घरमहाराष्ट्र...अन्यथा लॉकडाऊन अटळ

…अन्यथा लॉकडाऊन अटळ

Subscribe

टीकेची परवा नाही, जिद्दीने सामोरे जाऊया

जगात आणि देशात कोरोना संसर्गाची स्थिती भयानक अवस्थेत असली तरी आपण त्याच्यावर मात करण्याच्या तयारीने रस्त्यावर उतरत आहोत. कोरोनाला रोखण्यासाठी हातात हात घालून एकत्रित लढूया, अशा गंभीर स्थितीत जनतेच्या जीवशी खेळण्याचे राजकारण करू नका, असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जनतेला उद्देशून केले. लॉकडाऊन हा अंतिम मार्ग नाही. दोन दिवसात यासंबंधी नेते, तज्ज्ञ, डॉक्टर, पत्रकारांशी चर्चा करून मार्ग काढू. पण परिस्थिती अशी राहिली तर जगाने जे स्वीकारले तो लॉकडाऊन आपल्याला स्वीकारावा लागेल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मार्च महिन्यात कोविडने जगात शिरकाव केल्यापासून आपली सारी यंत्रणा कामाला लागली आहे. त्याला रोखण्यात आपण यशस्वी ठरलो. हे युध्द एकत्रित लढलो म्हणून आपल्याला यश आले. जगाने आर्थिक संकट पाहिले. त्या मानाने आपल्या अर्थमंत्र्यांनी राज्याला तारण्याचा प्रयत्न केला. कठीण काळात आपल्याला पुढे नेणारा संकल्प त्यांनी दिला. वर्षभर आपण आमच्या सूचना मानल्यात. राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, धार्मिक नेते आणि सामान्य नागरिकांच्या सहकार्यामुळे संकट टळले. पण पुन्हा निर्धास्त राहिल्याने संकटाने मान वर काढली. कोविड आला तेव्हा आपल्याकडे दोन चाचणी केंद्रे होती. आज त्यांची संख्या ५०० झाली आहे. आज महाराष्ट्रात रोज ७५ हजार चाचण्या होत आहेत. त्या १ लाख ८२ हजारपर्यंत नेण्याचा आपला इरादा आहे. काही दिवसात ही संख्या अडीच लाखांपर्यंत नेऊ, असे मुख्यमंत्री म्हणाले. यातील ७० टक्के चाचण्या या आरटीपीसीआर असतील, असे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

कोणत्याही परिस्थितीत दर्जाशी तडजोड करणार नाही, आणि काहीही लपवणार नाही, असे सांगत सुरुवातीच्या गंभीर परिस्थितीनंतर योजलेल्या उपायांची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. जानेवारी अखेर रोज सापडणार्‍या रुग्णांची संख्या सरासरी ३५० होती. आज ती संख्या साडेआठ हजारांवर पोहोचली आहे. १७ सप्टेंबर २०२० या दिवशी राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या ३ लाख होती. या दिवशी ३१ हजार ३५१ जणांचा मृत्यू झाला होता. तेव्हा एका दिवसात २४ हजार रुग्ण सापडत होते. आज हा आकडा ४१ हजारांच्या घरात गेला आहे. रुग्ण संख्या या गतीने वाढत राहिली तर आणखी १५ दिवसात सुविधा अपुर्‍या पडतील, असा इशारा त्यांनी दिला. सगळ्या सुविधा वाढवल्या तरी डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय, हॉस्पिटल कर्मचारी कुठून आणणार, असे विचारत त्यांनी सामाजिक संस्था आणि उद्योगांना पुढाकार घेण्याचे आवाहन केले. या योद्ध्यांना सहकार्य करण्याचेही मुख्यमंत्र्यांनी जनतेला आवाहन केले.

देशात लसीकरणात महाराष्ट्राने पहिला क्रमांक घेतला असल्याचे सांगताना ही लसीकरणाची मोहीम अधिक वाढवण्याचा इरादा त्यांनी व्यक् त केला. तीन लाखांवरून ही संख्या सात लाखांवर न्यायची असल्याचे ते म्हणाले. लस घेतल्याने कोविड जाईल, असे नाही. यामुळे घातकता कमी होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या वाढत्या प्रसारामुळे अमेरिकेसह, ब्रिटन, ब्राझील, रशिया, डेन्मार्क, हंगेरी, बेल्जियम, कॅनडा या देशांच्या झालेल्या अवस्था त्यांनी पुढे केल्या. अशा परिस्थितीत कोणी लॉकडाऊनविरोधात रस्त्यावर उतरण्याची भाषा करतो, तर कोणी तुमचा झटका म्हणजे नियम नाही, हिटलरसारखे वागू नका, कोणी रोजगाराचे पैसे मागतो.

- Advertisement -

हे सांगणार्‍यांना एकच विनवतो त्यांनी केवळ डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय द्यावेत. रस्त्यावर जरूर उतरा; पण कोरोना होऊ नये यासाठी उतरा, असे सांगत त्यांनी भाजपला खडे बोल सुनावले. संकटातही कोणी मास्क वापरू नका, असे आवाहन करतो. या आवाहनात शौर्य ते काय? आता शहरातील अनावश्यक गर्दी टाळावीच लागेल. खासगी कार्यालयांच्या वेळेबाबतही सूचना दिल्या आहेत. लॉकडाऊन नको असेल तर साखळी तोडायची कशी, याचे उपाय सुचवा. हे युध्द आपल्या सर्वांचे आहे. जिद्दीने उतरले तर कोरोनावर मात करणे अशक्य नाही. स्वयंशिस्तीने हे साध्य करता येईल, पण ते न करता लोकांच्या जीवाशी खेळू नका, असे त्यांनी बजावले.

जनतेला मुख्यमंत्र्यांची साद

*जनतेच्या जीवाशी खेळण्याचे राजकारण नको
*लसीकरण ७ लाखांपर्यंत नेणार
*अडीच लाख चाचण्या करणार
*१५ दिवसात सुविधा अपुर्‍या पडतील
*डॉक्टर्स, परिचारिका द्या

*मी जबाबदार, माझा मास्क, माझी सुरक्षा..
*रोजगार मिळेल, पण जीवाची पर्वा हवी
*सात लाख लस देणार
*लोकल सेवेतील प्रवासावरही निर्बंध

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -