घरमहाराष्ट्रनवी मुंबईत दादांचा, दादांना चेकमेट ! डॉ. अभिजित बांगर ठरणार वजीर?

नवी मुंबईत दादांचा, दादांना चेकमेट ! डॉ. अभिजित बांगर ठरणार वजीर?

Subscribe

नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची तडकाफडकी बदली करून त्यांच्या जागी डॉ. अभिजित बांगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. बांगर हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मर्जीतील सनदी अधिकारी आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेतील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी डॉ. बांगर यांना नवी मुंबईत आणल्याचे राजकीय पटलावर बोलले जात आहे. डॉ. बांगर यांच्या माध्यमातून भाजपमय झालेले माजी मंत्री तथा आमदार गणेशदादा नाईक यांना अजितदादांनी चेकमेट दिला आहे.

नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची नियुक्ती १८ जुलै २०१९ रोजी करण्यात आली होती. मिसाळ यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी वर्षभरातच त्यांची बदली करण्यात आली आहे. नवी मुंबईतील आयुक्त तडकाफडकी बदलण्यामागे मोठे राजकारण असल्याचे बोलले जात आहे. नवी मुंबईतील विद्यमान सत्ताधारी असलेले भाजपचे आमदार गणेश नाईक यांची प्रशासकीय कोंडी करण्याचा महाविकास आघाडीचा डाव असून यामध्ये दस्तुरखुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घातले आहे. त्यामुळे आगामी काळात अजितदादा विरुद्ध गणेशदादा असा राजकीय संघर्ष विकोपाला पोहचण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

नवी मुंबईत करोना रुग्णांची वाढती संख्या हे अण्णासाहेब मिसाळ यांच्या बदलीचे कारण तर नाही ना? अशी चर्चा देखील नवी मुंबईत सुरू झाली आहे. अण्णासाहेब मिसाळ यांच्या बदलीमुळे महापालिकेत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मात्र, नवी मुंबईतील राजकारण काही लपलेले नाही. मिसाळ यांच्या बदलीला नवी मुंबईतील निवडणुकीचीच ठिणगी आहे हे स्पष्ट दिसतेय. आमदार गणेश नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीशी केलेल्या दग्याफटक्याचा वचपा काढण्याची ही राजकीय रणनीती असल्याचे बोलले जात आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेवर अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वर्चस्व गाजवले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवी मुंबईचा बालेकिल्ला आमदार गणेश नाईक यांच्या ताब्यात दिला होता. नवी मुंबईत गणेश नाईक जे बोलतील तेच खरे असे सूत्र राष्ट्रवादीत होते. मात्र, देशात आणि राज्यात २०१४ साली आलेल्या राजकीय परिवर्तनाच्या लाटेत राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांना मोठा फटका बसला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची देशातील आणि राज्यातील सत्ता गेली. त्यानंतर सत्तेविना अस्वस्थ झालेले गणेश नाईक यांनी वेगळा मार्ग निवडला. २०१९ साली झालेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते असलेले गणेश नाईक यांनी भाजपात प्रवेश केला. गणेश नाईक यांचा दगाफटका शरद पवार, अजित पवार यांना जिव्हारी लागला. ज्या राष्ट्रवादीने गणेश नाईकांना सर्वकाही दिले त्या राष्ट्रवादीला वार्‍यावर सोडल्याची वेदना राष्ट्रवादीच्या नेत्यांना आजही असहाय करीत आहे. गणेश नाईक भाजपातून विधानसभा निवडणूक लढले आणि जिंकले, मात्र राज्यात भाजपची सत्ता न आल्याने त्यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले. मात्र, राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये निर्माण झालेली गणेश नाईकांबद्दलची चीड तशीच आहे. आता गणेश नाईकांच्या दग्याफटक्याचा वचपा काढण्याच्या तयारीत राष्ट्रवादीचे नेते असल्याचे दिसते. याची सुरुवात नवी मुंबईच्या आयुक्तपदी मर्जीतील सनदी अधिकारी आणून अजित पवार यांनी केली आहे.

- Advertisement -

नवी मुंबई महापालिकेत १११ विद्यमान नगरसेवक आहेत. २०१५ मध्ये झालेल्या नवी मुंबई मनपाच्या निवडणुकीनुसार राष्ट्रवादीचे ५२, शिवसेनेचे ३८, काँग्रेसचे १०, भाजपचे ६ आणि ५ अपक्ष अशी पक्षीय बलाबल आहे. २०१९ मधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणेश नाईक यांनी नवी मुंबईतील राष्ट्रवादी पक्ष अख्खा फोडला. राष्ट्रवादीचे ५२ पैकी ४९ नगरसेवक भाजपत नेले. त्यामुळे नवी मुंबई राष्ट्रवादीला मोठे भगदाड पडले. अशा संकट प्रसंगी राष्ट्रवादीला सावरण्याची मोठी जबाबदारी नवी मुंबईचे माजी उपमहापौर तथा ज्येष्ठ नगरसेवक आणि विद्यमान जिल्हा अध्यक्ष अशोक गावडे यांनी सांभाळली. शरद पवार यांची नवी मुंबईत जंगी सभा घेऊन गणेश नाईकांनी पक्षांतर केले असले तरी राष्ट्रवादीचा सामान्य कार्यकर्ता शरद पवार यांच्यासोबत असल्याचे दाखवून दिले. विधानसभा निवडणुकीत देखील अधिक अशोक गावडे यांनी भाजपचा विरोधकांचा धूर काढला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले अनेकजण स्वगृही परतले. भाजपत गेलेले राष्ट्रवादीचे ४ विद्यमान नगरसेवक पुन्हा परतले. भाजपात गेलेल्या ६ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला.

आता डॉ. अभिजित बांगर यांना नवी मुंबईत आणून प्रशासकीय कामांद्वारे गणेश नाईक यांच्या नाड्या आवळून त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याची रणनीती अजित पवार यांनी आखली आहे. भविष्यात नवी मुंबईत दादा विरुद्ध दादा असा संघर्ष पहायला मिळणार आहे. दरम्यान, नवनियुक्त आयुक्त डॉ. अभिजित बांगर यांनी बुधवारी उशिरापर्यंत नवी मुंबई आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला नव्हता.

नवी मुंबईत दादांचा, दादांना चेकमेट ! डॉ. अभिजित बांगर ठरणार वजीर?
Sanjay Mahadikhttps://www.mymahanagar.com/author/sanjay-mahadik/
गेल्या २५ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. प्रिंट, टीव्ही, डिजिटल मीडियाचा अनुभव. सामाजिक, राजकीय विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -