घरमहाराष्ट्रनाव आणि चिन्ह काढून घेतले तरी जनतेचा आशीर्वाद कसा काढून घेणार? पटोलेंचा...

नाव आणि चिन्ह काढून घेतले तरी जनतेचा आशीर्वाद कसा काढून घेणार? पटोलेंचा सवाल

Subscribe

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज, शुक्रवारी शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेतून फुटलेल्या एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नाव आणि चिन्ह तुम्ही चोरू शकता, पण त्यांना असणारा जनतेचा आशीर्वाद कसा काढून घेणार, असा संतप्त सवाल प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी ज्या महाशक्तीच्या जीवावर पक्ष आणि चिन्ह आपल्याला मिळेल, असे सांगत होते ते अखेर प्रत्यक्षात आले आहे. त्यामुळे या देशातील स्वायत्त संस्था कायद्याने चालणार की महाशक्तीच्या मर्जीने असा प्रश्न निर्माण झाला आहे, असे सांगून नाना पटोले म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेतील फुटी संदर्भातील प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. ती अद्याप पूर्ण व्हायची असून त्याचा निकाल येण्याआधीच निवडणूक आयोगाने नाव आणि चिन्हाबाबतचा निर्णय कोणाच्या दबावाखाली घेतला आहे?

- Advertisement -

निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे; पण त्यांच्या कार्यपद्धतीत ते कुठेही दिसत नाही. या संपूर्ण प्रकरणात आयोगाची कार्यपद्धती एकतर्फी आणि संशयास्पद राहिली आहे. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या बोटाला धरून महाराष्ट्रात वाढलेल्या भाजपाने आज त्यांचा पक्ष संपवण्याचा कृतघ्नपणा केला आहे. महाराष्ट्रातील जनता हे सर्व पाहात आहे. भाजपा केंद्रीय संस्थाचा वापर करून ठाकरेंचा पक्ष हिसकावून घेऊ शकते, पण जनतेचा ठाकरेंना असणारा आशीर्वाद कसा हिसकावून घेणार? महाराष्ट्रातील जनता गद्दारांना माफ करणार नाही. शेवटी उद्धव ठाकरे यांचाच विजय होईल, असा विश्वासही नाना पटोले यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

जनतेने वेळीच जागे व्हावे…
निवडणूक आयोगाने दिलेल्या या निकालावरून काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांनी देखील ट्विटरवरून भाजपावर निशाणा साधला आहे. ‘महाशक्तीची काळी गडद छाया लोकशाही आणि संविधानिक संस्थांवर पडली आहे. जनतेने वेळीच जागे व्हावे, नाहीतर पुढे भयानक अंध:कार आहे…,’ असे ट्वीट सचिन सावंत यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -