घरमहाराष्ट्रनाशिकशुक्रवारी आढळलेल्या १७ पॉझिटिव्ह रुग्णांची जाणून घ्या हिस्ट्री

शुक्रवारी आढळलेल्या १७ पॉझिटिव्ह रुग्णांची जाणून घ्या हिस्ट्री

Subscribe

शहरातील तब्बल १७ रुग्णांचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. सायंकाळी प्राप्त झालेल्या रिपोर्टपैकी चौघे पॉझिटिव्ह आढळून आले. यातील दोन रुग्ण अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. तर एक डॉक्टर रुग्ण याच हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवा देत होता. सकाळी पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या एका महिलेलाही याच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. करोनाचे रुग्ण आढळून येत असताना आणि डॉक्टरांनाही या आजाराची बाधा होत असतानाही या हॉस्पिटलमध्ये अन्य डॉक्टर्स प्रामाणिकपणे रुग्णसेवा देत आहेत. त्यामुळे डॉक्टरांच्या सेवेचे शहरात सर्वत्र कौतूक होत आहे.

शहरातील तब्बल १७ रुग्णांचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. सायंकाळी प्राप्त झालेल्या रिपोर्टपैकी चौघे पॉझिटिव्ह आढळून आले. यातील दोन रुग्ण अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. तर एक डॉक्टर रुग्ण याच हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवा देत होता. सकाळी पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या एका महिलेलाही याच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. करोनाचे रुग्ण आढळून येत असताना आणि डॉक्टरांनाही या आजाराची बाधा होत असतानाही या हॉस्पिटलमध्ये अन्य डॉक्टर्स प्रामाणिकपणे रुग्णसेवा देत आहेत. त्यामुळे डॉक्टरांच्या सेवेचे शहरात सर्वत्र कौतूक होत आहे.

पुन्हा एका डॉक्टरांना करोनाची बाधा

Private Doctor
प्रातिनिधीक फोटो

एका डॉक्टरांचा रिपोर्टही शुक्रवारी सायंकाळी पॉझिटिव्ह आला. हे डॉक्टर अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये आयसीयू विभागात कार्यरत आहेत. या हॉस्पिटलमध्ये काही दिवसांपूर्वी करोनाचा रुग्ण दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तीन डॉक्टरांना करोनाची बाधा झाली आहे. हे डॉक्टर पंचवटीतील धात्रक फाटा येथील रहिवासी आहेत. काही दिवसांपासून डॉक्टर क्वारंटाईन होते.

- Advertisement -

इंदिरानगर येथील ६५ वर्षीय व्यक्ती बाधित

corona virusइंदिरानगर येथील पेशंटविषयी अनेकांना उत्सूकता आहे. हा पेशंट नक्की कोठे राहतो याविषयी महापालिकेने स्पष्ट माहिती दिलेली नाही. मात्र हा पेशंट कलानगर, महाबळ हॉस्पिटल जवळील रहिवासी असल्याचे समजते. हा ६५ वर्षीय व्यक्ती असून त्यांना ताप येत असल्याने अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. तेथे करोना टेस्ट केली असता आज त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

तारवाला नगर येथील ६६ वर्षीय व्यक्तीला बाधा

इंदिरानगर येथील पेशंटप्रमाणेच दिंडोरी रोड तारवाला नगर येथील ६६ वर्षीय पेशंटलाही अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले होते. त्यांनाही तापाची लक्षणे होती. त्यामुळे करोना टेस्ट केली असता आज त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले.

- Advertisement -

सिव्हिलमध्ये उपचार घेणार्‍याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

कोणार्कनगर येथील ५१ वर्षीय व्यक्तीचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला आहे. या पेशंटवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना कोणापासून संसर्ग झाला याचा शोध सुरु आहे. या पेशंटमुळे कोणार्क नगर परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे.

पाथर्डी फाटा येथील पेशंटची आई देखील बाधित

सकाळी प्राप्त झालेल्या रिपोर्टपैकी एक रुग्ण पाथर्डी फाटा येथील रहिवासी आहे. या रुग्णाची आई करोनामुळे बाधित असल्याचा अहवाल आला आहे.

हिरावाडीतील पोलीस कर्मचार्‍याची पत्नीही पॉझिटिव्ह

mumbai police dies due to corona virus
प्रातिनिधीक फोटो

हिरावाडी येथे राहणार्‍या पोलिस कर्मचार्‍याचा अहवाल काही दिवसापूर्वी पॉझिटिव्ह आला होता. हा कर्मचारी मालेगावला ड्यूटीला होता. तो ट्रकने नाशिकला आला होता. येथे त्यांची टेस्ट केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. परंतु ते मालेगावला ड्यूटीवर असल्याने हिरावाडी परिसर प्रतिबंधित करण्यात आला नव्हता. आज मात्र त्यांच्या पत्नीचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे हिरावाडी परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

सातपूरमधील बाधित महिलेच्या संपर्कातील ७ नातेवाईक, किरणा दुकानदार, भाडेकरुही पॉझिटिव्ह

प्रातिनिधीक फोटा

सातपूर कॉलनीतील ६० वर्षीय महिलेचे रिपोर्ट काही दिवसांपूर्वीच पॉझिटिव्ह आले. या बाधित महिलेच्या आईचे नुकतेच मालेगाव जवळील चिंचगाव येथे निधन झाले. त्यामुळे आईच्या अंत्यदर्शनासाठी ही महिला गावी गेली होत्या. तेथून २८ एप्रिलला नाशकात परत आल्यानंतर तिला कफसह कोरोनाची अन्य लक्षणे दिसून आली. त्यामुळे तिला २९ एप्रिलला सातपूर कॉलनीतील महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून पुढील उपचारार्थ डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या घशाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. या महिलेच्या कुटुंबियांनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे ही महिला मालेगावहून नाशकात ज्या वाहनाने आली त्यात तिचे सात नातेवाईकही होते. या सातही नातेवाईकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता त्यांचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यात महिलेच्या मुलगा, भाऊ, तीन भाचे आणि नातीचाही समावेश आहे. याशिवाय महिलेच्या संपर्कातील सातपूर येथील किराणा व्यावसायिक आणि दोन भाडेकरुही पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. महिला जेथे राहते तो सातपूरचा परिसर याआधीच प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. तसेच या महिलेच्या संपर्कातील त्यांचे भाऊ सातपूरमधील श्रीकृष्णनगर येथील रहिवासी असून ते कोरोना बाधित असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे श्रीकृष्ण नगर सातपूर हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे. या महिलेचे अशोक नगरमधील जाधव संकुल येथील तीन भाचे कोरोना बाधित असल्याचे अहवाल प्राप्त झाले आहे. त्यामुळे हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.

हनुमान चौकातील रुग्णास होता टायफाईड

नवीन नाशिक परिसरातील हनुमान चौक येथील एक रहिवासी टायफाईडने आजारी होता. त्यांना नवीन नाशिक येथील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांना फुफ्फुसाचा त्रास होत असल्याने त्यांना डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून ते ज्या परिसरात राहतात तो परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

पाटील नगरमधील महिलेला येत होता खोकला

नवीन नाशिक परिसरातील पाटील नगर येथील रहिवाशी महिला सर्दी खोकल्याचा त्रासामुळे अशोका मेडिकव्हर येथील रुग्णालयात भरती झाल्या होत्या. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याने त्यांचे रहिवासी परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे.

दिंडोरीसह विंचूरमध्ये शिरकाव

नाशिकमध्ये आढळून आलेला एक रुग्ण दिंडोरीचा आहे. त्यामुळे करोनाने दिंडोरीतही शिरकाव केल्याचे स्पष्ट झाले आहे. हा रुग्ण दिंडोरी तालुक्यातील इंदोरी गावातील आहे. याशिवाय विंचूर येथील दोन बाधित आढळून आले आहे.

पत्रकाराच्या संपर्कातील २४ व्यक्ती निगेटिव्ह

उत्तमनगर येथील एका पत्रकाराचा रिपोर्ट २ मे रोजी काही दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आला होता. मात्र हा पेशंट ठणठणीत असून त्यांच्यात अजूनही कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत. या पत्रकाराच्या कुटुंबासह त्याच्या संपर्कात आलेल्या २४ व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले होते. या कुटुबिंयांचे रिपोर्ट तब्बल सहा दिवसांनंतर प्राप्त झाले असून सर्वच्या सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे सगळ्यांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

सोलापूरहून नाशिकला पायी आला..रस्त्यावर पडला; रिपोर्ट पॉझिटिव्ह

एक रुग्ण सोलापूरहून दिल्लीकडे पायी निघाला होता. तो नाशिकला कसा आला याची माहिती अद्याप त्याने सांगितलेली नाही. मात्र नाशिकच्या रस्त्यावर तो बेवारस पडलेला आढळून आला. १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने या रुग्णास महापालिकेच्या रुग्णवाहिकेतून या रुग्णाला डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात हलवण्यात आले. त्याची टेस्ट घेतली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्याच्या मोबाईलवरुन तो कोठे-कोठे फिरला आणि त्याच्या संपर्कात कोण आले याचा शोध आता घेतला जात आहे.

शहरातील रिपोर्ट उशिरा येत असल्याने अडचण

महापालिका क्षेत्रात आढळून येणारे रुग्ण हे बाहेरील बाधित क्षेत्रातून आल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे. बाधित क्षेत्रातून बाहेरुन प्रवास करुन आला असेल आणि त्याची माहिती महापालिकेस मिळाली तर त्यांना क्वारंटाईन करणे सुकर होते. नाशिकमधील लॅबने आम्हाला वेळच्यावेळी रिपोर्ट दिले तर त्यातून वेळीच नियोजन करणे शक्य होते. महापालिकेच्या क्षेत्रातील २ मे चे रिपोर्ट आज ८ मे रोजी प्राप्त झाले आहे. दरम्यान ३ आणि ४ मेचे ग्रामीण भागातील रिपोर्ट या लॅबने दिले आहेत. म्हणजेच महापालिका क्षेत्रातील रिपोर्ट बाजूला ठेवले जात आहेत. आम्ही लॅबला विनंती केली आहे की जो आधी येईल तो रिपोर्ट आधी देण्यात यावा. आता आम्ही पुण्याच्या लॅबला रिपोर्ट पाठवणे सुरु केले आहेत. आज टेस्ट केल्यानंतर रुग्ण रिपोर्ट येईपर्यंत क्वारंटाईन केला जातो. त्याची पूर्णपणे काळजी घेतली जाते. सामाजिक अंतर राखले जाते. पण तरीही इतका मोठा काळ सर्वच रुग्ण एका ठिकाणी असल्याने प्रादुर्भाव वाढू शकतो हे मान्यच करावे लागेल. शिवाय पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यावर रुग्णाच्या संपर्कातील इतरांची माहिती घेता येते. त्यांना तातडीने क्वारंटाईन केले जाते. रिपोर्ट जर वेळेवर आले तर संपर्कातील इतरांना लवकर क्वारंटाईन करणे शक्य होईल. म्हणूनच रिपोर्ट लवकरात लवकर प्राप्त होणे गरजेचे आहे.

-राधाकृष्ण गमे, नाशिक महापालिका

 

 

शुक्रवारी आढळलेल्या १७ पॉझिटिव्ह रुग्णांची जाणून घ्या हिस्ट्री
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -