कल्याणमधील सेंचुरी रेयान कारखान्यातील कर्मचारी गायब, कामगार वर्गात भीतीचे वातावरण

कल्याण – कल्याण जवळील शहाड येथील सेंचुरी रेयान कारखान्याच्या केमिकल विभागात काम करीत असणारा कर्मचारी शुक्रवारी काम करण्यासाठी कारखान्यात गेला मात्र तो कारखान्यातून बाहेर पडलाच नसल्याने एकाकी गायब झाल्याने कामगार वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

काल शुक्रवारी दुपारी दुसऱ्या शिफ्टमध्ये ड्युटी सुरू असल्याने शहाड येथील केमिकल विभागात काम करीत असलेला पंकज मिश्रा हा कर्मचारी कारखान्यात कार्ड पंचिंग करीत गेला. मात्र पूर्ण केमिकल युक्त असणाऱ्या या कारखान्यातून त्याची ड्युटीची वेळ संपूनही तो बाहेर पडला नसल्याने येथे प्रचंड खळबळ उडाली आहे. कारखाना व्यवस्थापन व सिक्युरिटी विभागाने अचानक गायब झालेल्या या कर्मचाऱ्यांची शोधाशोध करून देखील तो आढळून आलेला नाही.

सेंचुरी केमिकल विभागात मोठ्या प्रमाणात टाक्या असून तसेच ज्वलनशील रासायनिक द्रव्यांचा साठा देखील येथे उपलब्ध आहे. कारखान्याच्या आवारातील विभागात अचानक गायब झालेल्या कर्मचाऱ्यांचा रात्रभर शोध घेण्याचा प्रयत्न करूनही तो कारखान्या मध्ये दिसून आलेला नाही.

सेंचुरी रेयान व्यवस्थापनाने अखेर महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनमध्ये पंकज मिश्रा हा कर्मचारी गायब झाल्याबाबतची तक्रार आज सकाळी दाखल केली आहे. महात्मा फुले चौक पोलिसांनी या कर्मचाऱ्यांच्या शोध कामात श्वानपथकाची मदत घेऊन देखील गायब झालेल्या कर्मचाऱ्याचा थांग पत्ता लागला नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. सेंचुरी केमिकल कारखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारखान्यात प्रवेश करताना पंचिंग कार्ड स्कॅन करून जावे लागते तर कामाचे तास संपल्यानंतर कारखान्यातून बाहेर पडताना पंचिंग करणे बंधनकारक असते. मात्र असे असतानाही शुक्रवारी दुपारच्या सत्रात कामावर गेलेला पंकज मिश्रा दोन दिवस उलटूनही आपल्या घरी ही गेला नसल्याने नेमका तो कोठे गेला याबाबत त्याच्या परिवारामध्येही भीतीचे सावट निर्माण झाले आहे.

काम संपवून पंचिंग न केल्याने हा कर्मचारी कारखान्याच्या आवारातून बाहेरही पडला नसल्याने कारखान्याच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत सेंचुरी कारखान्याचे पीआरओ मेहुल लालका याच्याशी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, आपण बाहेर असल्याचे सांगून बोलण्यास नकार दिला तर कारखान्यातील अन्य एक अधिकारी अनिल व्यास यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.


हेही वाचा : २५ वर्षात चांगल्या दर्जाचा रस्ता नाही, पण नवीन मातोश्री उभी राहिली; संदीप देशपांडेंचा हल्लाबोल