राष्ट्रपती निवडणूक : शिवसेनेची भूमिका अनाकलनीय असल्याचे काँग्रेसचे मत

येत्या १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची निवडणूक पार पडणार आहे. यासाठी एनडीएकडून द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर विरोधी पक्षाकडून यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु आमदारांच्या बंडानंतर सावध पावले टाकत असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदारांच्या आग्रहाखातर द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, शिवसेनेची भूमिका अनाकलनीय असल्याचे मत काँग्रेसने मांडले आहे.

उद्धव ठाकरेंच्या निर्णयानंतर काँग्रेसच्या गोट्यातून नाराजीचा सूर उमटत आहे. शिवसेना महाविकास आघाडीत आहे. पण राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवाराबाबत निर्णय घेताना त्यांनी आमच्यासोबत काहीही चर्चा केलेली नाहीये, अशी खंत काँग्रेस नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.

राष्ट्रपती पदाची निवडणूक ही वैचारिक लढाई आहे. लोकशाही आणि संविधान रक्षणासाठी सुरू असलेला हा संघर्ष आहे. स्त्री, पुरुष किंवा आदिवासी, बिगर आदिवासी अशी ही लढाई नाही. जे संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणाच्या बाजूने आहेत ते सर्व यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देत आहेत, असं ट्विट बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे.

शिवसेना हा एक वेगळा राजकीय पक्ष आहे,त्यामुळे ते त्यांची भूमिका घेऊ शकतात. मात्र या वैचारिक लढाईत जेव्हा गैर लोकशाही मार्गाचा अवलंब करून राज्यातील सरकार पाडले गेले, शिवसेनेच्या अस्तित्वाला आव्हान दिले गेले,अशा परिस्थितीत शिवसेनेने घेतलेली भूमिका अनाकलनीय आहे. शिवसेना महाविकास आघाडीत आहे, पण हा निर्णय घेताना त्यांनी आमच्याशी काहीही चर्चा केलेली नाही, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.


हेही वाचा : गुरूपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांना