घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रसाडेचारशे वर्षे पुरातन रामरायाच्या मूर्तीचे यशस्वी संवर्धन; 'या' तंत्राचा केला वापर

साडेचारशे वर्षे पुरातन रामरायाच्या मूर्तीचे यशस्वी संवर्धन; ‘या’ तंत्राचा केला वापर

Subscribe

नाशिक : संपूर्ण लाकडी व भाजक्या विटांमधील बांधकाम असलेले मंदीर.. गाभार्‍यातील सुंदर लाकडी काम.. कोरीव मखर आणि त्यातील श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांच्या अत्यंत सुबक मूर्ती पाहताना दंडकारण्याची अनुभूती येते. गंगापूर-जलालपूर शिवारातील महेश नाकील यांच्या तब्बल साडेचारशे वर्षे पुरातन अशा श्रीराम मंदिरातील या मूर्तींचे रासायनिक पद्धतीने यशस्वी संवर्धन करण्यात आले.

नाशिकमधील गंगापूर-जलालपूर शिवारात हे मंदिर आहे. या अनोख्या मूर्तींची देखभाल करणारी नाकीलांची ही आठवी पिढी आहे. मध्यंतरी काही काळ हे मंदिर दुर्लक्षित अवस्थेत होते. या मूर्तींचे अंदाजे आयुर्मान हे साडेचारशे (४५०) वर्षाच्या आसपास आहे. त्यानुसार याचा कालखंड १७ व्या शतकाच्या सुमारास असावा. मंदिरातील मूर्तींची झीज होत असल्याचे लक्षात आल्यानंतर ती रोखण्यासाठी मिट्टी फाउण्डेशनच्या माध्यमातून मूर्ती संवर्धनाचा नाकील यांनी निर्णय घेतला. मूर्तीच्या सभोवती असलेली आर्द्रता, पाणी व आम्ल यांचा होत असलेला थेट संपर्क व परिणाम, तसेच हवेतील प्रदूषणाची वाढलेली पातळी यामुळे मूर्तीची झीज जलदगतीने होत होती. एवढ्या वर्षात प्रथमच या मूर्तीचे जतन व संवर्धनाचे काम हाती घेतले गेले. या संपूर्ण प्रक्रियेत केवळ नैसर्गिक घटकांचा वापर केलेला आहे.

- Advertisement -

अत्यंत बारकाईने अभ्यासपूर्ण संवर्धन प्रक्रिया करण्यात आली. तपासणी करताना मूर्तीमध्ये अनेक ठिकाणी संवर्धनाची गरज भासते आहे. असे जाणवले. कायम असलेली हवेतील आर्द्रता, ऊन-वारा-पावसाचा थेट होणारा परिणाम यामुळे झिजेचे प्रमाण लक्षणीय होते. संवर्धन प्रक्रियेत कुठेही एम.सील, एरल्डाईट अथवा तत्सम केमिकलचा वापर केलेला नाही, हे विशेष.

असे झाले संवर्धन 

शास्त्रीय पद्धतीने गरजेनुसार वेगवेगळ्या परंतु मोजक्याच रसायनांचा वापर करून ते मूर्तीमध्ये सोडण्यात आले. मूर्तीला आतून बळकटी देण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम यामुळे पार पडले. या प्रक्रियेमुळे मूर्तीच्या मूळ गाभ्यापर्यंत जाऊन पक्केपणा देणार्‍या रसायनांचा वापर करण्यात आला. या प्रक्रियेमुळे बुरशी व जिवाणुंची वाढ संथ होऊन मूर्तीला अधिक बळकटी मिळणार आहे.

- Advertisement -
४५ दिवस चालले काम 

नाशिकमधील प्राचीन मूर्ती व मंदिरांपैकी हे श्रीराम मंदिर व मूर्ती विशेष प्रसिद्ध आहे. स्मरतुगामी रामराया म्हणूनही या मंदिराचा लौकिक आहे. श्री रामराया सहकुटुंब वनवासात मार्गक्रमण करत असल्याच्या स्थितीतील या मूर्ती आहेत. या सर्व मूर्तींचे सौंदर्यीकरण करुन त्यावरील दागदागिने सजविण्यासाठी शुध्द सोन्याचा वर्ख वापरण्यात आला. वनवासात मार्गक्रमण करताना कमीतकमी दागिने, श्रृंगार व कपड्यांची रचना, त्याचा पोत असे सर्व बारकावे मूर्तींमधे प्रभावीपणे शिल्पांकीत केले आहेत.

असे झाले मूळ मूर्तीचे संवर्धन 

मूर्तीचे रूट कन्झर्वेशन करण्यात आले. ही पूर्णपणे सुरक्षित व रिवर्सेबल आहे. या पद्धतीने मूर्तीच्या गाभ्यापर्यंत पक्केपणा आणला जातो. जेणेकरून मूर्तीच्या मूळ रचनेला कोणताही धक्का न लावता व पृष्ठभागाची हानी न करता ही संवर्धन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यात कोणत्याही प्रकारची कृत्रिम रसायने वापरलेली नाहीत. संवर्धन प्रक्रियेत नैसर्गिक राळ, मोती भस्म, उच्च प्रतीची लाख, हिरक भस्म, मूर्तीशास्त्रानुसार नैसर्गिक उपाययोजना अमलात आणल्या. या प्रक्रियेमुळे मूर्तींचे आयुर्मान अनेक दशकांनी वाढणार आहे. या कामासाठी हर्षद, ओमकार, शांताराम मोरे यांचे विशेष सहकार्य लाभले. गोदाकाठावरील या अत्यंत मोहक आणि लोभस रुप लाभलेल्या चारही मूर्ती अत्यंत विलोभनीय आहेत. पेशव्यांच्या काळापासून थेट ब्रिटिश काळातील अनेक दस्तावेजांमध्ये या मूर्ती व मंदिराचे उल्लेख आढळतात.

अनेक दशकांपासून मिट्टी फाउंडेशन ही संस्था शास्त्रशुद्ध व सुयोग्य पद्धतीने संवर्धनाचे काम करते आहे. त्याचअनुषंगाने आम्ही या मंदिरातील मूर्तींचे संवर्धन केले. ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाच्या स्थळांचे जतन व संवर्धन होणे गरजेचे आहे. यासाठी आम्ही तयार आहोत. : मयूर मोरे, अध्यक्ष, मिट्टी फाउंडेशन

कै. महादेव शंकर नाकील , कै. प्रभाकर महादेव नाकील व त्यानंतर आजतागायत महेश प्रभाकर नाकील अशी परंपरागत श्रीरामाची सेवा सुरू आहे. या मंदिराचा उल्लेख पेशवेकालीन दस्तावेजांमध्ये रास्ते यांच्याशी संबंधित असल्याचा आढळतो. भविष्यातही या अमूल्य ठेव्याचे संवर्धन व देखभाल कायमस्वरुपी करण्याचा प्रयत्न असेल. : महेश नाकील, अध्यक्ष, श्रीराम मंदिर, गोवर्धन शिवार, गंगापूर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -