घरमहाराष्ट्रधक्कातंत्र आणि मुख्यमंत्र्यांचे वर्चस्व

धक्कातंत्र आणि मुख्यमंत्र्यांचे वर्चस्व

Subscribe

भाजपने ठरवल्याप्रमाणे अखेर विधानसभा निवडणूक उमेदवारीच्या यादीतून एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता आणि राज पुरोहित यांचे पत्ते कट करून त्यांना घरी बसवले आहे. एकूणच भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारी यादीवर नजर टाकली असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वर्चस्व दिसून आले आहे.

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना मुक्ताईनगर, जळगाव येथून उमेदवारी नाकरताना त्यांच्या मुलीला, रोहिणीला उमेदवारी दिली आहे. बोरिवली (पश्चिम) येथून शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना डावलून सुनील राणे यांना उमेदवारी मिळाली. नागपूरच्या कामठीमधून ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना बाजूल सारून टेकचंद सावरकर यांना तिकीट मिळाले आहे. बावनकुळे यांच्या पत्नीला उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती. मात्र, ती निरर्थक ठरली. कुलाब्यातून विद्यमान आमदार राज पुरोहीत यांना घरचा रस्ता दाखवत राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे सदस्य राहुल नार्वेकर यांना तिकीट दिली.

- Advertisement -

नार्वेकर हे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक विद्यमान आमदारांची कणी कापून आपल्या समर्थकांची वर्णी लावली आहे. परिणय फुके, मोहन मते या आपल्या निकटवर्तींना उमेदवारी मिळवून देण्यात मुख्यमंत्री यशस्वी ठरले आहेत. एकूणच भाजपच्या उमेदवार यादीवर त्यांचाच प्रभाव दिसतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांच्या भक्कम पाठिंब्यामुळे महाराष्ट्र भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा शब्द अंतिम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

१९९५ च्या शिवसेना-भाजप सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या आणि सलग सहावेळा विधानसभेवर निवडून आलेल्या खडसे आणि मेहता यांच्यासारख्या नेत्यांना भाजपने उमेदवारी नकारण्याच्या निर्णयाबाबत शेवटपर्यंत अंधारात ठेवले. खडसे यांनी मुहूर्त पाहून एबी फॉर्मविना उमेदवारी अर्ज दाखल केला होता. शेवटी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत २४ तासांवर आली असताना पक्षाने खडसेंना उमेदवारी नाकारण्यात आल्याचा निरोप दिला. सुरुवातीला बंडाची भाषा करणार्‍या खडसेंना शेवटी पक्षाचा निर्णय मान्य करावा लागला.

- Advertisement -

२०१४ मध्ये मुख्यमंत्रिपदावर दावा सांगणार्‍या खडसे यांना, त्यांना कनिष्ठ असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या हाताखाली काम करणे सुरूवातीपासून अवघड गेले. त्यांनी सरकारमध्ये आपली ज्येष्ठता सिध्द करायला सुरूवात केल्यानंतर फडणवीस यांचा नाईलाज झाला. याचवेळी खडसेंना जमीन घोटाळ्याच्या आरोपावरून मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले.

गृहनिर्माण मंत्री असताना प्रकाश मेहता यांनी ताडदेव येथील एमपी मिल कंपाऊंड एसआरएच्या प्रकरणात खुद्द फडणवीस यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. परिणामी मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना अर्धचंद्र देण्यात आला. विनोद तावडे यांची शिक्षणमंत्री म्हणून कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. पक्ष बांधणीसाठीही त्यांचा फारसा फायदा झाला नाही. शिवाय सुरुवातीपासून मुख्यमंत्र्यांनी महत्वाकांक्षी तावडे यांना दोन हात दूर ठेवले होते. शेवटी या सार्‍याची परिणीती त्यांचे तिकीट कापण्यात झाली.

भाजपने चौथ्या यादीत चरण वाघमारे आणि बाळासाहेब सानप या दोन विद्यमान आमदारांना उमेदवारी नाकारली आहे. चरण वाघमारे यांच्याऐवजी भंडारा तुमसर येथून प्रदीप पडोळे यांना तिकीट देण्यात आली, तर बाळासाहेब सानप यांचे तिकीट कापताना नाशिक पूर्वमधून राहुल ढिकले यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -