घरमहाराष्ट्रपुणेगिरीश बापट योद्ध्याप्रमाणे लढले; मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री पुण्यात दाखल

गिरीश बापट योद्ध्याप्रमाणे लढले; मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री पुण्यात दाखल

Subscribe

पुणेः आजाराला न घाबरता गिरीश बापट हे एखाद्या योद्ध्याप्रमाणे लढले. त्यांच्या जाण्याने न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

भाजपचे खासदार गिरीश बापट यांंचे बुधवारी निधन झाले. बापट यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे पुणे येथील हदयनाथ मंगेशकर रुग्णालयात गेले होते. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही होते. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी बापट यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ही अत्यंत वेदनादायी घटना आहे. गिरीश बापट हे आजाराला घाबरले नाहीत. एखाद्या योद्ध्याप्रमाणे ते लढले. सर्वांना हवाहवासा असा नेता आणि कार्यकर्ता ते होते. त्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना मदत केली. ते दिलदार मनाचे होते. सर्वांशी त्यांचे प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध होते. दिलखुलास असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते.

- Advertisement -

पुढे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राजकारणात त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले. तळगाळापासून त्यांनी राजकीय कारकिर्द सुरु केली. पोटात एक आणि ओठावर एक असं त्यांनी कधीच केलं नाही. पुण्यात भाजप वाढवण्यात त्यांचं मोठ योगदान आहे. पक्षाच्या आणि राजकारणाच्या पलिकडे त्यांनी काम केलं. ते नहेमी कामाला महत्त्व देत होते. कसबा पोट निवडणुकीच्या प्रचाराला ते आले होते. कामावर त्यांची किती निष्ठा होती हे यातून दिसून आले. प्रथम राष्ट्र, नंतर संघटन आणि मग व्यक्ति या सुत्रानुसारच त्यांनी काम केलं

बापट हे माझ्या मोठ्या भावासारखे होते. आम्ही दोघे सोबतच बसायचो. अधिवेशनात त्यांचे काम मी बघितले आहे. विरोधकांना एकत्र घेऊन ते काम करायचे, अशी आठवणही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितली.

- Advertisement -

वयाच्या ७२ व्या वर्षी गिरीष बापटांचं निधन झालं . भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि पत्नी असा परिवार आहे. आज सायंकाळी सात वाजता वैकुंठ स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी होणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -