घरमहाराष्ट्रकाँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांची 'माय महानगर'च्या स्वप्निल जाधव यांना धमकी

काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांची ‘माय महानगर’च्या स्वप्निल जाधव यांना धमकी

Subscribe

'तू मला ओळखतो ना, पुन्हा असं केलं तर, हात काढून हातात देईन,' अशी धमकी झिशान सिद्दीकी यांनी 'माय महानगर'चे प्रतिनिधी स्वप्निल जाधव यांना दिली. आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करीत आहोत.

मुंबई : राज्यातील राजकारणात सर्वांनीच तारतम्य सोडले आहे. कुठे काय बोलावे याची चाड नसलेले राजकारणी आता पत्रकारांनाही सर्रास धमक्या देऊ लागले आहेत. ‘आपलं महानगर’-‘माय महानगर’चे प्रतिनिधी स्वप्निल जाधव यांना वांद्रे पूर्व काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी यांनी मुंबईत क्षुल्लक कारणावरून धमकी दिली. मंत्रालयाजवळ सोमवारी दुपारी महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ काँग्रेसने आंदोलन करताना आमदार सिद्दीकींनी धमकावले. (Congress MLA Zeeshan Siddiqui threatens Swapnil Jadhav of ‘My Mahanagar’)

‘तू मला ओळखतो ना, पुन्हा असे केले तर हात काढून हातात देईन,’ सांगू का मुलांना आता, अशी धमकी झिशान सिद्दीकी यांनी स्वप्नील जाधवला दिली आहे. आपल महानगर-माय महानगर या धमकीचा तीव्र निषेध करीत असून, धमकावणारे आमदार झिशान सिद्दीकींविरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. मुंबई क्राईम रिपोर्टर्स असोसिएशनने या घटनेचा निषेध केला आहे. आमदार सिद्दीकी यांच्याशी आपलं महानगरच्या वरिष्ठांनी याबाबत विचारणा केली असता आपण असे काहीही बोललेलो नाही, असे सांगत इन्कार केला. पण काँग्रेसच्या आमदार प्रणीती शिंदे यांनी मात्र झाल्या प्रकरणाबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. मरिन ड्राईव्ह पोलीस पत्रकाराला धमकी दिल्याप्रकरणी सिद्दीकी-विरोधात काय कारवाई करतात हे पहावे लागेल.

- Advertisement -

भाजपा खासदार बृजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करत महिला कुस्तीपटूंनी नवी दिल्लीत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे आणि प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष संध्या सव्वा लाखे मुंबईतील मंत्रालयानजीकच्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांची प्रतिक्रिया माय महानगरचे प्रतिनिधी स्वप्निल जाधव घेत होते. त्याचे थेट (Live) प्रक्षेपण सुरू होते. त्याच वेळी काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी तिथे आले आणि त्यांनी आमदार प्रणिती शिंदे व महानगर प्रतिनिधी स्वप्निल जाधव यांना पाच मिनिटे थांबण्यास सांगितले.

- Advertisement -

त्यावर खुद्द आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असल्याचे सांगितले. तसेच महानगर प्रतिनिधी स्वप्निल जाधव यांनी लाइव्ह सुरू असल्याने आमदार झिशान सिद्दीकी यांचा हात बाजूला करत लाइव्ह सुरू असल्याचे सांगितले. याचा राग आमदार सिद्दीकी यांना आला. लाइव्ह संपल्यानंतर त्यांनी आपल्या समर्थकाला पाठवून स्वप्निल जाधव यांना बोलावून घेतले आणि ‘तू मला ओळखतो ना, पुन्हा असं केलं तर, हात काढून हातात देईन,’ अशी धमकी झिशान सिद्दीकी यांनी दिली. आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करीत आहोत.

मुंबई क्राइम रिपोर्टर असोसिएशनकडून निषेध 

महिला कुस्तीपट्टूच्या समर्थनार्थ काँग्रेसने आज मुंबईत केलेल्या आंदोलनादरम्यान माय महानगरचे पत्रकार स्वप्निल जाधव काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांची प्रतिक्रिया घेत होते त्यावेळी आमदार झिशान सिद्दीकी यांनी लाइव्हदरम्यान मधे हात टाकून रोखण्याचा प्रयत्न केला. लाइव्ह सुरू असल्याने स्वप्निल जाधव यांनी त्यांचा हात बाजूला केला, या गोष्टीचा राग मनात धरून लाइव्ह संपल्यानंतर स्वप्नील यांना आमदार झिशान सिद्दीकी यांनी ‘पुन्हा अस केलंस तर हात तोडून हातात देईन’ अशी धमकी दिली. लोकप्रतिनिधी असूनही सिद्दीकी यांचे हे वागणे अजिबात शोभनीय नाही. पत्रकाराला अशी धमकी देणाच्या सिद्दीकी यांच्या कृतीचा मुंबई क्राइम रिपोर्टर असोसिएशन जाहीर निषेध करत आहे. आमदार झिशान सिद्दीकी यांनी या गोष्टीबद्दल दिलगिरी व्यक्त करावी, अशी मागणी आम्ही क्राइम असोसिएशनतर्फे करत आहोत. पत्रकार स्वप्निल जाधव याच्या पाठीशी आम्ही आहोत, असे संघटनेने स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -