घरमहाराष्ट्रशिवाजी महाराजांच्या जयंतीचा वाद नको; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपला सुनावले

शिवाजी महाराजांच्या जयंतीचा वाद नको; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपला सुनावले

Subscribe

आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासानंतर भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शिवजयंतीचा मुद्दा उपस्थित केला. आज छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती असून मुख्यमंत्री स्वत: एका कार्यक्रमाला गेले आहेत. मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते तिथीनुसार शिवजयंती साजरी करत आहेत.

मुंबई : राज्यात भाजपचे पाच वर्षे सरकार असताना तिथीनुसार शिवजयंती साजरी झाली नाही. तेव्हा आता छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तिथी किंवा तारखेचा वाद नको, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी भाजपला ठणकावले. विधिमंडळाच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनाधिष्ठित पुतळा आहे. शिवजयंतीनिमित्त त्या पुतळ्याजवळ जाऊन अभिवादन करताना ऊन लागते काय? अशा शब्दात अजित पवार यांनी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा समाचार घेतला.

आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासानंतर भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शिवजयंतीचा मुद्दा उपस्थित केला. आज छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती असून मुख्यमंत्री स्वत: एका कार्यक्रमाला गेले आहेत. मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते तिथीनुसार शिवजयंती साजरी करत आहेत. शिवसेना, भाजपच्या काही आमदारांनीदेखील महाराजांना वंदन केले. जयंतीच्या दिवशी जे महामानव आहेत त्यांचे फोटो लिफ्टसमोर ठेवतो आणि सदस्य पुष्प अर्पण करतात अशी प्रथा आहे. पण राज्य सरकारची नेमकी भूमिका काय?,’ असा सवाल मुनगंटीवार यांनी केला. मुख्यमंत्री तिथीप्रमाणे शिवजंयती साजरी करत असताना राज्याचे अधिकारी आम्ही १९ फेब्रुवारीला साजरी करतो म्हणतात. सरकारी अधिकार्‍यांना  तिथी मान्य नाही म्हणणे म्हणजे ही द्विधा मनस्थिती आहे. ही परिस्थिती चांगली नाही. काँग्रेसच्या एका नेत्यानेही तिथीनुसार जयंती  साजरी करा असे सांगितले आहे. पण जर मुख्यमंत्री तिथीनुसार जयंती  साजरी करत असतील तर तसे आदेश द्यावेत, असेही मुनगंटीवार म्हणाले.

- Advertisement -

यावेळी अजित पवार यांनी सुधीर मुनगंटीवार यांचा समाचार घेतला.  हे सरकार येण्याआधी अर्थमंत्री म्हणून सुधीर मुनगंटीवार यांनी काम केले आहे. मीदेखील पाच वर्ष येत होतो पण तेव्हा कधीही तिथीनुसार शिवजयंती साजरी झाली नाही. अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तिथी किंवा तारखेचा वाद नको, ते आपले दैवत आहे हे त्रिवार सत्य आहे. पण मागील काळात आम्ही सरकारमध्ये होतो तेव्हा स्वर्गीय रामकृष्ण मोरे एका खात्याचे मंत्री होते. त्यांनी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० साली झाला हे रेकॉर्डवर आणले. तेव्हापासून राज्याचे मुख्यमंत्री शिवरायांचा जन्म जेथे  झाला त्या शिवनेरीवर जाऊन अभिवादन करुन जयंती साजरी करतात. ही परंपरा कायम असून सर्व मुख्यमंत्र्यांनी ती  कायम ठेवली आहे,’ असे अजित पवार म्हणाले.

राज्य सरकारच्या वतीने १९ फेब्रुवारीला शिवजयंती साजरी केली जाते. राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख म्हणून त्या कार्यक्रमाला गेले होते. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे होते तेव्हापासून शिवसेना तिथीनुसार जयंती साजरी करत आली आहे. आम्हीदेखील सरकारमध्ये असताना तारखेप्रमाणे साजरी करायचो. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, सपा, भाजप कोणत्याही पक्षाच्या सदस्याला तिथीप्रमाणे जयंती साजरी करायची असेल तर महाराजांच्या पुतळ्याला जाऊन अभिवादन करु शकतात. कारण नसताना वेगळी चर्चा नको, असे पवार यांनी बजावले.

- Advertisement -

सरकारी अधिकार्‍यांना १९ फेब्रुवारीला सुट्टी देतो त्याप्रमाणे ते साजरी करतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्तव्यालाही तितकेच महत्त्व दिले. त्यानुसार आज सुट्टी नसून काम सुरु आहे, असे  अजित पवार यांनी  स्पष्ट केले. त्यानंतर  मुनगंटीवार यांनी मागे एखादी गोष्ट केली नाही, म्हणून भविष्यात करता येत नाही का? असा सवाल विचारला असता पवार  म्हणाले, आपल्या प्रांगणात महाराजांचा पुतळा आहे तिथे जाऊन ज्यांना अभिवादन  करायचे  आहे त्यांनी  करावे . छोट्या  फोटोपेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यासमोर जाऊन अभिवादन करा ना. उन्हात जाऊन अभिवादन करायला काही त्रास होतो का? असा सवाल अजित पवार यांनी केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिवादन

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधान भवन प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह संसदीय कार्यमंत्री अ‍ॅड. अनिल परब, राजशिष्टाचार आणि  पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री शंभुराज देसाई, आमदार भास्कर जाधव आदी उपस्थित होते. शिवाय  विधान परिषदेच्या  उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुष्पहार अर्पण केला. यावेळी शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू, आमदार राजन साळवी, रवींद्र फाटक, महेश शिंदे, नरेंद्र दराडे उपस्थित होते.


हेही वाचाः चित्रा वाघ आणि फिर्यादीच्या आरोपामुळे परिवाराच्या प्रतिष्ठेला धक्का, कुचिक यांच्या मुलीचे महिला आयोगाला पत्र

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -