घरताज्या घडामोडीखुशखबर! कोकणात गणपती स्पेशल ट्रेन धावणार

खुशखबर! कोकणात गणपती स्पेशल ट्रेन धावणार

Subscribe

कोकणासाठी मध्य रेल्वेने ८ विशेष गाड्यांच्या १६२ फेर्‍या तर पश्चिम रेल्वेने ५ विशेष गाड्यांच्या २० फेऱ्या अशा एकूण १८२ फेर्‍या गणपती स्पेशल ट्रेन सोडण्याची घोषणा रेल्वेने केली आहे.

कोकणासाठी मध्य रेल्वेने ८ विशेष गाड्यांच्या १६२ फेर्‍या तर पश्चिम रेल्वेने ५ विशेष गाड्यांच्या २० फेऱ्या अशा एकूण १८२ फेर्‍या गणपती स्पेशल ट्रेन सोडण्याची घोषणा रेल्वेने शुक्रवारी केली आहे. कोकणात जाण्यासाठी १५ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान, या विशेष ट्रेन धावणार आहेत. या गणपती स्पेशल ट्रेनचे आरक्षण उद्यापासून सुरू होणार आहे. सीएसएमटी, एलटीटी ते सावंतवाडी, कुडाळ, रत्नागिरी तर पश्चिम रेल्वेवरुन मुंबई सेंट्रल, बांद्रा टर्मिनस, बोरीवली स्थानकातून सावंतवाडी, कुडाळ आणि रत्नागिरीकरिता या स्पेशल ट्रेन धावणार आहेत.

२२ ऑगस्टपासून गणपतीचे आगमन होत असून दरवर्षी गणेशोत्सवासाठी लाखो गणेश भक्त मुंबईहून कोकणात जातात. मात्र, यावर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांनी कोकणात जावे की नाही? या संभ्रमात राज्य सरकार आणि कोकणातील प्रशासन होते. कोकणात जाण्याची परवानगी दिली तरी प्रवासाची अपुरी साधने असल्यामुळे सर्वांनाच जाणे शक्य होणार नाही, अशी परिस्थिती होती. काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने चाकरमान्यांसाठी एसटीची सेवा उपलब्ध करुन दिली होती. त्यानंतर आता रेल्वे प्रशासनाने देखील कोकणवासीयांसाठी ही आनंदाची बातमी दिली आहे. मध्य रेल्वेने १६५ तर पश्चिम रेल्वेने २० गणपती स्पेशल ट्रेनच्या फेर्‍या चालविण्याची घोषणा केली आहे. प्रत्येक दिवशी मध्य रेल्वेवर चार गाड्या धावणार आहेत. तर कोकणात जाण्यासाठी १५ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट आणि परतीच्या प्रवासासाठी २४ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान, या विशेष चार ट्रेन धावणार आहेत.

- Advertisement -

२४ डब्यांच्या गाड्या

या सर्व गाड्या २४ डब्यांच्या असणार आहेत. ज्यामध्ये स्लिपर श्रेणीचे ९ कोच, द्वितीय श्रेणीचे ६ कोच, एसी २-१ कोच आणि एसी-३ चे ४ कोच असणार आहेत. या गाड्यांमधून प्रवास करताना शासनाने कोरोना विषाणू संबंधित घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे लागणार आहे.

थांबा : ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड.

- Advertisement -

या सर्व आरक्षित विशेष गाड्यांची संरचना

१३ शयनयान (स्लिपर क्लास), ६ आरक्षित सामान्य द्वितीय श्रेणी, १ द्वितीय वातानुकूलित (एसी -२ टायर), ४ तृतीय वातानुकूलित (एसी-3 टायर) डब्बे.

मरेच्या १६२ फेर्‍या अशा असणार

कोकणात जाणार्‍यांसाठी सीएसएमटी-सावंतवाडी रोड- सीएसटी १६ फेर्‍या, एलटीटी-कुडाळ-एलटीटी १६ फेऱ्या, सीएसएमटी-सावंतवाडी रोड- सीएसटी १६ फेर्‍या, एलटीटी – रत्नागिरी-एलटीटी १६ फेर्‍या या १५ ऑगस्ट ते २२ ऑगस्टपर्यंत धावणार आहेत. तर परतीच्या प्रवासासाठी सीएसएमटी-सावंतवाडी रोड- सीएसटी २४ फेर्‍या, सीएसएमटी-सावंतवाडी रोड- सीएसटी २४ फेर्‍या, एलटीटी-सावंतवाडी रोड-एलटीटी २६ फेर्‍या, एलटीटी-रत्नागिरी-एलटीटी २४ फेर्‍या २४ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान धावणार्‍या आहेत.

परेच्या २० फेर्‍या

पश्चिम रेल्वे मार्गांवर साप्ताहिक कोकणात स्पेशल गाड्या धावणार आहेत. २० ऑगस्ट ते २६ ऑगस्ट दरम्यान या गाड्या धावणार आहेत.

दररोज मुंबईतून कोकणात जाणार्‍या गाड्या

  • गाडी क्रमांक ०११०१ सीएसएमटी ते सावंतवाडी रोड एक्स्प्रेस दररोज रात्री ११ वाजून ०५ मिनिटांनी मुंबईहून सुटेल. ही मेल, एक्स्प्रेस सावंतवाडी रोडला दुसर्‍या दिवशी सकाळी ९ वाजून ३० मिनिटाला पोहोचेल.
  • गाडी क्रमांक ०११०३ एलटीटी ते कुडाळ एक्स्प्रेस दररोज रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी मुंबईहून सुटेल. तर दुसर्‍या दिवशी कुडाळला सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी पोहोचेल.
  • गाडी क्रमांक ०११०५ सीएसएमटी ते सावंतवाडी रोड एक्स्प्रेस दररोज रात्री ११ वाजता मुंबईहून सुटेल. ही मेल, एक्स्प्रेस सावंतवाडी रोडला दुसर्‍या दिवशी सकाळी ८ वाजून ५० मिनिटाला पोहोचेल.
  • गाडी क्रमांक ०११०७ एलटीटी ते रत्नागिरी एक्स्प्रेस दररोज रात्री ८ वाजून २० मिनिटांनी मुंबईहून सुटेल. ही मेल, एक्स्प्रेस रत्नागिरीला दुसर्‍या दिवशी सकाळी ४ वाजता पोहोचेल.

पश्चिम रेल्वेच्या विशेष गाड्या

पश्चिम रेल्वे कोकणासाठी ५ विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. प्रत्येक गाडीच्या ४ फेर्‍या करण्यात येणार आहेत.

  • ०९००१-०२ मुंबई सेंट्रल – सावंतवाडी-मुंबई सेंट्रल ट्रेन १९ व २६ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी सुटणार आहे. तर परतीकरिता २० आणि २७ ऑगस्ट रोजी धावणार आहे.
  • ०९००७-०८ मुंबई सेंट्रल-सावंतवाडी-मुंबई सेंट्रल ट्रेन १७ आणि २४ ऑगस्टला रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी सुटणार आहे. परतीकरिता १८ आणि २५ ऑगस्ट रोजी धावणार आहे.
  • ०९००९-१० बांद्रा टर्मिनस-सावंतवाडी-बांद्रा टर्मिनस ट्रेन १८ आणि २५ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजून ४५ मिनिटांनी.
  • ०९०११-१२ बांद्रा टर्मिनस-सावंतवाडी-बांद्रा टर्मिनस ट्रेन २३ आणि ३० ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजून ४५ मिनिटांनी.
  • ०९०६१-६२ बांद्रा टर्मिनस-कुडाळ-बांद्रा टर्मिनस ट्रेन २० आणि २७ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता चालविण्यात येणार आहेत. या गाड्यांचे आरक्षण प्रवासी १६ ऑगस्टपासून करू शकतात.

हेही वाचा – Corona Update: राज्यात १२,६०८ नव्या रुग्णांची नोंद, ३६४ जणांचा मृत्यू


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -