पंतप्रधानांवर आरोप करणाऱ्यांना फळं भोगावी लागतात; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

संग्रहित छायाचित्र

 

बंगळूरुः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करणाऱ्यांना फळं भोगावी लागतात. तुम्ही बघतिलंच आहे, असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंगळूरु येथील कार्यक्रमात केला.

मुख्यमंत्री शिंदे हे कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा प्रचार करायला गेले आहेत. प्रचार करत असताना मुख्यमंत्री शिंदे यांनी बंगळूरु येथील महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांचे तोंडभरुन कौतुक केले. पंतप्रधान मोदी हे कोणा एका पक्षाचे नाहीत. ते देशाचे आहेत. त्यांच्या नेतृत्त्वात देश बलशाली होत आहे. भारताची अर्थव्यवस्था त्यांनी ११ व्या क्रमांकावरुन ५ व्या क्रमांकावर आणली आहे. जगावर आर्थिक संकट असताना पंतप्रधान मोदी यांनी ही कामगिरी केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आधी कोणाला भेटत नव्हते. पंतप्रधान मोदी हे त्यांना भारतात घेऊन आले. हे केवळ पंतप्रधान मोदीच करु शकतात, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी हे दोनदा मुंबईत आले होते. त्यावेळी अनेकांच्या पोटात दुखत होते. तेव्हा त्यांना बघण्यासाठी शेकडो लोक आले होते. तेव्हा मी त्यांना विचारलं की तुमच्यावर एवढे जण आरोप करतात. तुम्ही त्यांना उत्तर देत नाही. त्यावर ते म्हणाले, माझ्यावर आरोप करणं हे त्याचं काम आहे. मी माझं काम करत राहतो. असे मोदी यांचे विचार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर जे जे आरोप करतात. त्यांना त्याची फळे भोगावी लागतात, असा निशाणाही मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर साधला.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, उदय सामंत यांनी सांगितले की मी संवदेनशील मुख्यमंत्री आहे. पण मी कालही कार्यकर्ता होता. आजही कार्यकर्ता आहे आणि उद्याही कार्यकर्ताच राहणार आहे. मात्र मी आता प्रसिद्ध झालो आहे. तुम्हाला कसली मदत लागली तर नक्की मला हाक मारा, मी तुमच्या मदतीला नक्की येईल. कारण कमी तेथे आम्ही या विचारानेच मी काम करतो.

दावोस येथे गेलो असताना मला जगभरात विखुरलेली मराठी माणसे भेटली. जेथे जेथे मराठी माणसे आहेत तेथे तेथे त्यांना जाऊन भेटायचे आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.