घरठाणेEknath Shinde : "मराठवाडा मुक्ती संग्राम" इतिहासातील न विसरता येणारे पर्व - मुख्यमंत्री

Eknath Shinde : “मराठवाडा मुक्ती संग्राम” इतिहासातील न विसरता येणारे पर्व – मुख्यमंत्री

Subscribe

Eknath Shinde : शासन सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारे शासन आहे. “मराठवाडा मुक्ती संग्राम” हे इतिहासातील न विसरता येणारे पर्व आहे. या स्वातंत्र्यसंग्रामात प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व स्वातंत्र्यवीरांना शतशः नमन करतो आणि हे शासन मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही देतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज येथे केले. मराठवाडा जनविकास परिषदेच्यावतीने ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त मराठवाडा भूषण व मराठवाडा रत्न पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. (Eknath Shinde Marathwada Liberation Struggle An Unforgettable Moment in History Chief Minister)

हेही वाचा – भाजपाच्या विद्वेषी राजकारणाला ‘मी पण गांधी’ने उत्तर; 2 ऑक्टोबरला काँग्रेसतर्फे मुंबईत पदयात्रा

- Advertisement -

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांना “मराठवाडा भूषण” हा पुरस्कार देण्यात आला. त्यांनी करोना काळात केलेले काम अत्त्युच्च दर्जाचे होते. त्यांनी केलेल्या कामाचे मोल होवूच शकत नाही. पद्मश्री डॉ. गंगाखेडकर यांना हा पुरस्कार प्रदान केल्याने खरे तर या पुरस्काराची उंची वाढली आहे. पुढच्या पिढीला माहिती देणारे, प्रेरणा व ऊर्जा देणारे असे कार्यक्रम सतत होणे गरजेचे आहे. मराठवाड्यातील स्वातंत्र्यसेनानींनी मराठवाडा मुक्तीसाठी दिलेले बलिदान कधीही विसरता येणार नाही. हे शासन मराठवाडा विकासासाठी कटिबद्ध आहे. यासाठीच मराठवाड्यातील विविध प्रकल्पांसाठी 60 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीस मंजूरी देण्यात आली आहे. मराठवाडा विकासित होणारच. मराठवाडा समृद्धी महामार्गाला जोडण्यात येणार असून त्याचबरोबर नागपूर- गोवा शक्तिपीठ महामार्गासही मराठवाडा जोडला जाणार आहे.

- Advertisement -

हे शासन काम करणारे आणि चांगले काम करणाऱ्यांचा सन्मान करणारे शासन आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी कोरोना काळात प्राणाची बाजी लावून काम करणाऱ्या सर्व डॉक्टरांचे विशेष कौतुक केले. यावेळी स्व. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आठवण सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, स्व. बाळासाहेब नेहमी सांगायचे वय वाढले तरी मनाने तरुण असले पाहिजे. चांगल्या कामाचा सदैव ध्यास ठेवला पाहिजे, त्यासाठी सदैव प्रयत्नशील राहावे. स्व. बाळासाहेबांच्या आणि स्व. धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणीवरच हे शासन काम करीत असून “शासन आपल्या दारी” उपक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत 1 कोटी 75 लाख लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. हा उपक्रम अजूनही सुरूच आहे. सर्वसामान्य जनतेला जास्तीत जास्त शासकीय योजनांचा सहज सुलभपणे लाभ मिळावा, हाच या उपक्रमाचा एकमेव उद्देश आहे.

आयोजकांनी “मराठवाडा भवन”साठी शासनास प्रस्ताव सादर करावा. याविषयी निश्चित सकारात्मक भूमिका घेतली जाईल, असे जाहीर करून जेष्ठ नागरिक आरोग्य तपासणी मोहीम लवकरच सुरू करण्यात येत असून त्यास स्व. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे नाव दिले जाईल, अशी घोषणाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

कृषीमंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, मराठवाडा मुक्ती संग्राम कधीही विसरू नका. आपल्या कार्यातून हा इतिहास टिकवून ठेवायला हवा. सबंध महाराष्ट्राबरोबरच मराठवाड्याचाही विकास नक्कीच होणार. त्या दृष्टीने मुख्यमंत्री शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार मनापासून कष्ट घेत आहेत. मुख्यमंत्री हे फक्त काम करणारेच मुख्यमंत्री असून त्यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उत्तम साथ मिळत आहे. मुख्यमंत्री शिंदे मराठवाड्याची मनापासून काळजी घेत आहेत. स्व. धर्मवीर आनंद दिघे यांच्या कार्याचा ध्यास घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सतत कार्यरत असतात. त्यांच्या नेतृत्वात मराठवाड्याचा विकास व्हावा, ही अपेक्षा व्यक्त करतानाच शिंदे हे सर्वसामान्यांसाठी झटून काम करणारे मुख्यमंत्री असल्याने ही अपेक्षा निश्चित पूर्ण होणार, हा विश्वासही त्यांनी शेवटी व्यक्त केला.

हेही वाचा – Loksabha Election : दक्षिण मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे गटाची रणनिती; ‘हा’ नेता लढवणार निवडणूक

या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांना “मराठवाडा भूषण” पुरस्काराने गौरविण्यात आले तर, कैलास जाधव (प्रशासकीय क्षेत्र), सोमनाथ वाळके (शैक्षणिक क्षेत्र), कर्ण एकनाथ तांबे (सामाजिक क्षेत्र), मिलिंद शिंदे (कला क्षेत्र), सोनाली मात्रे (प्रशासकीय क्षेत्र), आत्माराम सोनवणे (सामाजिक क्षेत्र) यांना “मराठवाडा रत्न” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने मराठवाडा भूषण पुरस्कार सन्मानार्थी पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर तसेच ह.भ.प प्रकाश बोधले महाराज आणि मराठवाडा जनविकास परिषदेचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती वंदना व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर किल्लारी भूकंपातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रास्ताविक डॉ. दिलीप सपाटे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक व जेष्ठ पत्रकार राजेंद्र हुंजे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

हेही वाचा – …तर ठाणेकरांचा टोल प्रश्न त्वरित मार्गी लागेल; आनंद परांजपेंनी राज ठाकरेंकडे केली मागणी

मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर, कृषीमंत्री धनंजय मुंडे, आमदार संजय केळकर, माजी खासदार आनंद परांजपे, अखिल भारतीय वारकरी महासंघाचे अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश बोधले महाराज, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मराठवाडा जनविकास परिषदेचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे, वरिष्ठ उपाध्यक्ष नितीन कदम, डॉ. दिलीप सपाटे, डॉ. अशोक नांदापूरकर, डॉ. अविनाश भागवत, डॉ. राजेश कुलकर्णी यांच्यासह अन्य मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -