घरCORONA UPDATECM Uddhav Thackeray Live : मिशन बिगीन अगेन..पुन:श्च हरिओम!

CM Uddhav Thackeray Live : मिशन बिगीन अगेन..पुन:श्च हरिओम!

Subscribe

राज्यात लॉकडाऊननंतर मिशन बिगीन अगेन अर्थात पुन:श्च हरिओम करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नवा लॉकडाऊन आणि अनलॉक १, २, ३ कसा असेल, त्याविषयी माहिती दिली.

आत्तापर्यंत ६५ हजारांच्या आसपास रुग्णांची संख्या सांगितली जाते. मात्र, त्यातले २८ हजारांच्या आसपास रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या एकूण रुग्णांमध्ये मोजणं चुकीचं आहे. महाराष्ट्राचं कोरोनाच्या बाबतीत जे काही चित्र निर्माण केलं जात आहे, त्यातून महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न काही आपल्याच लोकांकडून केला जातो, तेव्हा दु:ख होतं.

- Advertisement -

पुढच्या रविवारपासून आपण वृत्तपत्र थेट घरोघरी करण्याची परवानगी देत आहोत. मात्र, हे करताना अशी वृत्तपत्र देणाऱ्या मुलांना आणि विक्रेत्यांना देखील सोशल डिस्टन्सिंग आणि स्वत:च्या संरक्षणाची सर्व काळजी घेणं गरजेचं आहे.

इथून पुढे प्रत्येक पाऊल टाकताना काळजी घेऊन चालावं लागेल. पावसाळ्याचा सामना करण्यासाठी आपण सज्ज आहोत. कुठेही काही आपत्ती आली, तर त्याचा सामना करण्यासाठी आपण सज्ज आहोत. येत्या काही दिवसांत पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे. त्यासाठी आपली यंत्रणा सज्ज आहे. किनारी भागातल्या लोकांना आवाहन आहे की त्यांनी सज्ज राहावं, येत्या ४ ते ५ दिवसांत मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये.

- Advertisement -

वेळेत रुग्णालयात येणं फार गरजेचं आहे. वेळेत आलेले रुग्ण व्हेंटिलेटरवरून देखील खणखणीत बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्ण वेळेत आले, तर डॉक्टर एखाद्या योद्ध्याला साजेल असा पराक्रम करत आहेत आणि रुग्णांना वाचवण्यासाठी पराक्रमाची शर्थ करत आहेत.

ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षा घेण्यासारखी परिस्थिती आजही राज्यात नाही. त्यामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यापूर्वी जितके सेमिस्टर झाले आहेत, त्याची सरासरी काढून त्या विद्यार्थ्यांना मार्क्स देऊन त्यांना पास करायचा निर्णय आपण घेतला आहे. जूनमध्ये परीक्षा घेता येणार नाही. जुलैमध्ये होईल की नाही ते माहीत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना ताटकळत न ठेवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. असे निकाल काढल्यानंतर देखील जर कुणाला वाटलं की मार्क्स कमी आहेत, तर त्यांच्या परीक्षा घेण्याची तयारी आपण ठेवली आहे.

आता बाहेर पडताना पूर्ण वेळ मास्क घालावा लागेल. थोडा वेळही मास्क काढू नका. तोंडाला हात लावू नका. लॉकडाऊन उघडल्यानंतर काही ठिकाणी पुन्हा नियम लागू करावे लागले. पण आपल्याला तसं करायचं नाहीये. एकदा उघडलेली गोष्ट पुन्हा बंद करायला लागू नये. तेवढी स्वयंशिस्त आपण पाळायची आहे.

दुकानं उघडल्यानंतर गर्दी अजिबात करू नका. आपण जे सुरू करू, ते सुरूच ठेवता आलं पाहिजे. देशापुढे आपण एक आदर्श निर्माण करू. तिसऱ्या टप्प्यात कार्यालयं १० टक्के कर्मचाऱ्यांसोबत सुरू करणार आहोत. सध्या आपल्याकडे सर्वाधिक रुग्णांच्या आकड्यापर्यंत पोहोचलो आहोत. येत्या ८ ते १५ दिवसांत ही संख्या खाली उतरायला लागेल. पण त्यासाठी आपण बंधनं पाळणं गरजेचं आहे.

ज्येष्ठ नागरिक आणि विशेषत: ज्यांना मधुमेह किंवा हाय रिस्क गटातल्या लोकांनी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. ५५ ते ६० च्या वरच्या नागरिकांनी आणि ज्यांना हे असे आजार आहेत त्यांनी घराबाहेर पडता कामा नये. इतरांनी घराबाहेर पडल्यावर घरात गेल्यानंतर घरातल्या वृद्धांना आपल्यामुळे कोरोनाची लागण होऊ नये, याची काळजी घेणं गरजेचं आहे.

येत्या काळात आरोग्य आणि शिक्षणाला प्राधान्य देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ग्रामीण भागात देखील हॉस्पिटलची सुविधा तयार ठेवण्यात येईल. आवश्यकता लागेल, तेव्हा तिथे बेड आणि इतर सुविधा देऊन कमीत कमी वेळेत हॉस्पिटल तयार करण्यात येईल. इतर वेळी त्या ठिकाणी इतर कार्यक्रम चालवले जातील. यातून कमीत कमी वेळात दुर्गम भागात देखील तातडीने आरोग्य सुविधा देता येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -