घरताज्या घडामोडीसामाजिक न्याय विभागाच्या प्रभावी कामगिरीसाठी कायदा करणार - धनंजय मुंडे

सामाजिक न्याय विभागाच्या प्रभावी कामगिरीसाठी कायदा करणार – धनंजय मुंडे

Subscribe

राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाला मागासवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या विविध योजनांसाठी दरवर्षी हजारो कोटी रुपयांचा निधी प्राप्त होत असतो. या निधीचा विनियोग नियोजनबद्धरित्या करून प्रत्येक गरजू लाभार्थ्यांना लाभ मिळेल यासाठी प्रत्येक योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी आणि मूल्यमापन करता यावे यासाठी तेलंगणा राज्याच्या धर्तीवर बजेट अंमलबजावणीचा कायदा करण्यात येणार असल्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आज झालेल्या बैठकीत स्पष्ट केले. सामाजिक न्याय विभाग व संविधान फाऊंडेशन यासह अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या उन्नतीसाठी कार्य करणाऱ्या संघटना व पदाधिकाऱ्यांची धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीत धनंजय मुंडे बोलत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) ही प्रभावी माध्यम असून, यामार्फत यूपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे मार्गदर्शन मिळावे यासाठी पंचतारांकित अभ्यास केंद्र पुणे येथे उभारण्याचे विचाराधीन असून यासाठी जागा उपलब्धीनुसार आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही यावेळी धनंजय मुंडे यांनी सांगितले.

- Advertisement -

या बैठकीस सामाजिक न्याय विभागाचे अपर मुख्य सचिव अरविंद कुमार, समाजकल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये तसेच संविधान फाऊंडेशनचे ई झेड खोब्रागडे (सेवानिवृत्त सनदी अधिकारी), डॉ. बबन जोगदंड, अतुल भातकुले, महेंद्र मेश्राम, सिद्धार्थ भरणे, दीपक निरंजन, अतुल खोब्रागडे यासह विभागाचे अधिकारी व संघटना पदाधिकारी उपस्थित होते.

८ मार्च २०२० रोजी संविधान फाऊंडेशनच्या विविध मागण्यांविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उपस्थित केलेल्या विविध मागण्यांवर देखील या बैठकीत चर्चा झाली.

- Advertisement -

अभिमत विद्यापीठामध्ये (Deemed University) शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांना केंद्रसरकारच्या प्रचलित शिक्षणशुल्क प्रतिपूर्ती योजनेच्या धर्तीवर लाभ देण्यात यावा, या मागणीबाबत राज्य शासन सकारात्मक असून याबाबत लवकरच निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी धनंजय मुंडे यांनी दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत बांधण्यात येणाऱ्या समाज मंदिराचा फारसा उपयोग होताना दिसून येत नाही, त्याऐवजी सर्व सुविधायुक्त संविधान सभागृह बांधले जावे अशी मागणी संविधान फाऊंडेशनने यापूर्वी केली होती. त्यावर उत्तर देताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत संविधान सभागृह बांधण्यासाठी मंजुरी व निधी उपलब्ध करून देण्याचे आराखडे विभागाला प्राप्त झाले असून ही मागणी मान्य करण्यात आली असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.

दरम्यान कोविड-१९ च्या कठीण काळात राज्यसरकारवर प्रचंड आर्थिक ताण असताना देखील मागील वर्षी सामाजिक न्याय विभागाने विभागाला प्राप्त निधींपैकी ९९ टक्क्यांपेक्षा अधिक निधी खर्च केला. या आर्थिक वर्षात देखील आर्थिक संकटावर मात करत महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून विभागाच्या अनुसूचित जाती विकास योजना किंवा अन्य कोणत्याही योजनेला ब्रेक लागणार नाही किंवा कोणत्याही योजनेचा पैसे इतरत्र वळवले जाणार नाही, अशी खात्री धनंजय मुंडे यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -