटिझन फोरममध्ये विविध राजकीय पक्षांशी संबंधित व्यक्तींसह इतरांचा समावेश आहे. फोरमने मुख्याधिकार्‍यांना लक्ष्य केले असले तरी त्यांचा रोख खा. सुनील तटकरे यांच्यावर असल्याने नथीतून तीर मारण्याचा हा प्रकार असल्याचे याकडे तटस्थ भूमिकेतून पाहणार्‍यांचे म्हणणे आहे. तटकरे विरोधाला मिळालेली ही आयती फोडणी असल्याचेही ते सांगतात. याबाबत फोरमकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -