व्हायरल व्हिडीओप्रकरणी गौतमी पाटीलची पोलिसांत धाव, महिला आयोगानेही घेतली दखल

Gautami Patil Viral Video | गौतमीच्या तक्रारीची दखल राज्य महिला आयोगानेही घेतली असून आयोगानेही सायबर विभाग आणि पोलीस महानिरिक्षकांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.

lavani performer gautami patil soon appear in the marathi movie name reveled

Gautami Patil Viral Video | पुणे – प्रसिद्ध लावणी नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) हिचा एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. एका विकृताने तिचे कपडे बदलताना व्हिडीओ शूट केला आणि सोशल मीडियावर प्रसारित केला. गेल्या दोन दिवसांपासून हा व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत असून हा व्हिडीओ सर्व माध्यमातून हटवण्याचं आवाहन तिने केलं आहे. याप्रकरणी तिने आता पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तिच्या या तक्रारीची दखल राज्य महिला आयोगानेही घेतली असून आयोगानेही सायबर विभाग आणि पोलीस महानिरिक्षकांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.

हेही वाचा – गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ; सातारा न्यायालयाने दिले गुन्हा दाखल करण्याचे आदेश

लावणीतील अदाकरी, हावभाव यामुळे गौतमी पाटील प्रसिद्ध आहे. ग्रामीण भागात तिचा नृत्य पाहण्यासाठी पंचक्रोशीतून लोक येतात. राज्यातील कानाकोपऱ्यात गौतमी पाटीलचे चाहते आहेत. तिच्यावर प्रेम करणारा एक मोठा वर्ग समाजात असला तरीही तिचा तिरस्कार करणाराही वर्ग राज्यात आहे. त्यापैकीच एका विकृताने कपडे बदलत असतानाच तिचा व्हिडीओ शूट केला. हा व्हिडीओ एक फेक इन्स्टाग्राम अकाऊंट सुरू करून त्यावर पब्लिश केला. त्यानंतर तो सर्वत्र व्हायरल झाला.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिच्या चाहत्यांनी नारीज व्यक्त केली आहे. तसंच, हा व्हिडीओ आणखी व्हायरल न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अखेर, तिच्या मैत्रीणींनी याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीची दखल राज्य महिला आयोगानेही घेतली आहे.

हेही वाचा – गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा प्रेक्षकांचा राडा; वाचा काय घडलं?

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी याबाबत ट्वीट करत माहिती दिली. महिलांबाबतचे सायबर गुन्हे रोखण्याकरिता कृती कार्यक्रम जाहीर करावा असे महिला आयोगाने सायबर विभाग, पोलीस महानिरीक्षक यांना पत्राद्वारे कळवले आहे. लावणी कलाकार गौतमी पाटील यांचे चोरुन चित्रीकरण करत चेंजिंग रुममधील खासगी व्हिडिओ समाज माध्यमांवरून प्रसारित केला असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाणे, पुणे येथे तक्रार नोंद करण्यात आली असल्याचे वृत्त आहे. एकंदरीतच महिलांच्याप्रती सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येते. हे प्रकार रोखण्याकरिता विशेष पथकाचे शीघ्र कृती दल स्थापन करून धडक कार्यवाही मोहीम राबविल्यास गुन्हेगारांना वचक बसून गैरप्रकार आटोक्यात येतील, असं ट्वीट रुपाली चाकणकर यांनी केलं आहे.