स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावरच लढणार

काँग्रेस ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांचा होकार, नाना पटोले यांना दिला ‘मास्टर प्लान’

Nana Patole

काँग्रेस राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच लढणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी त्याला होकार दिला असून त्यासाठी एक ‘मास्टर प्लान’ तयार केला आहे. हा मास्टर प्लान राहुल गांधी यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे सुपूर्द केला आहे. महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढेल हा निर्णय राहुल गांधी यांच्या सोबत झालेल्या बैठकीत झाला आहे. पक्षश्रेष्ठींचा हा निर्णय आहे तो सर्वांना पाळावा लागेल. तसेच कुठल्याही मंत्र्याच्या चुकीचा अहवाल काँग्रेस वरिष्ठांना गेला नाही, असे नाना पटोले यांनी बुधवारी येथे सांगितले.

नाना पटोले हे राहुल गांधी यांच्या भेटीसाठी दिल्लीला गेले होते. तेथून परतल्यानंतर पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधत राहुल गांधी यांच्यासोबत झालेल्या बैठकीची माहिती दिली. नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला गतवैभव प्रात करून देण्यासाठी आणि संघटन भक्कम करण्यासाठी राहुल गांधी यांनी एक ‘मास्टर प्लान’ तयार केला आहे. काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी सरकारमध्ये असला तरी येत्या काळात होणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे आणि त्याला राहुल गांधी यांनीही होकार दिला आहे. महाराष्ट्रात काँग्रेस पक्षासाठी मी एक स्वप्न पाहिले आहे. काँग्रेस राज्यात एक नंबरचा पक्ष बनवायचा आहे. यासाठीच राहुल गांधी यांनी मास्टर प्लान दिला असून त्यावर आम्ही सगळे मिळून काम करणार आहोत. काँग्रेस पक्ष भक्कम करण्यासाठी आम्ही काहीही करायला तयार आहोत असे सांगत संघटनात्मक पातळीवर फेरबदल केले जाण्याचे संकेतही त्यांनी यावेळी दिले.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीतील मित्रपक्षांसोबत लढणार असे विचारले असता नाना पटोले यांनी सावध प्रतिक्रिया दिली. विधानसभा आणि लोकसभा निवडणुका तीन वर्षांनंतर होणार आहेत. त्यामुळे आताच यावर काही सांगता येणार नाही आणि याबाबत जो काही निर्णय असेल तो आमच्या हायकमांडकडून घेतला जाणार आहे, असे पटोले यांनी सांगितले.

पेगॅसस प्रकरणाबाबत नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्रात २०१७-१८ मध्ये फोन टॅपिंग झाले होते. जी काही माहिती असते ती सरकारलाच भेटत असते. मध्य प्रदेश व कर्नाटक निवडणुकीत याचाच वापर केला गेला. हे संविधानाच्या विरोधात आहे. गोपनीयतेचा भंग यांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून याची चौकशी झाली पाहिजे, असे पटोले म्हणाले. आम्ही राज्यपालांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करणार आहोत व नंतर त्यांना निवेदन देणार आहोत. राष्ट्रपतींनी यामध्ये हस्तक्षेप करावा, अशी मागणी आम्ही राज्यपालांकडे करणार आहोत, असेही पटोले म्हणाले.