पुण्यात कोरोनाचा कहर; एकाच दिवसात ५ जणांचा मृत्यू

पुण्यात आज सकाळपासून पाच जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १३ वर पोहोचली आहे.

coronavirus
प्रातिनिधिक छायाचित्र

जगभरात कोरोना व्हायरसने अक्षरश: धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली असून आता राज्याला देखील कोरोनाने घेरले आहे. दरम्यान, कोरोनाचा सर्वात अधिक फटका मुंबई आणि पुण्याला बसला आहे. पुण्यात आज सकाळपासून पाच जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १३ वर पोहोचली आहे. सकाळपासून पुणे शहरातील नायडू रुग्णालयात १, नोबेल रुग्णालयात १ आणि ससून रुग्णालयात ३ अशा एकूण पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबत महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी माहिती दिली आहे.

१ हजार ५०० नागरिकांची कोरोना तपासणी

पुणे शहरात आतापर्यंत १ हजार ५०० नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी १ हजार ४१७ नागरिकांचे सुदैवाने रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर १५० रुग्ण बाधित आढळले आहेत. तसचे या दरम्यान, १७ जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर इतर रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याचे आरोग्य विभागा मार्फत सांगण्यात आले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र, सरसकट बंदी असतानाही आदेशाचे पालन होत नसल्यामुळे संसर्ग वाढत असल्याचे रुग्णांच्या वाढीतून दिसून येत आहे. तर महर्षिनगर, कोंढव्यासह या लगतच्या पेठांमधील भागात सोमवारी सर्वाधिक रुग्ण आढळून आल्यामुळे हा भाग सील देखील करण्यात आला आहे. मात्र संबंधित भागातील रुग्णालये, औषधांची दुकाने, दूध, किराणा माल, भाजीपाला दुकाने अशा अत्यावश्यक सेवा सुरूच राहणार आहेत. परंतु, या भागातील नागरिकांनी घराबाहेर पडणे, आपल्या भागातून दुसऱ्या परिसरात जाणे आणि वाहतुकीवर संपूर्ण निर्बंध घालण्यात आले आहेत.


हेही वाचा – Video : गच्चीवर खेळत होते पत्ते; ड्रोनमधून आवाज येताच सगळे झाले फत्ते