घरमहाराष्ट्रसंगीता डवरेंचे काय झाले याची माहिती होती काय? ठाकरे गटाचा राज्य सरकारला...

संगीता डवरेंचे काय झाले याची माहिती होती काय? ठाकरे गटाचा राज्य सरकारला सवाल

Subscribe

मुंबई : महाराष्ट्राची सध्या सर्वच बाजूंनी अधोगती सुरू आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा तर साफ मुडदा पडला आहे आणि ही भिजलेली काडतुसे आपल्याच मस्तीत दंग आहेत. या भिजलेल्या काडतुसांना संगीता डवरेंचे काय झाले याची माहिती होती काय? असा सवाल ठाकरे गटाने शिंदे – फडणवीस सरकारला केला आहे.

मंत्रालयाच्या दारात 27 मार्च रोजी, एकाच दिवशी तीन जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यातील धुळ्याच्या शीतल गादेकर आणि नवी मुंबईच्या संगीता डवरे यांचा मृत्यू झाला. मंत्रालयासमोर विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस पत्नी संगीता डवरे यांची अखेर मृत्यूशी झुंज मंगळवारी संपली. भिजलेल्या काडतुसाला आपण गृहमंत्री असल्याचा सार्थ अभिमान आहे, पण स्वपक्षीय बावनकुळे व डोम कावळे यांना अभिमान असणे व महाराष्ट्राला तुमच्या पदाचा आधार वाटणे यात जमीन-अस्मानाचा फरक आहे, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ‘सामना’तील अग्रलेखाद्वारे केली आहे.

- Advertisement -

गृहमंत्री म्हणून तुम्ही अपयशी
शीतल गादेकर आणि संगीता डवरे या दोन निरपराध महिलांनी सरकारच्या दारात आत्महत्या केली. विषप्राशन केले व सरकार स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी तडतडत बसले आहे. या दोन्ही महिलांवर नीट उपचारदेखील झाले नाहीत. संगीता डवरे व शीतल गादेकर यांच्या आत्महत्येची माहिती आपल्या ‘काडतूस’ गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचली आहे काय? शेतकरी ठिकठिकाणी आत्महत्या करीत आहेत, पण भिजलेल्या काडतुसांना त्यांची चिंता दिसत नाही. आपण फडतूस आहोत की भिजलेले काडतूस आहोत हे तुमचे तुम्ही ठरवा; पण गृहमंत्री म्हणून तुम्ही अपयशी आहात, असा थेट आरोपही ठाकरे गटाने केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाकडून ‘नामर्दानगी’चा शिक्का
महाराष्ट्र हा मर्दांचा देश आहे. छत्रपती शिवरायांची ही माती आहे. अशा या मर्द देशावर तुमच्या राज्यकारभारामुळे सर्वोच्च न्यायालयाकडून ‘नामर्दानगी’चा शिक्का बसला व राज्याची बेअब्रू झाली. त्याबद्दल या लोकांनी विष खाऊन मरायला हवे होते, पण विष खाऊन मेले कोण? संगीता डवरे आणि शीतल गादेकर. काय केले तुमच्या नामर्द आणि फडतूस सरकारने? असा सवालही या अग्रलेखात करण्यात आला आहे.

- Advertisement -

तुमचे राज्य औटघटकेचे
डॉ. मिंधे गँगचे लोक ठाण्यासारख्या सुसंस्कृत शहरात राजकीय अंडरवर्ल्ड चालवत आहेत. ही गुंडगिरी रोखण्याची हिंमत तुमच्या गृहखात्यात नसेल तर मर्दानगीची ‘काव काव’ बंद करा. तुमचे राज्य औटघटकेचे आहे व सध्या तुमची फुकट फौजदारी दिल्लीच्या जोरावर सुरू आहे. उद्या हे औटघटकेचे राज्यही जाईल व फुकट फौजदारीही जनता बरखास्त करील, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.

तुम्हाला संगीता डवरे, शीतल गादेकर, रोशनी शिंदेंचे शाप
महाराष्ट्राला नपुंसक बनवणाऱ्यांना फडतूस नाही म्हणायचे तर काय? शिवसेनेचा धनुष्यबाण भ्रष्ट मार्गाने काढून घेतला तरी बाण आरपार घुसलाच. आता तो कोणत्या भागात घुसला ते श्रीमान ‘बावन’ आण्यांनीच जाहीर करावे. संगीता डवरे, शीतल गादेकर, रोशनी शिंदेंचे शाप तुम्हाला सुखाने जगू देणार नाहीत, असेही या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -