घरक्राइमपत्राचाळ घोटाळ्याच्या तपासाला वेग; ईडीची मुंबईत पुन्हा छापेमारी

पत्राचाळ घोटाळ्याच्या तपासाला वेग; ईडीची मुंबईत पुन्हा छापेमारी

Subscribe

मुंबई : गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्वसन घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आपल्या तपासाला आणखी गती दिली आहे. कोट्यवधी रुपयांच्या या घोटाळ्याप्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अलीकडेच अटक केली आहे. त्याचसंदर्भात ईडीने आज मुंबईत काही ठिकाणी छापेमारी केली.

- Advertisement -

गोरेगाव उपनगरातील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातील कथित गैरव्यवहारातून राऊत आणि त्यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांहून अधिक रक्कम मिळाली असल्याचा दावा ईडीने केला आहे. या प्रकरणात ईडीने 2 फेब्रुवारी रोजी प्रवीण राऊत यांना अटक केली होती. त्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर 31 जुलैला त्यांना अटक करण्यात आली. त्यापाठोपाठा ईडीने दोन वेळा मुंबई आणि परिसरात छापेमारी केली आहे. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत या देखील ईडीच्या रडारवर आहेत. वर्षा राऊत यांची ईडीने 6 ऑगस्ट रोजी सहा तास चौकशी केली होती.

ईडीने याआधी 2 ऑगस्टला या प्रकरणाशी संबंधित मुंबईतील दोन ठिकाणी छापे टाकले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या परिसरामध्ये हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एचडीआयएल) या फर्मसाठी रोख व्यवहार करणाऱ्या व्यक्तीचे निवासस्थान आणि कंपनीशी संबंधित आणखी एक परिसराची ईडीने झाडाझडती घेतली. त्या व्यक्तीला ईडीच्या कार्यालयात नेऊन त्याचा जबाबही नोंदवण्यात आला. तर, दुसऱ्या छाप्यात काही कागदपत्रे हस्तगत करण्यात आली. त्यानंतर आज पुन्हा ईडीने मुंबईत काही ठिकाणी छापेमारी केली.

- Advertisement -

काय आहे पत्राचाळ प्रकरण?
मुंबईतील गोरेगाव येथील पत्राचाळ जमीनप्रकरणी १ हजार ३४ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार प्रवीण राऊत यांच्या गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते, मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला असा आरोप आहे.

प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणार्‍या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. गुरू आशिष कन्स्ट्रक्शनला पत्राचाळचे ३ हजार घरांचे बांधकाम करायचे काम दिले होते. त्यापैकी ६७२ घरे येथील भाडेकरूंना द्यायची होती. उर्वरित घरे म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायची होती, परंतु २०१०मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे २५८ टक्के शेअर्स एचडीआयएलला विकले. यानंतर २०११, २०१२ आणि २०१३मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खासगी बिल्डर्सना हस्तांतरित करण्यात आले.

संजय राऊतांबद्दल ईडीचा दावा
पत्रा चाळ पुनर्विकास घोटाळ्यातून मिळवलेला पैसा विविध कंपन्यांच्या माध्यमातून अन्यत्र वळवला गेला तसेच प्रवीण राऊतने रोखीच्या स्वरुपात संजय राऊत यांच्याकडे वळवला, असे ईडीचे म्हणणे आहे. संजय राऊत यांना प्रवीण राऊत यांच्याकडून दर महिन्याला मोठी रक्कम मिळत होती. प्रवीण राऊत यांनी राऊत आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे वळवलेले १.०६ कोटी रुपये ईडीच्या अधिकाऱ्यांना सापडले. प्रवीण राऊतला पुढे ठेवून संजय राऊत सूत्रे हलवित होता, असा दावा ईडीने केला आहे.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -