घरआतल्या बातम्याराजकीय पक्ष काढून आमदार होणे ही आयुष्यातील घोडचूक - अरुण गवळी

राजकीय पक्ष काढून आमदार होणे ही आयुष्यातील घोडचूक – अरुण गवळी

Subscribe

मुंबईच्या गुन्हेगारी विश्वाचे केंद्रबिंदू असलेली भायखळ्यातील दगड चाळीचा आता विकास होणार आहे. अरुण गवळी गँगचे आश्रयस्थानामुळे मुंबईकरांमध्ये धडकी भरवणारी ही चाळ आता इतिहासजमा होणार आहे. तेथे उभे राहणार आहेत टोलेजंग टॉवर. त्यानिमित्ताने प्रत्यक्ष अरुण गवळीशी दगडी चाळीत जाऊन दै. ‘आपलं महानगर’ सोबत साधलेला हा संवाद…चाळीबद्दल बोलताना गवळीने त्याच्या राजकीय प्रवेशावरही भाष्य केले, त्या प्रत्यक्ष मुलाखतीचा हा लेखाजोखा.

आमदार होणे ही आपली आयुष्यातील सर्वांत मोठी चूक ठरली…

पोलीस आणि मीडियाच्या नजरेत मी कुविख्यात डॉन असलो तरी मला गरिबांसाठी, समाजातील शोषितांसाठी मनापासून काम करायचे होते. मला त्यांची सेवा करायची होती. म्हणून मी अखिल भारतीय सेनेची स्थापना केली. पुढे त्या संघटनेचा राजकीय पक्ष उभा करून निवडणूक लढवून आमदार होणे ही आपली आयुष्यातली सर्वांत मोठी चूक ठरली, अशी प्रांजळ कबुलीच अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याने दिली.

- Advertisement -

दगडी चाळीला पुनर्निमाणे वेध…

अरुण गवळी याचे साम्राज्य असलेल्या भायखळ्याच्या दगडी चाळीला पुनर्निर्माणाचे वेध लागले आहेत.
दगडी चाळीच्या पुनर्निर्माणामुळे या संपूर्ण परिसराचा कायापालट होणार आहे. एकूण १० चाळी पाडून या ठिकाणी गगनचुंबी इमारती उभ्या राहणार आहेत. सध्या १२० चौरस फुटांच्या कोंदट घरात राहणार्‍या ३५० चाळवासियांना ४५० चटई चौरस फुटांची घरे मिळणार आहेत. या विकासकामांमुळे माझे चाळकर्‍यांना घरे देण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे, असे सांगून अभासेनेचे माजी आमदार असलेले गवळी म्हणाला की, मी परिस्थितीचा शिकार झालो. पोलीस आणि मीडियाने माझ्यावर कुविख्यात हा शिक्का मारला. त्यामुळे माझ्या चाळवासियांना आणि कुटुंबियांना खूप त्रास झाला. खरं तर मला गरिबांसाठी आणि शोषितांची सेवा करायची होती. तरुणांना नोकरीपासून ते वृध्दाश्रमापर्यंत सगळीकडे काम करण्यासाठी मी अखिल भारतीय सेनेची स्थापना केली. थोड्याच दिवसांत त्याचा राजकीय पक्ष बनवून मी लोकसभा लढवली. पुढे विधानसभा लढवून आमदार होऊन विधानसभेत पोचलो ही माझी आयुष्यातली सगळ्यात मोठी घोडचूक केली, अशी प्रांजळ कबुलीच दिली.

सध्या गवळी तुरुंगातून पॅरोलच्या सुट्टीवर आहे. गवळीसाठी भायखळ्याची दगडी चाळ तटबंदीची भूमिका बजावत असते. गवळींना शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नागपूरच्या तुरुंगात असलेल्या गवळीने काही निवडक सहकार्‍यांशी सल्लामसलत करून २००० च्या दरम्यान अखिल भारतीय सेनेचा घाट घातला. या संघटनेची संपूर्ण बांधणी शिवसेनेच्या समांतर व्यवस्थेसारखी करण्यात आली होती. त्यामुळे शिवसेनेच्या शाखेत पदरी निराशा पडली की नागरिक मोठ्या संख्येने अभासेच्या कार्यालयात पोहोचू लागले होते.

- Advertisement -

विधानसभेवर काढला होता जंगी मोर्चा

आमदार होण्याआधी गवळींनी विधानसभेवर प्रचंड मोठा मोर्चा काढला होता. त्यानंतर अनेकांचे डोळे विस्फारले होते. यावर आपली भूमिका स्पष्ट करताना गवळी म्हणाला, मला शिवसेनेशी स्पर्धा करायचीच नव्हती; पण माझी संघटना जे काम करत होती ते बघून अनेकजण अस्वस्थ झाले. त्यातल्या काहींनी बाळासाहेब ठाकरेंचे कान भरले. पण माझी साहेबांवर श्रध्दा होती. कारण त्यांचा आक्रमकपणा मला खूपच भावायचा. झटपट निर्णय घेण्याची त्यांची शैली मी अमलात आणायचो. पण राजकारणात त्यामुळे मी कमी वेळात जास्त अंतर पुढे गेलो. पण आता मला कुठलाच पक्ष आणि झेंडा नकोसा वाटतोय. कारण मला गैरसमजातून खूपच भोगायला लागलंय. विशेषतः माझ्या सहकार्‍यांना. पण तरीही मी शिवसेनेला मदतच केली आणि माझी मदत निरपेक्ष होती, असेही गवळीने सांगून टाकले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -