करोना संशयितांची नावे फोडली; मनसे शॅडो कॅबिनेटमधील पाखरेंवर गुन्हा दाखल

fir filed against mns leader

अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून तीन करोना संशयित रुग्ण पळाले होते. त्यासंदर्भात जिल्हा रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना दिलेले पत्र सोशल मिडीयावर व्हायरल झाले. या पत्राद्वारे संशयितांची नावे फोडल्याच्या कारणावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष संजीव पाखरे (रा. पुणे) यांच्याविरुध्द जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपचारासाठी या तीन संशयितांना नगरच्या शासकीय रुग्णालयामध्ये विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. तेथून ते पळून गेल्याची तक्रार रुग्णालय प्रशासनाने तोफखाना पोलिसांकडे संशयितांच्या नावासह केली होती.

त्यानंतर रात्री उशिराने हे तीन संशयित पुन्हा उपचारासाठी रुग्णालयात परतले होते. मात्र प्रशासनाचे हे पत्र सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने संशयितांची नावे उघड झाली होती. त्यामुळे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश पोलिस प्रशासनाला दिले होते. सायबर पोलिसांच्या तांत्रिक तपासात हे पत्र मनसेचे उपाध्यक्ष आणि पुण्यातील संजीव पाखरे यांनी सोशल मिडीयावर फोडल्याचे समोर आले होते.

हे वाचा – करोना बाधित रुग्णांची नावे जाहीर करा, मनसे नेते संदिप देशपांडे यांची मागणी

त्यानंतर बुधवारी रात्री सिव्हील हॉस्पीटलचे कर्मचारी कैलास काशिनाथ शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पाखरे यांच्याविरोधात आपत्कालीन व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. पाखरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याने सोशल मिडीयावर करोनासंबधी चुकीची माहिती टाकली जाऊ नये अथवा अफवा पसरवू नये, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले.