घरमहाराष्ट्रभाजपमध्ये अनेक समर्थक आमदार एकनाथ खडसेंचा भाजपला सूचक इशारा

भाजपमध्ये अनेक समर्थक आमदार एकनाथ खडसेंचा भाजपला सूचक इशारा

Subscribe

भाजपमधील केवळ एक-दोन नाही, तर अनेक आमदार माझ्या संपर्कात आहेत. भाजपमध्ये असताना मी अनेकांना उमेदवारी मिळवून देण्याचे काम केले आहे, पण भाजपचे आमदार मला मतदान करणार नाहीत, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे उमेदवार एकनाथ खडसे यांनी केले. रविवारी एकनाथ खडसे यांनी विरारमध्ये येऊन आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. मी उमेदवार असल्याने मत मागण्यासाठी आलो होतो.

मी मत मागितले असून द्यायचे की नाही हे हितेंद्र ठाकूर सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घेतील, असे खडसे यांनी यावेळी सांगितले. भाजप हा आमचा प्रमुख विरोधी पक्ष आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा पराभव करण्याचे प्रयत्न ते करतील, पण महाविकास आघाडीचाच विजय होईल यात शंका नाही, असेही खडसे यांनी सांगितले.

- Advertisement -

हितेंद्र ठाकूर यांची जवळपास ४० मिनिटे भेट घेतल्यानंतर एकनाथ खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मी भाजपमध्ये असताना अनेकांना मदत केली आहे. कुणाला तिकीट देण्यासाठी, कुणाला मंत्रिपद देण्यासाठी, तर कुणाला गरज लागेल तेव्हा मदत केली. त्यामुळे भारतीय जनता पक्षात माझे दोनच नाही, तर अनेक समर्थक आमदार आहेत. ते माझ्यावर मनापासून प्रेम करतात, पण शेवटी पक्ष महत्त्वाचा असल्याने पक्ष सोडून ते मला मतदान करतील असे मला वाटत नाही. अजून तरी मतदान करण्यासाठी कुणी माझ्याकडे इच्छा व्यक्त केली नाही, असे एकनाथ खडसे म्हणाले.

हितेंद्र ठाकूर यांनी मतदान करण्याचा शब्द दिला का, असा प्रश्न विचारला असता खडसे म्हणाले की, मी उमेदवार म्हणून त्यांच्याकडे मत मागण्यासाठी आलो होतो. शब्द देणे वगैरे हे राजकारणात काही नवीन नाही, पण मत मागणे हे माझे कर्तव्य आहे. त्यामुळे त्यांना योग्य वाटेल त्याप्रमाणे ते भूमिका घेतील. योग्य उमेदवाराला मतदान करतील, असेही खडसे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -