औरंगाबादमध्ये आज उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार, नामांतराच्या घोषणेची शक्यता?

cm uddhav thackeray

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची आज औरंगाबादमध्ये (Aurangabad) जाहीर सभा होणार आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या सभेला १५ अटीशर्थींसह परवानगी देण्यात आली आहे. मराठवाड्यातील शिवसेनेची पहिली शाखा औरंगाबादमध्ये ८ जून १९८५ रोजी स्थापन करण्यात आली होती. या शाखेच्या ३७व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. परंतु या सभेला औरंगाबादच्या शहराचा नामांतरचा मुद्दा सर्वात महत्त्वाचा ठरू शकतो. सभेपूर्वीपासूनच औरंगाबादच्या नामांतराच्या चर्चांनी जोर धरला आहे.

विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंच्या आजच्या सभेसाठी अगदी स्टेजसमोर छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा विराजमान आहे. शिवसेनेच्या सभेत पहिल्यांदाच संभाजी महाराजांचा पुतळा विराजमान असल्यामुळे आज औरंगाबादच्या नामांतराची घोषणा होणार का, याची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगत आहे.

आज मुख्यमंत्र्यांची सभा औरंगाबादमधील ज्या मैदानावर पार पडणार आहे, त्याच मैदानावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक सभा गाजवल्या आहेत. १९८८ मध्ये याच मैदानावर बाळासाहेबांनी पहिल्यांदाच औरंगाबादचं संभाजीनगर म्हणून उल्लेख केला होता. ८ मे १९८८ मध्ये बाळासाहेबांनी औरंगाबादच्या नामांतराबद्दल घोषणा आधीच केली आहे. त्यामुळे याची उत्सुकता आज मोठ्या प्रमाणात आम्हाला आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे.

काही दिवसांपूर्वी औरंगाबादमधील याच मैदानात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभा घेतली होती. या सभेत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. तसेच औरंगाबादचं नामांतर करण्याची मागणी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती. त्यामुळे राज ठाकरेंच्या या टीकेला आज उद्धव ठाकरे उत्तर देणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार आहे. यामध्ये ५ डीसीपी, ७एसीपी, ३० पीआय, १०० पीएसआय आणि १२०० पोलीस असणार आहे. या सभेतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे भाजप आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना काय प्रत्युत्तर देणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.


हेही वाचा : “एमआयएम आणि समाजवादीच्या दाढ्या कुरवळणारे…”; मनसेचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल