काकस्पर्शासाठी भाविकांना प्रतीक्षा; नैवेद्य देण्यासाठी कावळ्याची शोधाशोध

पंचवटी : पितृपक्षात काव काव ऐकण्यासाठी व आपण टाकलेल्या नैवेद्याचा घास घेण्यासाठी गोदाकाठी भाविकांना कावळ्याची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. कावळ्यासाठी भाविक वाटेल ते करताना दिसून येत आहेत. पितृपक्ष म्हणजे भाद्रपद महिन्याचा कृष्ण पक्ष होय. हा भाद्रपद महिन्यातला कृष्ण पक्ष असतो. आपल्या नातेवाइकाचा मृत्यू ज्या तिथीस झाला असेल, त्या नातेवाइकाचे श्राद्ध, पितृपक्षातील त्याच तिथीस करण्याची हिंदू परंपरा आहे. या निमित्ताने आपल्या दिवंगत पूर्वजांचे स्मरण केले जाते. या श्राद्धविधीत आपल्या गोत्रातील ज्ञात-अज्ञात अशा सर्वांचे पिंड रूपाने पूजन केले जाते. या पक्षात यमलोकातून पितर (आपले मृत पूर्वज) कुटुंबियांच्या घरी वास्तव्य करण्यासाठी येतात अशी समजूत असल्याने, हा पक्ष (पंधरवडा) अशा पितृ कार्याला योग्य समजला जातो.

नाशिक येथील गोदावरी तिरी रामकुंड, त्र्यंबकेश्वर, काशी, पितृगया व मातृगया या ठिकाणी पितृपक्षात पूजा विधी आणि कर्मकांडासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात. यावेळी लोक आपल्या पूर्वजांचे स्मरण करतात आणि त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पिंड दान, श्राद्ध इत्यादी करतात. असे केल्याने त्यांची कृपा राहते आणि त्यांना सुख मिळते असे मानले जाते. त्यांच्या आशीर्वादाने जीवनात यश, सुख आणि समृद्धी प्राप्त होते. गोदाघाटावरील पुरोहितांकडे आपापल्या कुळा प्रमाणे कर्मकांड आणि पूजा विधी करण्यासाठी देशभरातून यजमान या पितृपक्षात हजेरी लावत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. त्यामुळे गोदाघाट पाण्याखाली गेला असून रामकुंडाच्या वरच्या पहिल्या पायरी पर्यंत पाणी आले आहे. सध्या दोन दिवसांच्या पावसामुळे पुरोहितांसह यजमानांची तारांबळ उडालेली आहे. परंतु यजमानांची गैरसोय टाळण्यासाठी गोदाघाटावरील पुरोहितांचे कर्मकांड आणि विधी पाणी येणार नाही, अशा ठिकाणी संपन्न होत आहे.

पूर्वी यजमानांचा पिंडदानाचा विधी संपन्न झाल्यानंतर नैवेद्य हा रामकुंड येथील घास ठेवण्यासाठी असलेल्या जागेवर ठेवला जायचे पण सध्या या ठिकाणी असलेले झाड कमी झाले असून आजूबाजूला बांधकाम झाल्याने कावळ्यांसह इतर पक्षी देखील तिथे येत नाही. त्यामुळे रामकुंड येथे नैवेद्य ठेवणार्‍यांना तासंतास वाट बघावी लागत असल्याने रामकुंड येथे नैवेद्य न ठेवता आता पंंचवटीतील अमरधाम च्या मागील बाजूस असलेल्या भिंतीवर ठेवले जात आहे. या ठिकाणी वृक्षसंपदा असल्याने कावळे आहेत. त्यामुळे नागरिकांची नैवेद्य ठेवण्यासाठी मोठी गर्दी या परिसरात करत असल्याचे दिसत आहे. परिसरातील कावळ्यांची संख्या लक्षात घेता भाविकांकडून येणार्‍या नैवेद्य संख्या मोठी असल्याने बराच वेळ नागरिकांना काक स्पर्शासाठी प्रतीक्षा करावी लागते आहे. तर या परिसरात नागरिकांबरोबर वाहनांची वर्दळ वाढली असल्याने कावळे देखील झाडावरून घास घेण्यासाठी खाली यायला घाबरत असल्याचे चित्र बघायला मिळते आहे. संततधार पावसामुळे कावळ्या ऐवजी अनेकांनी गो शाळेत जाऊन गायींना नैवेद्य दिले आहे. त्यामुळे परिसरातील गो शाळा आणि गायी असणार्‍यांचा शोध नागरिक घेताना दिसतात. भाद्रपद अमावास्येला मातामह श्राद्ध (आईच्या वडिलांचे श्राद्ध) असतेच, पण या शिवाय, या दिवशी ज्यांचा मृत्युदिन नक्की माहीत नाही त्या सर्वच पितरांचे श्राद्ध करण्याचाही प्रघात आहे.

चक्क पाळला होता कावळा!

काही वर्षांपूर्वी अमरधाम परिसरात एका युवकाने एक कावळा पाळला होता. त्याने पितृपक्षात काकस्पर्शाच्या माध्यमातून पैसे कमविण्याचा नवा व्यवसाय सुरू केला होता.