घरठाणेशिवमंदिर पेशवेकालीन कुंडात जल प्रदूषणाने माशांचा मृत्यू

शिवमंदिर पेशवेकालीन कुंडात जल प्रदूषणाने माशांचा मृत्यू

Subscribe

अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर परिसरात असलेल्या पेशवेकालीन कुंडातील वाढत्या जलप्रदूषणामुळे अनेक मोठ्या माशांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शासन आणि नगरपालिकेच्या वतीने शिव मंदिर परिसराचा कायापालट करण्याची एकीकडे तयारी सुरू असताना दुसरीकडे वालधुनी नदीचे रासायनिक सांडपाणी पेशवे कालीन कुंडालात जात असल्याने माशांचा मृत्यू झाल्याचा आरोप पर्यावरण प्रेमीनी केला आहे. अंबरनाथ शहर सुशोभीकरण करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून नगरपालिकेने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यासाठी शहरातील सर्वच महत्त्वाचे चौक आणि महत्त्वाच्या रस्त्यावरील दुभाजकांवर झाडे लावत, रंगरंगोटी करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र शहर स्वच्छ आणि सुंदर होत असले तरी अंबरनाथ शहराचे भूषण असलेल्या प्राचीन शिवमंदिर परिसरातील स्वच्छतेबाबत नगरपालिका पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप मंदिरात येणारे भाविक करीत आहे.

शिवमंदिर परिसरात एक प्राचीन पेशवेकालीन कुंड आहे. या कुंडात मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या आकाराचे मासे आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून हा कुंड दुर्लक्षित अवस्थेत असून केवळ महाशिवरात्री तसेच इतर उत्सवाच्या वेळी या कुंडाची डागडूजी आणि स्वच्छता केली जात असते. मात्र इतर काळात या कुंडात मोठ्या प्रमाणात कचरा आणि निर्माल्य टाकण्यात येते. त्यामुळे वाढत्या जल प्रदूषणाचा परिणाम कुंडातील माशांवर होत आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून कुंडातील संपूर्ण पाण्यावर शेवाळाचे दाट आच्छादन पसरले आहे. तसेच कुंडाच्या शेजारीच असलेल्या वालधुनी नदीतून सातत्याने वाहणारे रासायनिक सांडपाणी भूमिगत मार्गाने कुंडात मिसळत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

- Advertisement -

तर याच भागातील घरगुती सांडपाणीही कुंडात मिसळत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे अस्वच्छता आणि जलप्रदूषणामुळे बुधवारी दुपारी कुंडातील काही मोठ्या आकाराचे मासे मृत पडून पाण्यावर तरंगत असल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले. याबाबत पर्यावरण प्रेमींनी तीव्र नाराजगी व्यक्त करत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच अंबरनाथ नगरपालिकेकडे तलावातील जल प्रदूषणाबाबत तक्रार केली आहे. मात्र शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यात व्यस्त असलेल्या अंबरनाथ नगरपालिकेच्या आरोग्य विभागाला प्राचीन शिवमंदिर परिसरातील पेशवेकालीनकुंडाची स्वच्छता करण्याचा विसर पडत असल्याने नगरपालिकेच्या कामचुकार कारभाराबाबत आणि शहरातील जल प्रदूषणाबाबत कायम उदासिन असलेल्या एमपीसीबीच्या कारभारावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे काही अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली होती मात्र फक्त पाहणी करून कोणती ही कारवाई न करता निघून गेले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -