घरताज्या घडामोडीभाजपचं टॉनिक संपलं, सूज उतरली - शिवसेनेची बोचरी टीका!

भाजपचं टॉनिक संपलं, सूज उतरली – शिवसेनेची बोचरी टीका!

Subscribe

जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपला सोसाव्या लागलेल्या पराभवावर शिवसेनेनं सामनाच्या आजच्या अग्रलेखातून बोचऱ्या शब्दांमध्ये टीका केली आहे.

महाराष्ट्रात महाविकासआघाडी अस्तित्वात आल्यानंतर आणि भाजपचं सरकार पडल्यानंतर पहिल्यांदाच राज्यात जिल्हा परिषदांच्या निवडणुका झाल्या. यामध्ये भाजपचा वरचष्मा असलेल्या जिल्हा परिषदा अधिक. या ६ जिल्हा परिषदांमध्ये मिळून फक्त धुळे वगळता अन्य ठिकाणी भाजपची पीछेहाट स्पष्टपणे दिसून आली. या पार्श्वभूमीवर भाजपची उतरती सुरू झाल्याचं बोललं जात असतानाच शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून शिवसेनेने अर्थात मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांनीच भाजपवर थेट निशाणा साधत बोचरी टीका केली आहे. ‘महाराष्ट्रात सत्ता हेच भाजपचं टॉनिक होतं. ते टॉनिकच संपल्यामुळे बाळसं म्हणून दिसणारी सूज उतरली आहे. जिल्हा परिषदांचा निकाल स्पष्ट आहे. सहापैकी ५ जिल्ह्यांतून भाजपला जनतेनं नाकारलं आहे. आता भाजप काय करणार?’ असा सवाल शिवसेनेकडून उपस्थित करण्यात आला आहे.

‘सत्तेची लाली गेली!’

नुकत्याच राज्यातल्या ६ जिल्हा परिषदांचे निकाल लागले. यामध्ये नागपूर, नंदुरबार, धुळे, वाशिम, पालघर आणि अकोला या जिल्हा परिषदांचा समावेश होता. मात्र, यामध्ये धुळे वगळता भाजपला इतर ठिकाणी फटका बसला आहे. यावर या अग्रलेखात बोट ठेवण्यात आलं आहे. ‘धुळे वगळता भाजपच्या चेहऱ्यावरचा मेकअप उतरला. सत्तेमुळे आलेली लाली सत्ता जाताच उतरली. ज्याच्या हाती सत्ता असते, त्याचा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विजय होतो. पण राज्यातील सत्ताबदलाची तुतारी ६ जिल्ह्यांतील निकालांनी फुंकली आहे’, असं यात म्हटलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पाच जिल्हा परिषदेत विधानसभेची पुनरावृत्ती!

‘जनता बकवास थापेबाजीला कंटाळली’

दरम्यान, या अग्रलेखातून नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात आली आहे. ‘नागपूरमध्ये सगळ्यात धक्कादायक निकाल लागला. फडणवीस आणि गडकरी यांच्या नाकावर टिच्चून तिथे काँग्रेसने मुसंडी मारली. त्यांच्या गावातच भाजपचा दारूण पराभव झाला. शिवसेना काँग्रेसच्या रंगात रंगली असून भगवा विसरल्याची गरळ गडकरींनी दोन दिवसांपूर्वी ओकली होती. पण नागपूर बालेकिल्ला असूनही ते तिथे भाजपचा पराभव का थांबवू शकले नाहीत? याचं कारण ग्रामीण जनता तुमच्या रोजच्या बकवास थापेबाजीला कंटाळली आहे’, असं देखील यात म्हटलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -