घरमहाराष्ट्रFarmer suicides : अवघ्या चार महिन्यांत 830 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, पुढारी राजकीय धुळवडीत...

Farmer suicides : अवघ्या चार महिन्यांत 830 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, पुढारी राजकीय धुळवडीत मग्न

Subscribe

मुंबई : राज्यात एकीकडे पुढाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाची धुळवड रंगलेली असतानाच दुसरीकडे ज्यांचे नाव घेऊन राजकारण केले जात आहे, तो मात्र उद्विग्न होऊन टोकाचे पाऊल उचलत असल्याचे समोर आले आहे. यावर्षीच्या जानेवारी ते एप्रिल या अवघ्या चार महिन्यांत तब्बल 830 शेतकऱ्यांनी आत्महत्या (Farmer suicides) केली आहे. म्हणजेच, दिवसाला जवळपास सात शेतकरी टोकाचे पाऊल उचलतात, हे धक्कादायक आहे.

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis government) ‘सर्वसामान्यां’चे सरकार असा घोषा लावत असले तरी, प्रत्यक्षात अनेक प्रश्नांची तड अद्याप लागलेली नाही. त्यातच राजकारणातील आरोप-प्रत्यारोपांनी सभ्यतेची पातळी सोडल्याचे आता ठळकपणे अधोरेखित झाली आहे. आता प्रत्येकाला आगामी निवडणुकांचे वेध लागले आहेत. त्यामुळे शेतकरी, सर्वसामान्य नोकरदार यांच्याकडे लक्ष द्यायला कोणालाच वेळ नाही, असे चित्र आहे. शेतकऱ्यांवर आसमानी संकट कोसळलेले असतानाही ना महाविकास आघाडी सरकार अन् ना शिंदे-फडणवीस सरकार, दोघांकडूनही पोकळ आश्वासन दिले जात आहे.

- Advertisement -

गेल्यावर्षीच्या पहिल्या चार महिन्यांच्या तुलनेत यंदाची आकडेवारी कमी दिसत असली तरी, आत्महत्यांचे सत्र सुरूच असल्याचे दिसते. गेल्यावर्षी 945 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले होते. त्यातही मराठवाड्यातील शेतकऱ्यांची संख्या वाढल्याचे समोर आले आहे. 2022मध्ये पहिलल्या चार महिन्यांत 280 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. तर, यावर्षी याच काळात 305 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले.

राज्यात 830 शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्यांपैकी 283 प्रकरणेच आर्थिक मदतीच्या निकषांत दाखविली गेली. कर्जबाजारीपणाशी संबंधित प्रकरणांमध्येच सरकारकडून आर्थिक दिली जाते. अशा शेतकऱ्याच्या कुटुंबाला एक लाख रुपयांची मदत दिली जाते. आकडेवारीनुसार केवळ 12 टक्के प्रकरणांमध्ये ही रक्कम अदा करण्यात आली असल्याचे एका इंग्रजी दैनिकात म्हटले आहे.

- Advertisement -

मराठवाडा आणि विदर्भात लागवड केलेल्या कापूस आणि सोयाबीनसारख्या नगदी पिकांच्या आंतरराष्ट्रीय किमती यावर्षी किमान आधारभूत किमतीपेक्षा (MSP) जास्त आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. 2022च्या तुलनेत यावर्षीच्या पहिल्या चार महिन्यांत शेतकऱ्यांच्या डोक्यावरील ताण कमी झाला. तथापि, मुख्य नगदी पिकांची निर्यात आणि आयात यांच्यात संतुलन राखण्यासाठी सरकारने आणखी पावले उचलण्याच गरज आहे, असे किसान सभेचे नेते अजित नवले म्हणाले. सरकारने सोयाबीन आणि कापसाच्या निर्यात आणि आयातीचे नियमन केले असते तर, आत्महत्यांचे आकडे आणखी कमी झाले असते, असेही त्यांनी सांगितले.

कापसासारख्या पिकांचे भाव आता घसरत आहेत. कापसाचे भाव गेल्या वर्षी 12 हजार रुपये प्रति क्विंटल होता, तो यावर्षी केवळ 7 हजार रुपये प्रति क्विंटलवर आला आहे आणि पुढचा वर्षभराचा काळ राज्यातील शेतकऱ्यांसाठी तणावपूर्ण असू शकतो. आत्महत्येची ही आकडेवारी म्हणजे, हिमनगाचे टोक आहे. शेतकरी जिवंत आहे, याचा अर्थ तो चांगले जीवन जगत आहे, असे नाही, असे शेतकरी नेते विजय जावंधिया म्हणाले. कापूस आयातीवर सरकारने आयात शुल्क वाढवावे आणि निर्यात अनुदान द्यावे, असे त्यांनी सुचविले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -